‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून साधना भोसले या मुलीच्या वडिलांनी तिला मारहाण केली. त्यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेने अवघा महाराष्ट्र हळहळला. त्या घटनेच्या संदर्भाने दिवंगत साधनाला जड अंतःकरणाने लिहिलेले हे पत्र...
प्रिय साधना,
तुला एखाद्या अनपेक्षित स्वरूपातील मृत्यूच्या घटनेनंतर पत्र लिहावे लागेल, असे कधीच वाटले नव्हते. तुझा मृत्यू ही माणूस म्हणून जगण्याच्या प्रवासातील अत्यंत क्रूर घटना. नात्यावरील विश्वास उडावा, अशा घटनेने आम्हाला चिंताक्रांत केले आहे. ज्या हातांनी जगण्याची उमेद उंचवयाची, ज्यांनी जगण्यासाठी आधार द्यायचा, ज्यांनी अनंत चुका पोटात घालत उभारी द्यायची, अशा नात्यानेच केवळ गुणांसाठी तुझ्यावर घाला घातला. नात्यातील फोलपणा आता पुढे आला आहे. आपली नाती जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था, उदारीकरणानंतर अत्यंत सैल होत चालली आहेत. नात्यातील वीण आणि गोडवा आटत चालला आहे. कधीकाळी नारायण सुर्वे नावाच्या कवीने म्हटले होते की, “माणूस सस्ता झाला, अन् बकरा महाग झाला.” तेव्हा ते खरे होते की नाही माहीत नाही; पण आता मात्र त्यांचे म्हणणे खरे वाटावे, असेच चित्र आहे. तुझ्या मृत्यूने आम्हाला नात्यासंदर्भात पुन्हा पुन्हा विचारात पाडले. केवळ तेवढेच नव्हे, तर आम्ही खरंच माणूस आहोत का? याचाही विचार करण्यास भाग पाडले आहे. आपण माणूस आहोत, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. तुझ्या मृत्यूने तर समाजासमोर अनेक प्रश्न उपस्थित केले.
आम्ही माणूस आहोत, यावर विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्न आता पडू लागला आहे. शिक्षणाच्या प्रवासातच तुला मृत्यूला सामोरे जावे लागले. वडिलांनी रागावे, मारावे, चिडावे हे समजण्यासारखेच. मात्र, जीवन जगण्याचा अधिकारच हिरावून घ्यावा आणि जगणेच नाकारावे, हे अनाकलनीयच. तुला डॉक्टर व्हायचे होते का? ते तुझे स्वप्न होते की नाही, माहीत नाही. मात्र, कुटुंबाचे स्वप्न होते हे अधोरेखित झाले आहे. तुम्हा मुलांना काय आवडते? काय शिकायचे आहे? तुमचा आनंद कशात आहे? तुमचे स्वप्न काय आहे? तुम्हाला कोणत्या शाखेत शिकायचे आहे? काय शिकायचे आहे? याचा पालक म्हणून आम्ही कधी विचार करावा, असे वाटत नाही. तुमच्यापेक्षा आमच्या आवडी, निवडी आणि प्रतिष्ठा अधिक महत्त्वाच्या झाल्या आहेत. आम्हाला पालक म्हणून कोणता अभ्यासक्रम प्रतिष्ठा मिळून देईल, हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यात तुमचा विचार कोठेच नसतो. तुम्ही मुलं म्हणजे आम्हा पालकांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणारे साधन आहात. आमची प्रतिष्ठा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी हवे ते करण्याची तयारी तुम्ही दाखवायला हवी. अगदी तुमच्यात क्षमता नसल्या तरी आणि तुमचे सर्वस्व गमवले गेले तरी चालेल पण, तुम्ही धावायला हवे. आमच्या इच्छेसाठी, वाट्टेल ते करायची तयारी हवी. त्यात तुमचा आनंद नसला तरीसुद्धा.
