हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा! मंत्री प्रताप सरनाईक का संतापले?

    08-Jul-2025   
Total Views | 22

मुंबई : पोलिसांनी कालपासून सुरू केलेली दादागिरी आणि गुंडगिरी कधीही सहन करणार नाही. मी स्वतः त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी जात असून हिंमत असेल तर पोलिसांनी मला अटक करून दाखवावी, अशा शब्दात मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदर येथील प्रकरणावर संताप व्यक्त केला.

विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी मीरा-भाईंदरचे पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या विरोधात तक्रार केली आहे. कालपासून पोलिसांनी सुरू केलेली कारवाई योग्य नाही. मराठी भाषिकांनी शांतता मार्गाने मोर्चा काढण्याची परवानगी मागितली असताना त्यांना परवानगी द्यायला हवी होती. पोलिसांनी कालपासून सुरू केलेली दादागिरी आणि गुंडगिरी कधीही सहन करणार नाही. मी स्वतः त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी जात असून हिंमत असेल तर पोलिसांनी मला अटक करून दाखवावी," असे ते म्हणाले.

"गेली चार टर्म मी मीरा-भाईंदर शहराचा आमदार असून अतिशय शांतताप्रिय शहर म्हणून ते ओळखले जाते. कधी कधी पोलिसांच्या भूमिकेवरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. मी मीरा-भाईंदरच्या पोलिसांशी बोलून नाराजी व्यक्त केली. तीन दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला तुम्ही परवानगी दिली नाही, असे सांगत आहात. मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी विनंती केल्यानंतर तुम्हाला परवानगी द्यायची नव्हती तर ती नसती दिली तरी चालले असते. परंतू, रात्री बेरात्री कार्यकर्त्यांची धरपकड करून तुमच्याकडून एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा शहरात चालवण्याची भूमिका असल्यास लोकप्रतिनिधी म्हणून ते सहन करणार नाही," असेही ते म्हणाले.

मराठी एकीकरण समितीच्या मागे ठामपणे उभे राहणार

"मराठी एकीकरण समिती गेल्या अनेक वर्षांपासून मराठी उत्सव साजरे करतात. एखादा राजकीय पक्ष त्यांच्या मोर्चात घुसला असल्यास ती नंतरची गोष्ट आहे. परंतू, मराठी एकीकरण समितीच्या मंडळींच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची माझी भूमिका आहे. पोलिस आमच्या मराठी बांधवांना रात्री बेरात्री घरात घुसून त्यांना उचलत असतील तर ते मी सहन करणार नाही. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत नाराजी व्यक्त करणार आहे. जाणीवपूर्वक शहराचे वातावरण बिघडण्याचा हा प्रकार असल्याचा माझा आरोप आहे," असेही मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121