
मुंबई : भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी आणि अनेकविध मोहिमांमध्ये दाखवलेल्या सामर्थ्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण 'सिंदूर उड्डाणपूल' असे करण्यात आले आहे. 'सिंदूर' नावामागे राष्ट्राभिमान आणि सैन्याच्या पराक्रमाचे प्रतीक दडले आहे, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) रेल्वेपुलाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. नियोजित वेळेत प्रकल्पाचे आव्हानात्मक काम पार पडल्याबद्दलही मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका अधिकारी आणि अभियंत्यांचे कौतुक केले.
दक्षिण मुंबईत मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि' मेलो मार्गाला जोडणाऱ्या सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार, दि. १० जुलै २०२५ रोजी करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार तथा मुख्य प्रतोद मनीषा कायंदे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्यासह विविध मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.
यावेळी संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हा पूल अनेक वर्षे ‘कर्नाक पूल’ या नावाने ओळखला जात होता. तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर कर्नाक यांचे नाव पुलाला देण्यात आले होते. प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या सातार्याच्या इतिहासात उल्लेख आहे की, गव्हर्नर कर्नाक यांच्या काळात छत्रपती प्रतापसिंह महाराज, मुधोजी राजे यांच्यावर अन्याय करण्यात आला. भारतीयांवर गंभीर स्वरूपाचे खोटे आरोप लादण्यात आले. त्यामुळे अशा काळ्या इतिहासाशी संबंधित नामकरण हटविणे गरजेचे आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यानंतरच्या काळात इतिहासातील अशा काळ्या खुणा पुसण्याची गरज अधोरेखित केली आहे. या विचारधारेनुसार, हा पूल 'कर्नाक पूल' या जुन्या नावाऐवजी यापुढे ‘सिंदूर उड्डाणपूल’ या नव्या नावाने ओळखला जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्याच्या उद्देशाने कर्नाक उड्डाणपुलाचे नामकरण आता 'सिंदूर उड्डाणपूल' असे करण्यात आले आहे. या नावामागे राष्ट्राभिमान आणि सैन्याच्या पराक्रमाचे प्रतीक दडले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई महानगरपालिकेकडे पत्राद्वारे नामकरणाचा प्रस्ताव सादर केला होता. या नामकरण प्रस्तावाला महानगरपालिका प्रशासनाने मान्यता दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. या पुलामुळे मुंबईतील वाहतूक सुलभ होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी अखेरीस व्यक्त केला.