तुम्ही मुले आम्हाला क्रीडा, नृत्य, गायन, वादन, लेखन, साहित्य, वक्तृत्व, शाळा स्तरावरील इतर बौद्धिक स्पर्धेतदेखील प्रथम क्रमांकानेच उत्तीर्ण व्हायला हवीत. परीक्षा कोणतीही असली, तरी तुमचा क्रमांक सर्वत्र पहिलाच हवा, ही आमची अपेक्षा. त्यासाठी आम्ही तुम्हाला हवे ते देण्यास तयार आहोत. हव्या त्या वस्तू घ्या, शाळेच्या सोबत शिकवणी वर्गाला जा, तेथे आम्ही पैसे ओतू. मात्र, तुम्ही पहिलेच हवेत. आमच्या दृष्टीने तुम्ही फक्त स्पर्धेचे घोडे आहात, त्यामुळे तुम्ही फक्त धावायला हवे. आम्हा पालकांना असे वाटू लागले आहे की, आम्ही तुम्हाला हव्या त्या भौतिक सुविधा पुरवल्या म्हणजे आमची इतिकर्तव्यता संपली. पालक म्हणून तेवढीच आमची जबाबदारी आहे, असेच आम्हाला वाटू लागले आहे. पालक म्हणून मुलांवर भरभरून प्रेम करायचे असते, त्यांच्याशी संवाद साधत भावनांचे नाते उभारायचे असते, जीवनाच्या वाटचालीचे दर्शन घडवायचे असते, उघड्या डोळ्यांनी जग पाहण्यासाठी आणि निर्माण होणार्या समस्यांच्या निराकरणासाठी मनगटात आणि मस्तकात शक्ती भरायची असते, हेच आम्ही विसरून गेलो आहोत. आम्ही तुमचे पालक नाही, तर मालक झालो आहोत. तुम्ही पाल्य म्हणजे आमच्यासाठी गुलामीची वाट आहात, हीच आमची धारणा. तुम्ही स्वतंत्र नागरिक आहात, असे आम्हाला वाटतच नाही. तुमचे स्वतंत्र अस्तित्व आम्हाला जणू मान्य नाही. खलिल जिब्रान म्हणाले होते की,
‘तुमची मुलं’ ही ‘तुमची’ नसतातच.
ती असतात, जीवनाला असलेल्या स्वतःच्या
असोशीची बाळं.
ती येतात तुमच्यामार्फत,परंतु तुमच्या अंशातून नव्हे.
ती असतात खरी तुमच्याजवळ,परंतु नसतात तुमच्या मालकीची.
तुम्ही द्यावं त्यांना तुमचं प्रेम, पण लादू नयेत विचार
कारण, त्यांना आहेत ना त्यांचे स्वतःचे विचार.
तुम्ही सांभाळा त्यांचं शरीर अस्तित्व,
पण अधिराज्य नको त्यांच्या आत्म्यावर
कारण त्यांच्यात आत्मा वास करतो,भविष्याच्या उदरात
जिथं जाणं तुम्हाला शक्य नाही,अगदी स्वप्नातही नाही.
त्यांच्यासारखं होण्याचा तुम्ही प्रयत्न करावा,
परंतु त्यांना आपल्यासारखं घडवण्याचाअट्टहास नको.
या कवितेत मुलांचे अस्तित्व मान्य करत, डोळ्यात अंजन घातले आहे. हे आम्हा पालकांना कधी कळणार, हा प्रश्नच आहे. खरंतर तुम्ही मुलं म्हणजे निखळ चैतन्याचा प्रवाह आहात. आम्ही पालक म्हणून तुमच्यासोबत असताना, तो खळखळता ठेवण्यासाठी हृदयात शक्ती भरण्याची गरज आहे. मात्र, आम्ही तुमचा नैसर्गिक प्रवाह अडवत आहोत. आम्ही तुमच्यासारखे बनण्याची गरज असताना, आम्ही तुम्हालाच आमच्यासारख्या वाटांचा प्रवास करू इच्छितो. आमच्या वाटा या तुमच्या स्वप्ननांच्याही पलीकडील आहेत. बाळा खरंच माफ कर, आम्ही सुजाण पालक म्हणून अपयशाचीच वाट चालतो आहोत. तुझ्या मृत्यूमुळे समाजातील आम्हा पालकांनादेखील पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. आता पालक म्हणून पुन्हा पुन्हा विचार करावा लागतो आहे. इतकेच नाही, तर तुझ्या मृत्यूने शिक्षणाच्या संदर्भानेदेखील काही प्रश्न निर्माण झाले आहेत. आमचा शिक्षणाचा प्रवासही चुकतो आहे का? याचा विचार करण्याची गरज आहे. तुझ्या मृत्यूने आमच्या माणूसपणावर प्रश्नचिन्ह आहेतच; पण त्याचवेळी आमचे शिक्षणही माणूस घडवण्यात अपयशी ठरते आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिक्षण घेतल्यावरदेखील माणसांमध्ये माणूसपण येत नाही, हेच पुन्हा सिद्ध झाले. तू गेलीस; पण सर्वच व्यवस्था अपयशाच्या वाटेने प्रवास करते आहे, यावर शिक्कामोर्तब करून गेलीस.
