1973 ते 1990 अशी 17 वर्षे ऑगस्टो पिनोशे हा चिलीचा हुकूमशहा होता. नंतरची आठ वर्षे म्हणजे 1998 पर्यंत तो चिलीचा सरसेनापती होता. या 25 वर्षांच्या कालखंडात चिलीमधील असंख्य सरकारी नोकर, लष्करी अधिकारी, न्यायाधीश, वकील यांच्या फिलीप सँड्सने प्रदीर्घ मुलाखती घेतल्या. त्यावर आधारित ‘38, लाँडरस स्ट्रीट’ याच नावाने त्याचे पुस्तक आले आहे.
‘221/बी, बेकर स्ट्रीट, लंडन’ हा पत्ता फारच प्रसिद्ध आहे. काय म्हणता? तुम्हाला माहीत नाही कुणाचा आहे ते? जगद्विख्यात गुन्हे संशोधक शेरलॉक होम्स याचा हा पत्ता आहे. शेरलॉक होम्स ही काल्पनिक व्यक्तिरेखा आहे. ब्रिटिश लेखक सर आर्थर कॉनन डॉयल याच्या विलक्षण प्रतिमेतून शेरलॉक होम्स हा गुन्हे संशोधक आणि त्याचा साहाय्यक डॉ. वॉटसन अवतरलेले आहेत. पण, या व्यक्तिरेखांनी जनमानसावर इतकी मोहिनी घातली की, लंडनच्या बेकर स्ट्रीटवर ‘221/बी’ ही वास्तू निर्माण करण्यात आली. तिथे शेरलॉक होम्सचे संग्रहालय निर्माण करण्यात आले. आजही वर्षाला किमान पाऊण लाख पर्यटक या संग्रहालयाला भेट देत असतात.
38, लाँडरस स्ट्रीट, सँटिअॅगो हा पत्ता मात्र दोन कत्तलबाज इसमांच्या भेटीची जागा म्हणून प्रसिद्ध आहे. फिलीप सँड्स हा एक ब्रिटिश बॅरिस्टर आहे. 1998 साली लंडनच्या ‘मानवाधिकार संरक्षण संस्थे’ने त्याला ऑगस्टो पिनोशे या चिलियन हुकूमशहाविरुद्ध संस्थेचे वकीलपत्र घेण्यासाठी पाचारण केले. पण, पिनोशे प्रकरणाचा थोडा मागोवा घेतल्यावर सँड्सला आढळले की, इथे फार म्हणजे फारच पाणी मुरत आहे. त्याने ‘मानवाधिकार संस्थे’चे वकीलपत्र बाजूला ठेवले. ऑगस्टो पिनोशे 1973 ते 1990 अशी 17 वर्षे चिलीचा हुकूमशहा होता. नंतरची आठ वर्षे म्हणजे 1998 पर्यंत तो चिलीचा सरसेनापती होता. या 25 वर्षांच्या कालखंडातल्या चिलीमधल्या असंख्य सरकारी नोकर, लष्करी अधिकारी, न्यायाधीश, वकील यांच्या फिलीप सँड्सने प्रदीर्घ मुलाखती घेतल्या. म्हणजे 25 वर्षांच्या कालखंडात अभ्यास फिलीप सँड्स 1998 ते 2024 पर्यंत करत होता आणि या अभ्यासावर आधारित ‘38, लाँडरस स्ट्रीट’ याच नावाने त्याचे पुस्तक आता आले आहे.
तुम्ही म्हणत असाल ‘चिली’ हे काय आहे? आणि ऑगस्टो पिनोशे हा कोण नमुना आहे? आणि हा बॅरिस्टर फिलीप सँड्स वकिली करायचे सोडून एकदम संशोधन क्षेत्रात कुठे घुसला? काय आहे ही सगळी भानगड?चिली हा एक दक्षिण अमेरिकन देश आहे. अर्जेंटिना, ब्राझील आणि चिली या देशांना ‘एबीसी पॉवर्स ऑफ साऊथ अमेरिका’ असेही म्हणतात. पण, अर्जेंटिना आणि ब्राझील यांच्या तुलनेत चिली हा इतका छोटा देश आहे की, त्याला चिल्लर देश म्हणायला हरकत नाही. आपल्या कोकण पट्टीप्रमाणेच उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पसरलेला एक चिंचोळा भूभाग म्हणजे चिली हा देश.
