इराण-इस्रायलमधील 12 दिवसांच्या संघर्षात अमेरिकेनेही मोठा हल्ला करीत उडी घेतली आणि पुन्हा एकदा जग तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याच्या जागतिक चर्चांना उधाण आले. अखेरीस काल इराण-इस्रायल दरम्यान युद्धविराम घोषित झाला असला, तरी पश्चिम आशियात आता तरी शांतता नांदणार का, हा प्रश्न मात्र कायम आहे.
इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये शस्त्रविराम झाल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ’ या आपल्या समाजमाध्यमाद्वारे घोषित केले. ही घोषणा झाल्यानंतरही इस्रायलचे इराणवरील हल्ले आणि इराणने इस्रायलविरुद्ध क्षेपणास्त्रे डागणे काही काळ सुरूच राहिले असले, तरी इराणने घोषित केले होते की, जर इस्रायलने आपले हल्ले थांबवले, तर इराण प्रतिहल्ले करणार नाही. 12 दिवस चाललेल्या या युद्धामध्ये अमेरिकेने उडी घेऊन इराणच्या फोर्दो, इस्पाहान आणि नातान्झ या अणुप्रकल्पांवर हल्ले केल्यानंतर त्याचा भडका उडणार की, काय अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. इराणच्या संसदेने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याबाबत ठराव मंजूर करून परिस्थिती तणावाखाली ठेवली. दि. 23 जून रोजीच्या रात्री इराणने कतारमधील अमेरिकेच्या ‘अल-उदेद’ या पश्चिम आशियातील सर्वांत मोठ्या लष्करीतळावर क्षेपणास्त्र डागली, तेव्हा काही पत्रकारांनी घाईघाईत तिसर्या महायुद्धाची सुरुवात करून टाकली. थोड्याच वेळात स्पष्ट झाले की, इराणने या हल्ल्याची पूर्वकल्पना अमेरिका आणि कतारला दिली होती. त्यामुळे अमेरिकेने आपल्या तळावरून सैनिकांना आणि कर्मचार्यांना सुरक्षित जागी हलवून इराणची सर्व क्षेपणास्त्रे हवेतल्या हवेत उद्ध्वस्त केली. इराणने स्वतःचा आत्मसन्मान राखण्यासाठी अमेरिकेविरुद्ध हल्ला केला होता.
असे असले तरी इराणने गेल्या दोन दशकांत कमावले होते ते जवळपास सारे गेल्या दोन वर्षांमध्ये गमावले. इराण आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्ध 1979 साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाल्यापासून सुरू आहे. इराणच्या विद्यार्थ्यांनी अमेरिकेचा राजदूतावास ताब्यात घेऊन तेथील अधिकार्यांना 444 दिवस बंधक बनवल्यामुळे, अमेरिकेने इराणविरुद्धच्या युद्धात सद्दाम हुसेनला मदत केल्यामुळे, तसेच 1988 साली इराणचे प्रवासी विमान पाडल्यामुळे यामुळे त्यात भर पडली.
1980 सालच्या दशकातील इराकविरुद्धच्या युद्धात प्रचंड नुकसान सोसावे लागलेल्या इराणचे पाय जमिनीवर टेकले होते. दि. 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेविरुद्ध झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना प्रतिसाद म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानमधील तालिबानची आणि इराकमधील सद्दाम हुसेनची राजवट उलथवून टाकली. तेव्हा इराणही अमेरिकेच्या रडारवर होते. पण, अफगाणिस्तान आणि इराकमध्ये लोकशाही न रुजता, हे दोन्ही देश यादवी युद्धांमध्ये अडकल्याने एकप्रकारे अमेरिका दलदलीत अडकली. अमेरिकेने इराणचे दोन कट्टर वैरी संपवल्यामुळे इराणच्या ताकदीत वाढ होऊ लागली. बदललेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन इराणने इराक, सीरिया, लेबेनॉन, गाझा पट्टी आणि येमेनमधील आपली पकड घट्ट केली. मागील दशकांत अरब देशांत झालेल्या राज्यक्रांतींमुळे इराणचा आणखी फायदा झाला. खरं तर इजिप्त आणि ट्युनिशियापूर्वी म्हणजे 2009 साली इराणमधील जनता सरकारने निवडणुकांमध्ये गडबड घोटाळा केला म्हणून रस्त्यावर उतरली होती. इराणच्या सरकारने हे आंदोलन निर्दयीपणे चिरडले. तेव्हा बराक ओबामांच्या अमेरिकेने बघ्याची भूमिका घेतली. पण, अमेरिकेच्या मित्रदेशांमध्ये जनता रस्त्यावर उतरली असता, त्याला ‘अरब वसंत’ असे गोंडस नाव देऊन अमेरिकेने एकप्रकारे आपल्याच मित्रांच्या पाठीत सुरा खुपसला. यामुळे इराणच्या ताकदीमध्ये आणखी वाढ झाली. त्यातून ओबामांनी इराणला सोयीचा अणुकरार केल्यामुळे पश्चिम आशियात इस्रायल वगळता इराण सर्वांत शक्तिशाली देश बनला. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कारकिर्दीत अमेरिकेच्या पुढाकाराने इराणशी झालेल्या अणुकरारातून माघार घेतली. तेव्हा इराणने आपल्या अणु इंधन समृद्धीकरण कार्यक्रमाला गती दिली. इस्रायलची इच्छा असूनही मुख्यतः अमेरिकेच्या दबावापोटी तो इराणच्या अणुप्रकल्पाविरोधात कारवाई करू शकत नव्हता.
