लंडन पाठोपाठ न्यूयॉर्कसारख्या महानगराच्या महापौरपदी मुस्लीमधर्मीय झोहरान ममदानी यांची निवड झाल्यास, त्यातूनही एक राजकीय संदेश जातो. जगातील सर्वच लोकशाही देशांमध्ये डावे उदारमतवादी पक्ष टोकाची डावी भूमिका घेऊ लागले असून, मार्क्सवादी आणि इस्लामिक मूलतत्त्ववादी यांची ही युती सगळ्यांसाठीच चिंता वाढवणारी म्हणावी लागेल.
अमेरिकेची आर्थिक राजधानी न्यूयॉर्कमध्ये नोव्हेंबर 2025 साली महापौरपदाच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांत डेमोक्रॅटिक पक्षाकडून झोहरान ममदानी यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. त्यांचा विजय झाल्यास भांडवलशाहीचे प्रतीक असलेल्या अमेरिकेच्या आर्थिक राजधानीत समाजवादी महापौर निवडून येण्याचा विक्रम होणार आहे. ममदानी यांनी जेव्हा या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांना पाठिंबा देणार्यांची संख्या जवळपास एक टक्का इतकी होती. निवडणुकांच्या प्राथमिक फेरीत त्यांच्यासमोर, न्यूयॉर्कचे माजी गव्हर्नर अॅण्ड्रयू कुओमो यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचे आव्हान होते. अॅण्ड्रयू कुओमा 2011 ते 2021 सालापर्यंत न्यूयॉर्क राज्याचे गव्हर्नर होते. मधल्या काळात त्यांच्यावर विविध प्रकारचे आरोप झाल्यामुळे ते राजकारणापासून दूर राहिले. महापौरपदाच्या शर्यतीत उतरताना तेच विजयी होणार, असा अंदाज होता. पण, प्राथमिक फेरीत झोहरान ममदानी यांना तब्बल 43.5 टक्के मते मिळाली. त्याचवेळी कुओमो यांना अवघी 36.4 टक्के मते मिळाली. कोणालाही 50 टक्के मते न मिळाल्याने दुसरी फेरी पार पडणार होती. पण, त्यापूर्वीच अॅण्ड्रयू कुओमो यांनी माघार घेतली आणि ममदानींचा विजय निश्चित झाला.
न्यूयॉर्कचे सध्याचे महापौर एरिक अॅडम्स कृष्णवर्णीय आहेत. यापूर्वी ते न्यूयॉर्क राज्याच्या ‘सिनेट’चे सदस्य होते, तसेच न्यूयॉर्क पोलीस दलात अधिकारीही होते. 2021 सालच्या निवडणुकांमध्ये त्यांना डेमोक्रॅटिक पक्षाने पाठिंबा दिला होता. यावर्षी ते अपक्ष म्हणून पुन्हा उभे राहणार आहेत. न्यूयॉर्कमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचा पराभव म्हणजे गुजरातमध्ये भाजपचा पराभव होण्यासारखे. झोहरान ममदानी हा न्यूयॉर्क राज्याच्या प्रतिनिधीगृहात दोनवेळा निवडून आलेला 33 वर्षांचा तरुण, महापौर झाला, तर तो पहिला भारतीय वंशाचा आणि मुस्लीम महापौर असेल. त्यामुळे काही भारतीय पत्रकारांनी त्याचे गुणगान करणे सुरू केले आहे. झोहरान ममदानींची आई सुप्रसिद्ध दिग्दर्शिका मीरा नायर असून, वडील महमूद ममदानी हे कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक आहेत. झोहरानचा जन्म युगांडामधील कंपाला येथे झाला आणि बालपण दक्षिण आफ्रिकेत गेले. वडिलांना कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी मिळाल्यानंतर ते वयाच्या सातव्या वर्षी अमेरिकेला स्थायिक झाले. 2018 साली त्यांना अमेरिकेचे नागरिकत्वही मिळाले. डेमोक्रॅटिक पक्षात असले, तरी त्यांनी स्वतःला ‘समाजवादी’ म्हणून घोषित केले आहे. विद्यार्थीदशेत त्यांनी ‘स्टुडंट्स फॉर पॅलेस्टाईन’ची स्थापना केली होती.