सरळधोपट मार्गाने शिक्षण प्रक्रिया करणार्या अगणित शाळा आमच्या अवतीभोवती आहेत. या शाळांमधून आम्ही नेमके काय पेरतो आहोत? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. विचारांनी मस्तके घडवण्याऐवजी केवळ शब्दांचा फुलोरा सांगणार्या आणि अर्थहीनतेची वाट चालणार्या पिढ्या, आमच्या शिक्षणातून घ़डवतो आहोत का? असा प्रश्न आत्मपरीक्षणानंतर पडू लागला आहे. आमचे शिक्षण अक्षर साक्षरतेचाच विचार अधिक करू लागले आहे. माणसाचे शहाणपण, विवेकाची वाट हरवत चालली असून, शिक्षणाच्या ध्येय साध्यतेपेक्षा पैसे मिळून देणार्या अभ्यासक्रमासाठी आमची धावाधाव सुरू आहे. शिक्षणांच्या सार्या व्याख्या केवळ पुस्तकाच्या पानावर निस्तब्ध पडून आहेत. शिक्षणात नवनिर्मिती आणि सर्जनशीलतेचा विचार आता होत नाही. शिक्षणाचे ध्येय, उद्दिष्टांचा विचारच हरवला आहे. शिक्षणात मूल्य, विकास, कौशल्यांपेक्षा गुण अधिक महत्त्वाचे झाले आहेत. पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा याचे ओझे मुलं निपूटपणे कायम वाहत राहात. त्यामुळे त्यांच्यातील नवनिर्मितीचे अंकुर फुलण्याआधीच कोमेजून जात होते. आज ती कधी फुलूच नयेत, यासाठी प्रयत्न होत आहेत. शिक्षणाने मुलं ‘समस्याग्रस्त’ आणि ‘असमाधानी’ बनत आहेत, यात शंका नाही. त्यातून कालपर्यंत विद्यार्थी आत्महत्या करत होते, आज पालकच त्यांच्या जीवावर उठले आहेत. तू उलट प्रश्न विचारला म्हणून बाप चिडला, असेही म्हटले जाते. माफ कर साधना पण, खर सांगू असा प्रश्न कधीच कोणी विचारू नये? म्हणूनच शिक्षण आहे. तुमच्यातील बंडखोरपणा संपावा, प्रश्न विचारण्याची हिंमत हरावी म्हणून शिक्षण आहे आणि नेमके तू हिंमतीने जाब विचारला आणि तेथे शिक्षण जिंकले. म्हणूनच तुला मृत्यूलाही सामोरे जावे लागले. सत्याची वाट नेहमीच अवघड असते. पालक आज असमाधानी आहेत, शिक्षणापेक्षा गुणांचे अधिराज्य असेल, तर त्या शिक्षण व्यवस्थेतून मुलांना निरोगी जीवन मिळण्याची शक्यताच नाही.
शिक्षणाचा अर्थ आज हरवला आहे. आईबाबांना तुमच्या क्षमता माहीत नाहीत. मुलं म्हणजे स्पर्धेचे घोडे आहेत. तुम्हाला आम्ही सांगू तेच करावे लागेल. ही आम्हा पालकांची धारणा झाली आहे. साधना तू हुशार होतीस, हे तुझ्या दहावीच्या गुणांवरून सहजतेने लक्षात येते. मुलांना पडणारे गुण म्हणजे शिक्षण झाले आहे. तुझ्या मृत्यूने तेच अधिकाधिक अधोरेखित झाले. साधना माफ कर, आम्ही पालक आणि शिक्षण व्यवस्था म्हणून अपयशाची वाट चालतो आहोत. तुझ्या मृत्यूने तरी तुझ्यासारख्या भोग भोगणार्या मुलांची सुटका व्हावी, ही अपेक्षा! खूप दुःखद अंतकरणाने हे पत्र लिहीत आहे. तू मला माफ करशील अशी अपेक्षा!
- संदिप वाकचौरे