नुकतेच तामिळनाडूमधील विराट हिंदूशक्तीचे दर्शन सर्वस्वी सुखावणारे आणि सत्ताधारी द्रमुक सरकारला हादरवणारे ठरले. ज्या तामिळनाडूतील सत्ताधार्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यूृ-मलेरियाशी करण्याचा नीचपणा दाखवला, आज त्याच तामिळनाडूमध्ये चार लाख मुरुगन भक्तांनी केलेला हिंदू एकतेचा शंखनाद भविष्यातील राजकीय परिवर्तनाकडे अंगुलीनिर्देश करणारा ठरावा.
तामिळनाडू राज्यात अलीकडेच त्रिपुराकुन्द्रम या ठिकाणी मुरुगन भक्तांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भगवान मुरुगन यांच्याबद्दल श्रद्धा व्यक्त करण्यासाठी या परिषदेस चार लाख हिंदू उपस्थित होते. ‘मुरुगन भक्तार्गळ मानाडू’ या नावाने संपन्न झालेल्या या परिषदेस संपूर्ण तामिळनाडूमधून चार लाख मुरुगन भक्त उपस्थित होते. या कार्यक्रमास एवढी गर्दी झाली होती की, अन्य एक लाख मुरुगन भक्तांना सभामंडपात प्रवेश करणे शक्य झाले नाही. या परिषदेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. सुमारे एक कोटी भाविकांनी हे थेट प्रक्षेपण पाहिले. या परिषदेत सहा प्रस्ताव संमत करण्यात आले. दर महिन्याच्या षष्ठी तिथीस सामूहिक ‘स्कंद षष्ठी कवसम’ पठण केले जावे, शासनाने मंदिराचे व्यवस्थापन स्वतंत्र अशा तज्ज्ञ समितीकडे सोपवावे, मुरुगन देवतेशी संबंधित केवळ सहा देवस्थानेच नव्हे, तर या देवतेशी संबंधित सर्व डोंगर यांचे जतन करण्यात यावे, असे प्रस्ताव संमत करण्यात आले. त्याचप्रमाणे, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल सरकारचे अभिनंदन करणारा प्रस्तावही यावेळी संमत करण्यात आला.
या परिषदेत ‘हिंदू मुन्ननी’ या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कदेश्वर सुब्रमनियन यांनी भगवान मुरुगन यांचे तामिळ आध्यात्मिक जीवनात किती महत्त्व आहे, हे विशद केले. तसेच, मुरुगन भक्तांचे पवित्र स्थान असलेल्या त्रिपुराकुन्द्रम डोंगर परिसराचे इस्लामीकरण करण्याचे जे वाढते प्रयत्न सुरू आहेत, त्यांकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. या परिषदेस आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी तामिळ भाषेत भाषण करून उपस्थितांना प्रभावित केले. मदुराई हे पवित्र स्थान आहे आणि मुरुगन ही देवता अवतार असून, ती आपणास सतत प्रेरणा देत असल्याचे पवन कल्याण यांनी सांगितले. भाषणस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदू श्रद्धांवर सातत्याने जे हल्ले कित्येक काळापासून होत आहेत, त्यावर त्यांनी टीका केली. तसेच “धार्मिक कट्टरतावादाचा मुद्दा आला की राजकारणी नेते मूग गिळून गप्प का असतात?” असा प्रश्न पवन कल्याण यांनी उपस्थित केला. तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष नयनार नागेनतीरन यांनी आपल्या भाषणात “हिंदूंच्या अधिकारांची पायमल्ली करू पाहात असलेल्या शक्तींच्या विरुद्ध संघटित लढा देण्याची आवश्यकता आहे,” असे ते म्हणाले. तामिळनाडूमधील भाजप नेते के. अण्णामलाई यांनी “या परिषदेस उपस्थित असलेला जनसमुदाय लक्षात घेता, ढोंगी निधर्मीवादाविरुद्ध हिंदू जागृत होत चालल्याचेच दिसून येत आहे,” असे सांगितले. या परिषदेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दक्षिण क्षेत्र संघचालक वान्नीराजन यांनी संबोधित केले. या भव्य परिषदेस विविध संतमहंत, धार्मिक नेते, तामिळनाडू भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अण्णाद्रमुकचे नेते उपस्थित होते. अलीकडील काळात तामिळनाडूच्या इतिहासातील हिंदू समाजाचे हे सर्वांत विशाल एकत्रीकरण असल्याचे आणि तामिळनाडूच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणावर या परिषदेचा निश्चित परिणाम होईल, असा अंदाज राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केला आहे.
