भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील संघटनात्मक नेतृत्वाचा एक महत्त्वाचा टप्पा मंगळवारी गाठला जाणार आहे. रविंद्र चव्हाण हे कार्यकर्त्यांमधून घडलेले, संघटनेतून पुढे आलेले आणि पक्षासाठी अखंड काम करत राहिलेले नेतृत्व आता भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. ही निवड केवळ एक सोपस्कार नाही, तर भाजपच्या संघटनात्मक पुनर्रचनेच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे.
रविंद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास हा कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा आहे. डोंबिवलीत नगरसेवक म्हणून त्यांनी 2005 मध्ये काम सुरू केले आणि त्यानंतर 2009 पासून सलग चार वेळा ते या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यांची लोकप्रियता केवळ मतदारसंघापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण पक्षसंघटनेमध्ये आहे. त्यामागे आहे ते संघटनेतील प्रत्येक टप्प्यावर त्यांनी केलेले सातत्यपूर्ण आणि निःस्वार्थ काम. त्यांचे खरे बलस्थान म्हणजे कार्यकर्त्यांशी असलेली जवळीक. संयमी भाषाशैली, स्पष्ट संवाद, आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनाचा ठाव घेणे, ही त्यांच्या कामाची ओळख. भाजपमध्ये ते ‘संघटनेचा माणूस’ म्हणून ओळखले जातात. पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेतील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. तब्बल दीड कोटी सदस्य नोंदवून ही मोहीम राज्यभर राबवताना त्यांनी पक्षाचे नेटवर्क अधिक बळकट केले. ही मोहीम केवळ आकडेवारीसाठी नव्हती, तर कार्यकर्त्यांच्या मनात पक्षाबद्दल आत्मीयता निर्माण करणारी होती.
2019 नंतर त्यांनी पक्षाच्या कोकण विभागात जी संघटनात्मक बांधणी केली, तीही तेवढीच प्रभावी ठरली. स्थानिक पातळीवरील मतभेद मिटवणे, गटातल्या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणे आणि विरोधी पक्षातील प्रभावशाली नेत्यांना भाजपमध्ये आणणे, या सर्व आघाड्यांवर त्यांनी यशस्वी कामगिरी केली. काँग्रेस, उबाठा, शरद पवार गट, मनसे अशा पक्षांतील अनेक नेते आणि हजारो कार्यकर्ते चव्हाण यांच्या संवादकौशल्यामुळेच भाजपकडे वळले. रविंद्र चव्हाण यांनी कधीच ‘न्यूज सायकल’साठी स्वतःला पुढे केले नाही. याउलट कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेणे, प्रत्येक घटकाशी नियमित संपर्क ठेवणे, वाद न होता संवादातून मार्ग काढणे, ही त्यांची कार्यपद्धती कार्यकर्त्यांच्या मनात त्यांचे वेगळे स्थान निर्माण करत गेली. ‘इंडिगो’ एअरलाईन्समधील हजारो कर्मचारी आणि माथाडी कामगार संघटनांशी त्यांनी बांधलेला संवाद म्हणजे त्यांच्या संघटनकौशल्याचे ताजे उदाहरण आहे.
आज जेव्हा भाजप राज्यात महायुतीचा भागीदार म्हणून मोठ्या राजकीय लढाईसाठी सज्ज होत आहे, तेव्हा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अशा नेत्याकडे जाणे, जो गटबाजीपासून दूर राहून कार्यकर्त्यांना एकत्र ठेवतो, हे पक्षाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. पक्षांतर्गत संतुलन राखणे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संघटना बळकट करणे आणि दिशा देणे, ही सर्व कामे त्यांच्याकडून अपेक्षित आहेत. रविंद्र चव्हाण यांचा स्वभाव शांत, समजूतदार, पण निर्णयक्षम आहे. ते प्रसंगी आवश्यक ती भूमिका बजावतात, पण त्यात आरडाओरडा नसतो. ही नेतृत्वशैली आजच्या काळात पक्षासाठी आवश्यक आहे. भाजपने त्यांच्या या गुणांवर विश्वास दाखवून त्यांना सर्वोच्च संघटनात्मकपद दिले, हे पक्षाच्या निर्णयक्षमतेचे सर्वोत्तम उदाहरण ठरते. त्यांनी आज भलेही केवळ एक अर्ज भरलेला असेल, पण तो अर्ज पक्षसंघटनेला पुन्हा ऊर्जा देणारा आहे. कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असलेला नेता आता पक्षाच्या सर्वोच्च पदावर पोहोचला आहे. ही निवड ही केवळ नेतृत्वाची नव्हे, तर कार्यकर्त्यांना दिलेली सर्वात मोठी भेट आहे.
रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून भाजपला एक नवसंजीवनी मिळेल, संघटना आणखी मजबूत होईल आणि आगामी निवडणुकीसाठी पक्ष अधिक सुसज्जपणे उभा राहील, अशीच कार्यकर्त्यांची आणि शीर्ष नेत्यांची अपेक्षा आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!