इसवी सनाच्या 16व्या शतकात स्पॅनिश आक्रमकांनी पेरू या चिलीच्या उत्तरेकडच्या देशातल्या इंका या संस्कृतीचा विद्ध्वंस करून मग चिलीकडे मोर्चा वळवला. पहिल्यांदा भरपूर लुटालूट आणि जाळपोळ करायची; आडवे येतील त्यांना ठार मारायचे; यातून शिल्लक राहतील त्यांना बाटवायचे. त्यांच्या बायकांशी लग्ने लावून भरपूर संमिश्र प्रजा निर्माण करायची. असा स्पॅनिश आक्रमकांचा ठरलेला क्रम असे. चिलीचा उत्तर भाग वाळवंटी आहे. मध्य आणि दक्षिण भाग बर्यापैकी सुपीक आहे. पण, पूर्वेकडे अँडीज पर्वताची अशी विक्राळ रांग आहे की, विस्ताराला फारसा वावच नाही. कदाचित त्यामुळेच चिली हा इतर दक्षिण अमेरिकन देशांइतका संपन्न नाही. तरीही स्पॅनिशांनी तो सोडून दिला नाही. 16व्या शतकापासून आजपर्यंत स्थानिक लोकांशी लग्ने लावून, त्यांना बाटवून त्यांनी चिलीला कॅथलिक देश बनवून ठेवलेला आहे. सन 1818 साली स्पेनने चिलीला स्वातंत्र्य बहाल केले.
याचवर्षी इंग्रजांनी भारतातल्या सर्व सत्ताधीशांचा पराभव करून भारतावर निर्विवाद ताबा मिळवला. स्पेन, पोर्तुगाल, हॉलंड, फ्रान्स आणि ब्रिटन यांच्यामधल्या साम्राज्य विस्तार स्पर्धेत ब्रिटनने सर्वाधिक यश मिळवले. यात दक्षिण अमेरिकेतले ब्राझील आणि अर्जेटिना थोडेफार महत्त्व बाळगून होते. कारण, ते अटलांटिक समुद्रावर होते. फक्त पॅसिफिक किनार्यावरच असलेल्या चिली देशाला यात काही भूमिकाच नव्हती.
1871 साली प्रशिया देशातला दूरदर्शी मुत्सद्दी प्रिन्स बिस्मार्क याने प्रशिया आणि बरीचशी जर्मन भाषिक संस्थाने एकत्र आणली आणि जर्मनी हा एक नवाच देश अस्तित्वात आणला. या नव्या देशाने अन्य युरोपीय साम्राज्यसत्तांनी दुर्लक्ष केलेल्या अनेक छोट्या-मोठ्या देशांशी दूरदर्शीपणे संबंध जोडले आणि वाढवले. त्यातलाच एक देश होता चिली. जर्मन सेनापतींनी चिलीच्या सैन्याचे पुनर्संघटन, पुनर्रचना, प्रशिक्षण केले. परिणामी, 1914 ते 1918 आणि 1939 ते 1945 अशा अनुक्रमे पहिल्या आणि दुसर्या महायुद्धात इतर सर्व दक्षिण अमेरिकन देशांनी दोस्त राष्ट्रांना पाठिंबा दिलेला असताना, चिलीने अलिप्त धोरण जाहीर केले. दुसर्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाल्यानंतर असंख्य नाझी राजकारणी, नेते, लष्करी अधिकारी यांनी अटक टाळण्यासाठी जर्मनीतून पळ काढला. ते प्रथम इटली किंवा स्पेनमध्ये गेले नि तिथून अटलांटिक ओलांडून दक्षिण अमेरिकेतल्या विविध देशांमध्ये पळाले.
