
नवी दिल्ली : शिस्त आणि सुव्यवस्थेसाठी उचललेली पावले कधीकधी अशा क्रूरतेत बदलतात, ज्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येत नाही; असे मत मांडून काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पुन्हा काँग्रेस नेतृत्वास आणीबाणीवरून कोंडीत पकडले आहे.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मल्याळम भाषेतील 'दीपिका' या वृत्तपत्रात एक लेख लिहिला आहे. तो गुरुवारी प्रकाशित झाला. त्यांनी लिहिले की, शिस्त आणि सुव्यवस्थेसाठी उचललेली पावले कधीकधी अशा क्रूरतेत बदलतात, ज्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येत नाही. इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांनी सक्तीची नसबंदी मोहीम सुरू केली. हे आणीबाणीचे क्रौर्याचे उदाहरण बनले. ग्रामीण भागात मनमानी लक्ष्य साध्य करण्यासाठी हिंसाचार आणि बलाचा वापर करण्यात आला. नवी दिल्लीसारख्या शहरांमध्ये, झोपडपट्ट्या निर्दयपणे पाडण्यात आल्या आणि त्या साफ करण्यात आल्या. हजारो लोक बेघर झाले. त्यांच्या कल्याणाची काळजी घेतली गेली नाही, असे थरूर यांनी म्हटले आहे.
थरूर म्हणाले की, सत्तेचे केंद्रीकरण करण्याचा, मतभेदांना दडपण्याचा आणि संवैधानिक सुरक्षा उपायांना टाळण्याचा मोह विविध स्वरूपात पुन्हा येऊ शकतो. अनेकदा अशा प्रवृत्ती राष्ट्रीय हिताच्या किंवा स्थिरतेच्या नावाखाली न्याय्य ठरू शकतात. या अर्थाने, आणीबाणी हा एक कडक इशारा आहे. लोकशाहीच्या रक्षकांनी नेहमीच जागरूक राहण्याची गरज आहे, असेही थरूर यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.