त्यांच्या विचारधारेमुळे डेमोक्रॅटिक पक्षातील ऐक्याला तडे गेले असून, पक्षाचे समर्थक असलेल्या श्रीमंत, उद्योजक आणि खासकरून ज्यू आणि भारतीय वंशाच्या लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ज्यू आणि हिंदू समाज आज अमेरिकेतील सर्वांत सुशिक्षित आणि श्रीमंत धार्मिक समूह आहेत. आपण निवडून आल्यास सार्वजनिक बस वाहतूक निःशुल्क करू, न्यूयॉर्कच्या मालमत्ता कराची पुनर्रचना करू, श्रीमंतांवर वाढीव कर लावून, गरिबांसाठी स्वस्त सरकारी किराणामालाची दुकाने उघडू आणि घरभाड्यांची कमाल मर्यादा ठरवू, हे मुद्दे ममदानी यांच्या आर्थिक धोरणाचा भाग आहेत. पण, ममदानींचे मतभेद आर्थिक मुद्द्यांपुरते मर्यादित नाहीत. विद्यार्थी कार्यकर्ता असल्यापासूनच ममदानी यांनी, नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत. नेतान्याहूंना त्यांनी ‘युद्ध गुन्हेगार’ म्हटले असून, जर ते न्यूयॉर्कला आले, तर आपण त्यांना अटक करू, असेही म्हटले होते. इस्रायलचे अस्तित्व मान्य करताना, त्यांनी इस्रायलला धार्मिक आधारावर नागरिकत्व न देता ज्यू आणि अरब सर्वांना समान अधिकार देण्याचे समर्थन केले आहे. कागदावर हे चांगले वाटत असले, तरी प्रत्यक्षात मात्र सर्व पॅलेस्टिनी लोकांना इस्रायलचे नागरिकत्व दिल्यास, इस्रायल ना यहुदी राष्ट्रं राहील ना लोकशाही राहील. ‘हमास’ आणि अन्य पॅलेस्टिनी संघटनांनी इस्रायलविरुद्ध उभारलेल्या दहशतवादी लढ्याला अरबी भाषेत ‘इंतिफादा’ असे म्हटले जाते. ममदानी या दहशतवादी ‘इंतिफादा’ची महात्मा गांधी यांच्या सत्याग्रह तसेच दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेलांच्या वर्णद्वेषविरोधी अहिंसात्मक लढ्याशी तुलना करून त्याला जागतिक स्तरावर न्यायला हवे, असे म्हणतात.
महापौर अगदी न्यूयॉर्कचे असले, तरी त्यांना मर्यादित अधिकार असतात. अमेरिकेतील शहरांमध्ये महापौर थेट जनतेतून निवडले जातात. ते उपमहापौर, विविध विभागांचे आयुक्त तसेच, स्थानिक न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करू शकतात. न्यूयॉर्कचे पोलीसदलही महापौरांच्या हाताखालीच काम करते. शहराशी निगडित विविध क्षेत्रांतील धोरण ठरवण्याचे अधिकारही महापौरांना असतात. शहराच्या प्रतिनिधीगृहाने केलेल्या कायद्यांना ‘नाही’ म्हणण्याचा अधिकार महापौरांना असतो. त्यांनी हा नकाराधिकार वापरल्यास प्रतिनिधीगृहाला दोन तृतीयांश बहुमताद्वारे तो रद्द करता येतो.