महायुद्धानंतरच्या संशोधन मंथनातून भीषण क्रौर्याचे दोन नमुने जगासमोर आले. 1933 साली हिटलरचा नाझी पक्ष सत्तेवर आला. तेव्हापासून नाझींनी साधारण 60 लक्ष ज्यूवंशीय लोक आणि सुमारे 50 लक्ष अन्य राजकीय शत्रू यांना ठार मारले. 1945 सालच्या याल्टा येथे झालेल्या दोस्त राष्ट्रांच्या बैठकीत आपण आतापर्यंत किमान एक कोटी राजकीय विरोधकांना ठार मारले आहे, असे सोव्हिएत नेता जोसेफ स्टालिन याने स्वतःच्या तोंडाने चर्चिलला सांगितले. या क्रौर्याची जगभर निंदा करण्यात आली.
काळ पुढे धावतच होता. 1973 साली चिली देशात क्रांती झाली. चिलीचा सरसेनापती कॅप्टन जनरल ऑगस्टो पिनोशे याने निर्वाचित राष्ट्रध्यक्ष साल्बादोर आलांदे याचे लोकनियुक्त सरकार उलथून दिले. आता पिनोशे हा काही कुणी अशिक्षित आफ्रिकन वा रेड इंडियन टोळीवाला नव्हता. तो चांगला सुशिक्षित, गोरा चिलियन होता. तरीही सत्तेवर आल्याबरोबर त्याने विरोधकांचा खाटिकखाना सुरू केला. मूळचा युरोपीय, गोरा, सुसंस्कृत(!) असल्यामुळे त्याने माणसे मारण्याच्या नवनव्या पद्धती शोधून काढल्या. त्याचे लोक विरोधकांना कैद करून म्हणत, “चला, तुम्हाला मस्तपैकी हॅलिकॉप्टरमधून फिरायला नेतो.” हॅलिकॉप्टर अँडीज पर्वतावर नेऊन तिथून खालच्या खोल दर्यांमध्ये विरोधकांना फेकून देण्यात येई. याच प्रकारे लोकांना पॅसिफिक महासागरात फेकून दिले जाई.
चिलीच्या उत्तरेकडे असलेल्या एक्वाडोर या देशात वॉल्टर राऊफ हा नाझी लपून बसलेला होता. किमान एक लाख ज्यू लोकांना ठार मारणारा हा राऊफ एक्वाडोरची राजधानी किटो या शहरात एका मत्स्यउत्पादन केंद्राचा व्यवस्थापक बनून राहिला होता. पिनोशेने त्याला मुद्दाम बोलावणे धाडले नि त्याच्याकडून चिलीच्या गुप्तहेर खात्याची, सुरक्षा खात्याची संपूर्ण पुनर्रचना करवून घेतली. यामुळे पिनोशेचा राजकीय खाटिकखाना अधिकच कार्यक्षमतेने चालू झाला. ही सगळी कहाणी ‘38, लाँडरस स्ट्रीट’ या चिलीची राजधानी असलेल्या सँटिअॅगो शहरात घडली. 1984 साली वॉल्टर राऊफ सँटिअॅगोमध्येच वयाच्या 78व्या वर्षी मरण पावला. आपण केलेल्या कृत्यांबद्दल त्याला कसलीही खंत वाटत नव्हती. ऑगस्टो पिनोशेने 1990 साली सत्ता पॅट्रिशियो आल्विन या लोकनियुक्त राष्ट्राध्यक्षाकडे सोपवली. पण, चिलीच्या सरसेनापती पदावर तो होताच. त्याच्यावर खटला करायचा की नाही, याबाबत बरीच भवति न भवति होऊन अखेर 2006 साली कोणतीही कारवाई न होताच, तो वयाच्या 91व्या वर्षी सुखरूप मरण पावला. बॅरिस्टर फिलीप सँड्सच्या ताज्या पुस्तकाने अहिंसा, शांती वगैरे गोष्टींना खरोखर कितपत मानले जाते, असे प्रश्नचिन्हच उभे केले आहे.