केरळ : ‘एसएफआय’च्या गुंडांचा हल्ला
केरळमध्ये राजकीय हिंसाचाराचे सत्र सुरूच असून तेथील डाव्या सरकारच्या आशीर्वादाने विरोधकांवर हल्ले केले जात आहेत. अलीकडेच ‘एसएफआय’ या डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चे प्रदेश सचिव इ. यु. ईश्वरप्रसाद यांच्यावर दि. 21 जून रोजीच्या रात्री राजकीय वैमनस्यातून जीवघेणा हल्ला केला. तिरुअनंतपुरम् रेल्वेस्थानकालगत एका उपहारगृहात भोजनासाठी ईश्वरप्रसाद जात असताना त्यांना ‘एसएफआय’च्या गुंडांनी घेरले आणि त्यांना जबर मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. केरळ सरकारने ‘पीएमश्री योजना’ ही जाणूनबुजून फेटाळून लावल्याच्या निषेधार्थ विद्यार्थी परिषदेने राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा कार्यक्रम ‘अभाविप’ने आयोजित केला होता. आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी असलेली ‘पीएमश्री योजना’ केरळ सरकारने स्वीकारली नाही. त्या निषेधार्थ ‘अभाविप’ने आक्रमक भूमिका घेतली. ‘अभाविप’चे आंदोलन लक्षात घेऊन ‘एसएफआय’च्या गुंडांनी ‘अभाविप’च्या प्रदेश सचिवांवर जीवघेणा हल्ला केला. या भ्याड हल्ल्याचा ‘अभाविप’चे राष्ट्रीय महासचिव डॉ. वीरेद्र सिंह सोलंकी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. मार्क्सवादी सरकार, केरळचे शिक्षणमंत्री आणि ‘एसएफआय’च्या पाळीव गुंडांनी हा हल्ला केला, असा आरोप त्यांनी केला. या हल्ल्याबद्दल मार्क्सवादी विद्यार्थी संघटनेच्या गुंडांचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.
संघ कार्यकर्त्यांच्या दारांवर मध्यरात्रीची थाप!
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जारी केलेल्या घटनेस 50 वर्षे होत आहेत. पण त्या दिवसांची आठवण होईल, असे वर्तन कर्नाटक सरकारकडून होत असल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकमधील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि अन्य हिंदू कार्यकर्ते यांच्या घरांवर काही कारण नसताना पोलिसांकडून मध्यरात्री थापा मारल्या जात आहेत. या कार्यकर्त्यांची छायाचित्रे काढून ती अपलोड करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात असल्याचे दिसून आले आहे. त्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतल्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने दक्षिण कन्नड पोलिसांना धारेवर धरले असून त्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना नोटीस बजावली आहे. राज्य पोलिसांच्या या कृतीचा हिंदू नेत्यांनी निषेध केला असून कर्नाटक हे ‘पोलीस राज’ बनले आहे की काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे. कोणत्याही प्रकारचे वॉरंट नसताना किंवा कोणत्याही प्रकारचे आरोप नसताना पोलिसांनी मध्यरात्री जे धाडसत्र अवलंबिले, त्याचा विविध नेते आणि संघटना यांच्याकडून निषेध केला जात आहे. वरिष्ठांच्या आदेशावरून आम्ही ही कारवाई केली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असले, तरी त्या संदर्भातील कोणतीही कागदपत्रे पोलिसांना सादर करता आली नाहीत. 50 वर्षांपूर्वीच्या आणीबाणीचे स्मरण करून देणारे असे पोलिसांचे वर्तन होते!
प. बंगालमध्ये हिंदू समाज आक्रमक
प. बंगालमधील 24 परगणा जिल्ह्यातील एका शाळेत तेथील मुस्लीम शिक्षकाने एका हिंदू विद्यार्थ्याच्या गळ्यातील तुळशीची माळ सक्तीने काढून टाकण्याचे वर्तन केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद हिंदू समाजात उमटले. त्या घटनेचा हिंदू समाजाकडून निषेध केला जात आहे. बेतबेरिया येथे असलेल्या संग्रामीनगर उच्च माध्यमिक शाळेत हा प्रकार घडला. त्या शाळेतील एका मुस्लीम शिक्षकाने हिंदू विद्यार्थ्याच्या गळ्यातील माळ खेचली आणि ती तोडून टाकली. हे कृत्य करणार्या शिक्षकाचे नाव अब्दुल हदीद असे आहे. मुस्लीम शिक्षकाने केलेल्या या कृत्याची बातमी पसरताच, त्या शाळेतील हिंदू विद्यार्थ्यांचे पालक आणि अन्य स्थानिक नागरिक शाळेसमोर जमले. हे कृत्य करणार्या शिक्षकास निलंबित करण्यात यावे आणि पोलिसांनी त्यास अटक करावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत होती. उपस्थित जनतेने निषेधाचे फलक हाती घेऊन ही निदर्शने केली. अशा घटना घडत असल्या, तरी पोलीस बघ्याची भूमिका घेतात, असा आरोप हिंदू समाजाकडून करण्यात आला. घटनास्थळी पोलीस आले, पण त्यांनी कोणत्याही गुन्ह्याची नोंद केली नाही किंवा संबंधित मुस्लीम शिक्षकास अटक केली नाही. प. बंगालमध्ये हिंदू समाजावर अन्याय होत असतानाही पोलीस कशी बघ्याची भूमिका घेत आहेत, ते या उदाहरणावरून दिसून येते.