अशी भीती व्यक्त केली जात होती की, जर इराणवर हल्ला केला, तर या भागातील इराणचे हस्तक म्हणून काम करणारे ‘हमास’, ‘हिजबुल्ला’, बशर अल असद सरकार आणि ‘हुती’ बंडखोर इस्रायलवर एकत्रित हल्ला करतील. दुसरीकडे इराण होर्मुझची सामुद्रधुनी बंद करून आखातातून तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक बंद पाडेल आणि संपूर्ण जगात महागाईचा भडका उडेल. यामुळे आखाती अरब राष्ट्रांना इस्रायलपेक्षा इराणचीच भीती वाटू लागली. त्यांनी इस्रायलशी राजनयिक संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेला गती दिली. सुरुवातीला संयुक्त अरब अमिराती आणि बहारीन आणि कालांतराने मोरक्को आणि सुदानने इस्रायलशी राजनयिक संबंध प्रस्थापित केले. सौदी अरेबियाही इस्रायलशी संबंध पूर्ववत करण्यास तयार होता. दि. 7 ऑक्टोबर 2023 रोजी ‘हमास’ने इस्रायलवर दहशतवादी हल्ला करून एक हजार, 200 हून अधिक इस्रायली लोकांची हत्या केली आणि सुमारे 250 लोकांना बंधक बनवून गाझा पट्टीत नेले. त्यानंतर इस्रायलने केलेल्या कारवाईत ‘हमास’चा धुव्वा उडवत गाझा पट्टी भुईसपाट केली. एवढ्यावरच न थांबता इस्रायलने या युद्धात उतरलेल्या ‘हिजबुल्ला’ची नेतृत्वाची फळी कापून काढत त्यांचे कंबरडे मोडले. ‘हिजबुल्ला’च्या पाठिंब्यावर टिकून असलेली सीरियातील बशर अल असद यांची राजवटही अल्पावधीत कोसळली. तिथे तुर्कीए आणि आखाती अरब देशांच्या समर्थनाने अबु महंमद अल जुलानीकडे सत्ता आली.
त्यामुळे इराणचा ‘हिजबुल्ला’ आणि ‘हमास’ यांना मदत करण्याचा मार्ग बंद झाला. इराण कमकुवत झाला आहे, हे इस्रायल आणि अमेरिकेच्या लक्षात आले. आता नाही तर कधीच नाही, या विचाराने इस्रायलने इराणवर धाडसी हवाई हल्ला केला. सुरुवातीला अमेरिकेने यात आपला सहभाग नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी इस्रायलला पहिल्याच दिवशी मिळालेले यश पाहून त्याचे श्रेय घ्यायला अमेरिका पुढे सरसावली. इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणच्या शीर्षस्थ लष्करी आणि वैज्ञानिक नेतृत्वाची फळी कापली गेली. गेल्या दोन आठवड्यांत इस्रायलने इराणच्या लष्कराच्या अनेक विमानतळांना तसेच, लष्करासंबंधित इमारतींना जमीनदोस्त केले. इराणच्या अणुप्रकल्पांचे नुकसान झाले असले, तरी इराणच्या अण्वस्त्रनिर्मिती क्षमतेचा धोका काही वर्षांसाठी पुढे ढकलण्यासाठी अमेरिकेचा सहभाग आवश्यक होता. अखेर अमेरिकेने आपली ‘बी 2’ बॉम्बर विमाने आणि 30 हजार पाऊंड वजनाचे ‘जीबीयु 57 मॉप’ (मॅसिव्ह ऑर्डिनन्स पेनिट्रेटर) बॉम्ब वापरले. या बॉम्बचा युद्धामध्ये पहिल्यांदाच वापर करण्यात आला. अमेरिकेच्या सात ‘बी2’ विमानांनी 37 तास आणि सात हजार मैलांचा प्रवास करून इराणमधील फॉर्दो, आणि नातान्झ अणुप्रकल्प उद्ध्वस्त केले. यातील एका बॉम्बची किंमत दोन अब्ज डॉलर्स होती.
इस्फाहान येथील प्रकल्पाला ‘टॉमाहॉक’ विमानांनी उद्ध्वस्त केले. या कारवाईत 100 हून अधिक चौथ्या आणि पाचव्या पिढीतील विमानांनी सहभाग घेतला. इराणच्या हातातील हुकमाचे पत्ते संपल्यामुळे त्यांना शरणागती पत्करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आपण सन्मानजनक तडजोड करून इराणचा स्वाभिमान जपला आहे, असे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. यासाठी कतारची मध्यस्थी कामी आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंना युद्धविरामासाठी तयार केले. इराणने तीन तासांची पूर्वसूचना देऊन कतारमधील अमेरिकेच्या अल-उदेद तळावर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. अर्थातच, कतार आणि अमेरिकेने ही सर्व क्षेपणास्त्रे हवेतल्या हवेत नष्ट केली. या प्रसंगी डोनाल्ड ट्रम्प यांनी समंजसपणा दाखवत इराणचा पाणउतारा करणे टाळले आणि युद्धविरामाला होकार दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. दि. 24 जून रोजी सकाळी 7 वाजता हा युद्धविराम लागू झाला. तो किती काळ टिकतो आणि त्याला जोडून इराणच्या अणुप्रकल्पाबाबत अमेरिका आणि इराणमध्ये वाटाघाटींना प्रारंभ होतो का, यावर इराणमधील राजवटीचे तसेच पश्चिम आशियातील शांततेचे भवितव्य अवलंबून आहे.