जित्याची खोड...
लष्कराच्या अधिकारी श्रेणीमध्ये पहिले पद किंवा पहिली पायरी असते ‘सेकंड लेफ्टनंट’ हे पद. मग क्रमाक्रमाने लेफ्टनंट-कॅप्टन-मेजर-लेफ्टनंट कर्नल-कर्नल-ब्रिगेडियर-मेजर जनरल-लेफ्टनंट जनरल-जनरल अशी पदांची चढती भांजणी असते. जनरल हे सर्वोच्च पद असते. यानंतरचे सन्माननीय सर्वोच्च पद म्हणजे फील्ड मार्शल.
एखाद्या जनरल पदावरच्या सेनापतीने फारच अलौकिक अशी काही कामगिरी बजावली, तर त्या देशाचे सरकार त्याला ‘फील्ड मार्शल’ ही सन्माननीय पदवी देते. जनरल हा वयोमानानुसार सेवानिवृत्त होतो. पण, फील्ड मार्शल हा आजीवन सेवेत असतो. या सगळ्या परंपरा युरोपीय देशांच्या आहेत. पण, आज जगातल्या सर्वच देशांमध्ये त्या पाळल्या जातात. अमेरिकेत त्या पदाला ‘फील्ड मार्शल’ असे न म्हणता ‘जनरल ऑफ द आर्मी’ असे म्हणतात. पाकिस्तानचे सेनाप्रमुख जनरल अयुबखान यांनी 1958 साली बंड पुकारून सत्ता हडपली आणि स्वतःच स्वतःला ‘फील्ड मार्शल’ ही पदवी दिली. त्यानंतर अगदी आता परवा म्हणजे मे 2025 मध्ये पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकचे विद्यमान सेनाप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर अहमद शाह यांना ‘फील्ड मार्शल’ ही पदवी दिली आहे. एप्रिल 2025 मध्ये जनरल मुनीर यांनी जाहीरपणे सांगितले की, “आमचे धर्म वेगळे आहेत. आमच्या परंपरा, रितीरिवाज, विचारधारा, महत्त्वाकांक्षा सगळेच भिन्न आहे. हाच तर द्विराष्ट्रवाद सिद्घांताचा पाया आहे.” याला अलीकडच्या मनावाधिकारांच्या परिभाषेत ‘हेट स्पीच’ असे म्हणतात. यानंतर काही दिवसांतच दि. 22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ला झाला आणि 26 हिंदू पर्यटकांना निर्घृणपणे ठार मारण्यात आले. यानंतर लगेचच म्हणजे दि. 20 मे या दिवशी पाक सरकारने जनरल मुनीर यांना ‘फील्ड मार्शल’ बनवले.
गेल्या आठवड्यात म्हणजे, दि. 28 जून रोजी पाकिस्तान नेव्हल अकादमी, कराची इथे पदवीदान समारंभ होता. यालाच ‘पासिंग आऊट परेड’ असेही म्हणतात. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करताना फील्ड मार्शल मुनीर म्हणाले की, “भारत जरी काश्मीरमधल्या घटनांना ‘दहशतवाद’ म्हणत असला, तरी हा दहशतवाद नसून काश्मिरींचा स्वातंत्र्यासाठी चालू असलेला न्याय्य लढा आहे. भारताने जर काही गडबड केली, तर त्याला चोख जवाब दिला जाईल.” औरंगजेबाला म्हणे संपूर्ण कुराण तोंडपाठ होते. योगायोगाचे फील्ड मार्शल मुनीर यांनाही संपूर्ण कुराण तोंडपाठ आहे.