शूर वनवासी क्रांतिकारक - (भाग-१)

    25-Nov-2023
Total Views | 100
tribal warriors
 
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून सशस्त्र क्रांतीचे जे प्रयत्न झाले, ते केवळ शहरी भागापुरते मर्यादित नव्हते. दुर्गम भागात राहणार्‍या वनवासी बांधवांचे याबाबत असलेले योगदान अतिशय मोठे. पण, दुर्दैवाने अज्ञात राहिलेले आहे. जेव्हा-जेव्हा त्यांच्यावर अन्याय झाला, तेव्हा-तेव्हा वनवासी बांधवांनी इंग्रजांचा कडवा प्रतिकार केला. अशा घटना 1857च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या आधीपासून घडत आलेल्या आहेत. गुजराथ, मध्य प्रदेश, केरळ, आंध्र, आसाम, मेघालय, नागालॅण्ड, ओडिशा आणि महाराष्ट्र अशा अनेक राज्यांत अनेक वनवासी क्रांतिकारक निर्माण झाले आहेत. अशा काही क्रांतिकारकांच्या कथा नाशिकच्या जनजाती कल्याण आश्रमाने ‘वीर जनजाती योद्धे‘ या छोटेखानी पुस्तकात प्रसिद्ध केल्या आहेत. हे पुस्तक अतिशय वाचनीय आणि अनेक अज्ञात कहाण्या सांगणारे आहे.

या संदर्भात जे नाव चटकन डोळ्यांसमोर येते, ते म्हणजे भगवान बिरसा मुंडा. त्यांचा जन्म (आजच्या) झारखंड राज्यात दि. 15 नोव्हेंबर 1875 या दिवशी झाला. त्या काळात युरोपमधून अनेक ख्रिश्चन धर्मप्रसारक भारतात दाखल झाले होते. त्यातील अनेक झारखंड भागातही आले होते. त्यांच्या धर्मांतराच्या कारवाया चालू होत्या. मुंडा समाज हा मूळचा जमीनदार होता. पण, इंग्रजांनी त्यांच्या जमिनी हडप करायला सुरुवात केली. हजारो मुंडांना पकडून आसाममध्ये चहाच्या मळ्यावर पाठवण्यात आले.स्वाभिमानी बिरसाला या गोष्टी सहन झाल्या नाहीत. त्यांनी आपल्या जमातीमधील लोकांना एकत्र आणले आणि इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष सुरू केला. त्यांना अटक झाली आणि दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. तुरुंगातून बाहेर आल्यावरही बिरसा शांत बसले नाहीत. त्यांनी मुंडा जमातीची संघटना बांधली आणि ‘उलगुलान‘ (क्रांती)चा दिवस नक्की केला-दि. 24 डिसेंबर 1899. नियोजनानुसार सरकारी कार्यालये, पोलीस चौक्या, गोदामे यांच्यावर एकाच वेळी हल्ले करण्यात आले. रांची शहर तीन दिवस ठप्प झाले होते. या उठावामुळे इंग्रज संतप्त झाले. बिरसा यांचे सहकारी डोमबारी नावाच्या एका उंच टेकडीवर होते. इंग्रजांनी त्यांच्यावर जबरदस्त हल्ला चढविला. त्यांच्यावर सुमारे तीन तास चहू बाजूंनी गोळीबार चालू होता. त्यात शेकडो मुंडा तरूण हुतात्मा झाले. त्या दिवशी त्या प्रदेशात रक्ताचे पाटच्या पाट वाहिले!

पुढे बिरसा यांना अटक झाली. तुरुंगात त्यांचा अतोनात छळ झाला. त्यांची प्रकृती गंभीर झाली. दि. 9 जून 1900 या दिवशी त्यांना रक्ताची उलटी झाली आणि त्यांचा अंत झाला. वनवासी समाजात बिरसा मुंडा यांचे स्थान फार महत्त्वाचे आहे. त्यांच्या सन्मानार्थ दि. 15 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिन ‘राष्ट्रीय जनजाती गौरव दिन‘ म्हणून साजरा केला जातो.वनवासी लोकांमध्ये गोंड नावाची जमात आहे. त्यांचे राज्य ’गोंडवन’ म्हणून प्रसिद्ध होते. इंग्रजांनी त्या राज्यावर हक्क सांगितला. त्यावेळेस तेथे शंकरशहा आणि रघुनाथशहा हे पिता-पुत्र राज्य करत होते. त्यांनी अर्थातच ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा पुकारला. तो काळ 1857च्या स्वातंत्र्ययुद्धाचा होता. या दोघा पिता-पुत्रांनी राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे आणि बहादूरशहा जफर यांच्याशी संपर्क साधला. शंकरशहा साधूच्या वेशात राणी लक्ष्मीबाईला भेटले. त्यांची सविस्तर चर्चा झाली. शंकरशहा यांच्याबरोबर एक हजार साधू आले होते. राणीने या सर्व साधूंना तंबोरे आणि मृदुंग भेट दिले. ही वाद्ये साधीसुधी नव्हती. त्यात चक्क काडतुसे भरलेली होती! युद्ध सुरू होईल, तेव्हा जबलपूर येथील इंग्रज छावणीवर हल्ला करण्याची जबाबदारी शंकरशहा यांच्यावर सोपवण्यात आली.

पण, पुढे वेगळेच घडले. या तयारीचा सुगावा इंग्रजांना लागला. त्यांनी तातडीने या सैन्यावर हल्ला चढवला. विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे तेव्हा रात्र झालेली होती आणि सारे सैन्य गाढ झोपेत होते! त्यांच्यावर लगोलग केरोसीन ओतून, त्यांची प्रेते जाळून टाकण्यात आली. शंकरशहा आणि रघुनाथशहा यांना ताब्यात घेण्यात आले. शंकरशहा यांच्यावर बंड केल्याचा आरोप ठेवण्यात आला, तेव्हा ते खवळून म्हणाले की, ”आमच्याच देशात आम्हालाच अटक करण्याची तुमची कृती म्हणजे तुम्ही निर्दयी आणि जंगली असल्याचा पुरावा आहे.“ अखेरीस, एके काळी राजे असलेल्या या पिता-पुत्रांना दि. 18 सप्टेंबर 1857 या दिवशी इंग्रजांनी तोफेच्या तोंडी दिले!आज आपण उपभोगत असलेले स्वातंत्र्य अशा अनेक शूरवीरांच्या सर्वोच्च त्यागामुळे शक्य झाले आहे, याची जाणीव आपण सदैव ठेवायला हवी.

डॉ. गिरीश पिंपळे


(संदर्भ ः जनजाती कल्याण आश्रम, नाशिक यांनी प्रसिद्ध केलेले पुस्तक ‘वीर जनजाती योद्धे‘)




अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121