जग तुमची वाट पाहत आहे

    12-Oct-2023   
Total Views |
vba-chief-prakash-ambedkar-on-pm-narendra-modi

"मोदींना हिमालयात आताच पाठवा,” असे प्रकाशबापू म्हणजे प्रकाश आंबेडकर म्हणाले. दुर्देव हेच की प्रकाश यांची ही इच्छा देशातली कोट्यवधी जनता पूर्ण करू इच्छित नाही. कारण, ‘मोदी हैं तो मुमकीन है!’ पंतप्रधानपदी मोदी आहेत, म्हणून देश आणि समाज सुरक्षित आहे, असे कोट्यवधी भारतीयांना वाटते. याउलट, “मोदींना आताच हिमालयात पाठवा,” असे प्रकाशबापूंनी म्हटल्यावर काही लोकांनी प्रतिक्रिया दिल्या की, मोदींनी हिमालयात जाण्याआधी आता प्रकाशबापूंना क्रांती करण्यासाठी पहिले गाझा पट्टीवर जायला पाहिजे. तसेच एकटे न जाता त्यांनी सोबत ‘सेव्ह गाझा’चे टीशर्ट घालून मुंब्रामध्ये जनजागृती करणार्‍या जितेंद्र आव्हाडांनाही सोबत घेऊन जावे. तिथे प्रकाशबापू, जितेंद्र आव्हाड आणि हो ती ‘डफली गँग’ यांना काम करण्याची खूप संधी आहे. लोक असेही म्हणताता की, तिथे गेल्यावर प्रकाशबापू पॅलेस्टाईन त्याचबरोबर ‘हमास ते इस्रायल‘ यावर त्यांची नितांत मोलाची निरीक्षण मांडतील. क्रांती कशी करावी वगैरे भाषण करतील. त्यानंतर ‘डफली गँग’ तिथे डफली वाजवून मनुवादी, हिंदुत्ववादी, हिंदूचे देव धर्म श्रद्धा भरीसभर रा. स्व. संघ आणि भाजप यावर गळ्यात जीव येईपर्यंत ओरडून ओरडून बोलतील. ‘लेके रहेंगे आझादी’ म्हणत पार चेकाळून जातील. बुद्धाची करुणा, शांती वगैरे ते सांगणार नाहीत. छे छे! प्रकाशबापूंना तरी सहसा कोणी बुद्धांची करूणा वगैरेबद्दल बोलताना ऐकले का? ते बोलत नाहीत. मग ‘डफली गँग’ कशी बोलणार? काय म्हणता पॅलेस्टाईनला गेल्यावर भाजप, रा. स्व. संघ आणि हिंदूंबद्दल बोलून काय फायदा? तर फायदा असो का नसो, जिथे मिळेल तिथे हिंदू, रा. स्व. संघ, भाजप त्यातही मोदींविरोधात तर्कहीन बोलायचे, हे त्यांच्यामते शास्त्र आहे. ते पाळतात ते शास्त्र. विषय कोणताही असू दे, इतिहास असू दे, गणित असू दे की, विज्ञान असू दे की, भाषाशास्त्र असू दे. हिंदू, रा. स्व. संघ, भाजप आणि मोदी यांच्याविषयी तर्कहीन बोलल्यावरच या लोकांना शांती, सुख, समाधान मिळते. पुन्हा मुद्द्याकडे येऊ. पॅलेस्टाईनमध्ये प्रकाशबापूंनी योगदान द्यावे, सोबत ‘सेव्ह गाझा’ फेम जितेंद्र आव्हाड यांनाही घ्यावे, ही काही लोकांची इच्छा. प्रकाशबापू लोकनेते आहेत. लोकांची इच्छा त्यांनी पूर्ण करायला हवी. मोदी जागतिक नेते आहेत, असे सगळे म्हणतात. प्रकाशबापू पॅलेस्टाईनला गेल्यावर ते जागतिक नेते आहेत, हे सिद्ध होईल. त्यामुळेच प्रकाशबापू आगे बढो, जग तुमची वाट पाहत आहे!

काका, गेले ते दिन गेले...

महिलांनी रस्त्यावर उतरावे, तुमच्यावरील गुन्हे आपलं सरकार आल्यावर हटवू,” असे शरद पवार नुकतेच म्हणाले. पण, महिला काय फक्त रस्त्यावर उतरून गुन्हेगार म्हणून केसेस अंगावर घेण्यासाठीच आहेत का? महिला कार्यकर्त्यांनी आंदेालन करायची, तुरूंगवास भोगायचा आणि संसदेत खासदार म्हणून मिरवायचे, फक्त सुप्रिया सुळे यांनीच का? वा रे वा! राष्ट्रवादी पक्षच महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देणार, अशी मागे त्यांच्या पक्षातल्या लोकांनी बॅनरबाजी केली होती. रस्त्यावर उतरून आंदोलन करून केसेस अंगावर घेणाार्‍या महिलांपैकी एकीला तरी शरद पवार महिला मुख्यमंत्री म्हणून जाहीर करतील का? यावर कुणी म्हणेल की, शरद पवार मणिपूरच्या घटनेसंदर्भात असे बोलले. पण, मग मणिपूरसारख्या घटना तर बिगर भाजपशासित राज्यातही घडतात. तिथे अशा घटना घडल्यावर महिलांनी रस्त्यावर उतरायचे की नाही? याबद्दल ते काहीच बोलले नाहीत. कायदा-सुव्यवस्थेला लाथाडत, महिला रस्त्यावर उतरल्या आणि त्यासाठी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली, तर तेव्हा शरद पवार काय करणार आहेत? ज्या महिलांवर कारवाई झाली, त्यांच्यावरचे गुन्हे म्हणे शरद पवार त्यांचे सरकार सत्तेत आल्यावर मागे घेणार आहेत. काय तो शरद पवारांचा उदंड आशावाद! शरद पवार कधी सत्तेवर येतील, याबद्दल कुणाला तरी खात्री आहे का? सत्ता येणारच नाही, तर या महिलांनी आयुष्यभर तुरूंग आणि कोर्टकचेरीच करावी का? असो, महिलांना आरक्षण मिळावे, यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला, असेही ते सांगतात. पण, त्यांनी सांगून काय फायदा? संसदेत जेव्हा केंद्र सरकारने महिला आरक्षणाचा कायदा पारित केला, तेव्हा शरद पवार आणि त्यांची लेक सुप्रिया तसेच त्यांच्या समविचारी नेत्यांनी केंद्र सरकारच्या आरक्षणाविरोधात कोल्हेकुई करायला सुरुवात केली. आरक्षणाच्या हक्कांबाबत फाटे फोडायला त्यांनी सुरुवात केली. असे फाटे फोडल्यानंतर आरक्षणाच्या हक्काची अंमलबजावणी करायला विलंब होईल, असे बहुतेक या लोकांना वाटत असावे. शरद पवार यांनी विचार करावा, भारत बदलत आहे. १२ बॉम्बस्फोट घडूनही १3 बॉम्बस्फोट घडले, असे धादांत खोटे बोलून कुणाचे तरी लांगूलचालन आणि कुणाची तरी फसवणूक करीत राज्य भोगण्याचे दिवस गेले. त्यामुळे सातत्याने लोकांना चिथावूनही काहीच साध्य होणार नाही. शरदकाका गेले, ते दिवस गेले!

९५९४९६९६3८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.