ग्रीस, सायप्रस आणि आर्मेनिया या देशांना क्षेपणास्त्रे पुरवण्याचा निर्णय घेऊन पाकसमर्थक तुर्कस्तानला भारताने अप्रत्यक्ष इशारा दिला. तुर्कस्तानशी ताणलेले संबंध असलेल्या या तिन्ही देशांना थेट क्षेपणास्त्र पुरवठ्याचा निर्णय घेत, तुम्ही आमच्या शत्रूंची साथ द्याल, तर भारतही चोख प्रत्युत्तर देईल, ही मोदी सरकारची कूटनीती तुर्कीच्या चिंतेत भर घालणारी ठरावी.
तुर्कस्तान हा देश ‘नाटो’चा सदस्य असून त्या देशाने आता अमेरिकेकडून ‘एफ-35’ प्रकारची लढाऊ विमाने मिळविण्यासाठी बोलणी सुरू केली आहेत. पण, याच तुर्कस्तानने रशियाकडून शस्त्रास्त्रे खरेदी केल्यावरून त्या देशास अमेरिकेने काळ्या यादीत टाकले होते. तुर्कस्तानने अलीकडील ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान दहशतवाद्यांना पाठिंबा देत असलेल्या पाकिस्तानची तळी उचलली होती, हे आपण सर्व जाणतोच. तोच तुर्कस्तान आता पुन्हा अमेरिकी लढाऊ विमाने प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहे. तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगान आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ‘नाटो’ शिखर परिषदेच्या निमित्ताने हेग येथे भेट झाली. त्या भेटीत अमेरिकेने आपल्या देशास ‘एफ-35’ लढाऊ विमाने द्यावीत, यासाठी ट्रम्प यांची मनधरणी केली. तुर्कस्तानने रशियाकडून ‘एस-400’ ही क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा प्राप्त केल्यानंतर अमेरिकेने ‘एफ-35’ कार्यक्रमातून तुर्कस्तानची हकालपट्टी केली होती. तसेच 2020 मध्ये अमेरिकेने तुर्कस्तानवर निर्बंध लादले होते. आता तुर्कस्तानच्या अध्यक्षांना अमेरिकेचे मन वळविण्यात यश मिळेल, अशी चिन्हे दिसत आहेत. तुर्कस्तान अशी युद्धसज्जता करीत असताना तुर्कस्तानच्या आसपास असलेली राष्ट्रे त्या देशाचा धोका ओळखून भारताकडून विविध प्रकारची क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासाठी भारतासमवेत करार करीत आहेत.
ग्रीस हा तुर्कस्तानच्या लगत असलेला देश. त्या देशाला तुर्कस्तानचा धोका आहे. तो धोका लक्षात घेऊन भारतीय संरक्षण उत्पादन कंपन्यांशी सहकार्य करण्याच्या दिशेने ग्रीस पावले टाकत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी तुर्कीश बनावटीचे ड्रोन निष्प्रभ ठरविण्याची मोठी कामगिरी भारतीय बनावटीच्या ‘आकाश’ हवाई संरक्षण यंत्रणेने बजाविली होती. ते लक्षात घेऊन भारताकडून ‘आकाश’ यंत्रणा ग्रीसकडून मिळविली जात आहे. ग्रीसकडून जी संरक्षण तयारी केली जात आहे, त्याकडे तुर्कस्तान संशयाने पाहात आला आहे. ‘आकाश’प्रमाणे ग्रीसला ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रे देण्याच्या तयारीत भारत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये ग्रीसला भेट दिली होती. तेव्हापासूनच उभय देशातील संरक्षण संबंध मजबूत करण्याचा दिशेने पावले टाकली गेली होती. त्यानंतर लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्यांनी ग्रीसला दिलेल्या भेटींनंतर उभय देशातील संबंध आणखी दृढ झाले.