ममदानी यांची धोरणं डावी-उदारमतवादी असली, तरी जगाच्या अन्य भागांमध्ये खासकरून भारतामध्ये सपशेल अपयशी ठरलेली आहेत. वाढती महागाई ही वस्तुस्थिती. पण, अनुदानावर चालवलेल्या सरकारी वाणसामानाची दुकाने अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचाराचे अड्डे बनतात, असा जागतिक अनुभव आहे. त्यांच्यामुळे खासगी क्षेत्रालाही स्पर्धा करता येत नाही. तीच गोष्ट भाडे नियंत्रण कायद्याबाबतही लागू आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा निःशुल्क केली, तर त्यांची देखभाल आणि दुरुस्तीसाठी योग्य ती तरतूद न करता आल्याने वेळापत्रक कोलमडण्याची भीती असते. ममदानी अवघे 33 वर्षांचे असल्यामुळे त्यांना शहराचे प्रशासन कसे चालवायचे, याचा अनुभव नाही. पण, त्यांची लोकांशी संवाद साधण्याची तसेच, त्यांना स्वप्न दाखवण्याची शैली वाखाणण्यासारखी आहे.
आश्चर्य म्हणजे, डेमोक्रॅटिक पक्षात ममदानीच्या धोरणांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. एकेकाळी न्यूयॉर्क हे ‘ज्यूयॉर्क’ म्हणून ओळखले जायचे, एवढी या शहरावर ज्यू लोकांची पकड होती. शहराच्या 85 लाख लोकसंख्येपैकी सुमारे 13 लाख ज्यू असले, तरी त्यातील अनेकांनी स्वतःची धार्मिक ओळख पुसून टाकली आहे. ख्रिस्ती लोकसंख्याही 73 टक्क्यांहून 57 टक्क्यांवर आली असून, त्यामागेही हेच कारण आहे. त्यांच्यापैकी इटालियन आणि आयरिश वंशाच्या लोकांची संख्या सर्वाधिक होती. पण, गेल्या काही वर्षांमध्ये उच्च मध्यमवर्गीयांनी न्यूजर्सी किंवा कनेक्टिकटसारख्या भागांमध्ये घरे घेऊन स्थलांतर केल्यायामुळे न्यूयॉर्कमध्ये फक्त अतिश्रीमंत आणि गरीब लोकच उरले. लंडन पाठोपाठ न्यूयॉर्कचाही महापौर मुस्लीमधर्मीय माणूस झाल्याने त्यातून एक राजकीय संदेश जातो. जगातील सर्वच लोकशाही देशांमध्ये डावे उदारमतवादी पक्ष टोकाची डावी भूमिका घेऊ लागले असून, मार्क्सवादी आणि इस्लामिक मूलतत्त्ववादी यांची ही युती सगळ्यांसाठीच चिंता वाढवणारी आहे.
अॅण्ड्रयू कुओमो विजयी व्हावे म्हणून, डेमोक्रॅटिक पक्षाच्या अनेक श्रीमंत देणगीदारांनी मदत केली होती. पण, ममदानींनी असे चित्र निर्माण केले की, पक्षाचे जुने नेतृत्वच 2024 सालामधील अध्यक्षीय निवडणुकांतील पराभवाला जबाबदार आहे. त्यांच्यापैकी अनेकांवर गंभीर आरोप असून, त्यांची मतदारांशी नाळ तुटली आहे. सामान्य माणसांच्या समस्यांशी त्यांना कोणतेही देणेघेणे नाही. झोहरान ममदानींच्या विजयामध्ये त्यांना पक्षातील अतिडाव्या विचारसरणीच्या बर्नी सँडर्स तसेच, अॅलेसिया ओकासियो कार्टेझसारख्या लोकांनी दिलेल्या पाठिंब्याचाही मोठा हात आहे. 2028 सालच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत, एखादी टोकाची डावी व्यक्ती डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवेल, असा अंदाज आहे. अशी व्यक्ती निःसंशय भारतविरोधी असणार, याचा विचार जसा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने करायची गरज आहे, तसाच अमेरिकेतल्या भारतीय समाजानेही करायचा आहे.