सायप्रस या देशाने पूर्व भूमध्य समुद्रात असलेला तुर्कस्तानचा धोका लक्षात घेऊन भारताकडून विविध क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्व भूमध्य समुद्रात तुर्कस्तानकडून जे वाढते लष्करीकरण सुरू आहे, त्यात समतोल साधण्यासाठी भारताकडून जी भूमिका बजाविली जात आहे, त्याचे सायप्रसने स्वागत केले आहे. सायप्रसप्रमाणे आर्मेनिया हा देशही भारताकडून लष्करी सामग्री घेण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. नागोर्नो काराबाख भागात जी लष्करी कारवाई करण्यात आली, त्यामुळे सुमारे दीड लाख आर्मेनियन ख्रिश्चन लोकांना तेथून परागंदा व्हावे लागले. इस्लामी देश असलेल्या अझरबैजान या देशास तुर्कस्तानचा लष्करी पाठिंबा. तेथील परिस्थिती लक्षात घेऊन भारताशी आपले संबंध अधिक दृढ करण्याच्या स्थितीत आर्मेनिया आहे. आर्मेनियाने भारताकडून अनेक प्रकारची युद्धसामग्री घेतली आहे. भारताकडून आर्मेनियाला केला जात असलेला युद्धसामग्रीचा पुरवठा लक्षात घेऊन भूमध्य समुद्र परिसरातील प्रादेशिक समीकरणे बदलली आहेत. एकेकाळी भारत युद्धसामग्री आयात करणारा देश होता, पण आता भारताकडून विविध देशांना क्षेपणास्त्रे आणि अन्य युद्धसामग्री यांचा पुरवठा केला जात आहे. भारत आत्मनिर्भर तर झाला आहेच, पण अन्य देशांनाही समर्थ करण्याचा प्रयत्न करीत आहे, हे यावरून दिसून येत आहे.
कर्नाटक : हिंदू नेत्याच्या हत्येमागे पीएफआय!
कर्नाटक राज्यातील मंगळुरु येथे दि. 1 मे या दिवशी काही इस्लामी अतिरेक्यांनी हिंदू नेते सुहास शेट्टी यांची अमानुष हत्या केली होती. या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने आपल्या हाती घेतल्यानंतर त्या यंत्रणेने सुहास शेट्टी यांची हत्या करण्याचा कट कसा रचला गेला, याचे धागेदोरे शोधून काढले आहेत. सुहास शेट्टी यांची हत्या करण्याचा कट किमान तीन महिने आधी रचला गेला होता. जानेवारी 2025 मध्ये ही हत्या करण्यासाठी आदिल मेहरुफ याने अब्दुल सफवान यांच्या टोळीस तीन लाख रुपये दिले होते, अशी माहिती हाती लागली आहे. सुहास शेट्टी यांचा दिनक्रम कसा असतो, ते कधी, कोठे जातात, याचा तपशीलवार अभ्यास मारेकर्यांकडून करण्यात आला. अब्दुल साफवन याने स्वतः ही सर्व पाहणी केली होती. समजा, पहिली योजना अयशस्वी ठरली, तर दुसरी योजनाही मारेकर्यांनी तयार ठेवली होती. सुहास शेट्टी आणि त्यांचे सहकारी मंगळुरु शहरातील बाजपे भागात कधी येणार, याची माहिती मारेकर्यांना पुरविण्यामध्ये अतिरेकी अझहर कालवर याने महत्त्वाची भूमिका बजाविली होती. ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’ने या हत्येसंदर्भात दि. 3 मे रोजी आठजणांना, आणखी तीनजणांना दि. 15 मे रोजी आणि आणखी एकास दि. 3 जून रोजी ताब्यात घेतले. आपल्याला बंदी घालण्यात आलेल्या ‘पीएफआय’चा पाठिंबा मिळत असल्याचे आणि ‘पीएफआय’चे हे सदस्य विदेशात असल्याचे पकडण्यात आलेल्या काहींनी तपास यंत्रणेला सांगितले. ती माहिती लक्षात घेऊन या घटनेचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न राष्ट्रीय तपास यंत्रणा करीत आहे. स्थानिक पातळीवर पैसे पुरवून शेट्टी यांची हत्या करण्यात आल्याचा समज पसरविला जात होता. पण, राष्ट्रीय तपास यंत्रणेने जी चौकशी केली ती लक्षात घेता, या हत्येमागे परकीय शक्ती आणि बंदी घालण्यात आलेल्या ‘पीएफआय’चा हात असल्याचे चौकशीत दिसून आले आहे. पकडण्यात आलेले बहुतांश बंदी घालण्यात आलेल्या ‘पीएफआय’शी संबंधित असल्याच्या वृत्तास राष्ट्रीय तपास यंत्रणेने दुजोरा दिला आहे. ‘पीएफआय’चे हस्तक आपल्या विरोधकांची हत्या करण्यामध्ये कसे सक्रिय आहेत, त्याची प्रचिती यावरून येते.
दहशतवादाचे उदात्तीकरण?
‘अकाल तख्त’ आणि ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’ यांच्याकडून अतिरेकी कारवायांशी संबंधित असलेल्यांचे आणि हिंसाचारात दोषी ठरलेल्यांचे किंवा शिक्षा भोगत असलेल्यांचे समर्थन केले जात असल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली जात आहे. ‘अकाल तख्त’ आणि ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’कडून अशा अतिरेक्यांबद्दल सन्मान व्यक्त करणारे प्रस्ताव संमत केले जात आहेत, तसेच त्यांना आर्थिक मदत केली जात आहे, 2015 ते 2025 या कालावधीत ‘अकाल तख्त’ आणि ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’ यांच्याकडून अतिरेक्यांचे उदात्तीकरण करण्याच्या किमान नऊ ठळक घटना घडल्या आहेत. समाजमाध्यमावर सक्रिय असलेल्या कांचन कुमारी ऊर्फ कमल कौर यांच्या हत्येसंदर्भात ‘अकाल तख्ता’चे प्रमुख ग्रंथी ग्यानी मलकीत सिंह यांनी दि. 17 जून रोजी एक वादग्रस्त निवेदन प्रसिद्ध करून या हत्येचे समर्थन केले होते. आपल्या निवेदनात त्यांनी ‘काही चुकीचे घडले नाही,’ असे म्हटले होते. अन्य एका घटनेत ‘अकाल तख्ता’चे अन्य एक जथेदार ग्यानी कुलदीप सिंह यांनी खा. अमृतपाल सिंह यांच्या ‘रासुका’ची मुदत वाढविल्याबद्दल तीव्र निषेध नोंदविला होता. ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’च्या प्रमुखानीही अमृतपाल सिंह यांच्या ‘रासुका’ला मुदतवाढ दिल्याबद्दल निषेध केला होता. गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत जर्नेलसिंह भिंद्रनवाले यांच्या संदर्भात जे वक्तव्य केले होते, ते वक्तव्य शीख समाजाचा अवमान करणारे असल्याचे ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’ने म्हटले होते. तसेच या समितीकडून भिंद्रनवाले याचे समर्थन करण्यात आले. या संदर्भात शिरोमणी गुरुद्वारा समितीने दि. 29 मार्च या दिवशी एक प्रस्ताव संमत करून त्यामध्ये भिंद्रनवाले हे ‘राष्ट्रीय हुतात्मा’ असल्याचा उल्लेख केला होता. ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’, दल खालसा आणि अकाल तख्ताचे जथेदार ग्यानी रघबीरसिंह यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात, केंद्रीय शीख वस्तु संग्रहालयात हरदीप सिंह निज्जर आणि अन्य काही खलिस्तानी अतिरेक्यांची छायाचित्रे लावण्यात यावीत, अशी मागणी केली होती.
‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’ने दि. 27 जानेवारी 2023 रोजी दहशतवाद आणि अन्य गंभीर गुन्ह्यांखाली कारागृहात असलेल्या नऊजणांना दरमहा 20 हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला. पतियाळा येथील गुरुद्वारामध्ये एका महिलेची हत्या झाल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या निर्मलजित सिंह याला कायदेशीर मदत करण्याचा निर्णय ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’ने दि. 16 मे 2023 रोजी घेतला. ‘शिरोमणी गुरुद्वारा समिती’च्या तत्कालीन अध्यक्षांनी दि. 9 नोव्हेंबर 2017 रोजी खलिस्तानच्या समर्थनार्थ दिल्या जाणार्या घोषणांचे समर्थन केले होते. ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’चे प्रमुख अवतार सिंह मक्कर यांनी दि. 30 जून 2015 रोजी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेऊन खलिस्तानी अतिरेकी वरयामसिंह याची सुटका करावी किंवा त्यास अन्यत्र हलविण्यात यावे, अशी विनंती केली होती. अकाल तख्त किंवा ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’ राष्ट्रहित लक्षात न घेता, कशा प्रकारे वर्तन करीत आहेत, त्याची कल्पना यावरून यावी!