कथा वनस्पतींच्या उत्क्रांतीची

    05-Jun-2025
Total Views |
कथा वनस्पतींच्या उत्क्रांतीची
जुन्या ‘ज्युरासिक पार्क’ सिनेमात एक वाक्य होते, 'Life finds a way' निसर्ग सातत्याने उत्क्रांत होतो. आजचा कोणताही सजीव हा उद्या तसाच राहात नाही. वनस्पतीदेखील याच अवस्थेतून गेल्या आहेत. अशा या वनस्पतींच्या उत्क्रांतीचा मागोवा घेणारा हा लेख...


आधुनिक वनस्पती वर्गीकरण शास्त्राआधी दुसर्‍या शतकात जेव्हा पुनर्वसू-अग्निवेश यांसारखे विद्वान वनात फिरून आयुर्वेदासोबत प्राचीन वनस्पतीशास्त्राचा पाया रचत होते, तेव्हा ते याच वनात फिरून अभ्यास करत असतील, अशी वनस्पती अभ्यासकांची भावना. चरक-सुश्रुतांनी भरभक्कम प्राचीन वनस्पती वर्गीकरणशास्त्राचा गडकोट बांधला. तो इतका चोख होता की, आधुनिक वनस्पती वर्गीकरण येण्याआधीच हे ज्ञान भारतीय उपखंडातून इतरांना गुरुकुल पद्धतीने आणि नंतर नालंदा-तक्षशीलेच्या माध्यमातून देण्यात आले. हे ज्ञान आजतागायत अव्याहतपणे आयुर्वेदाच्या माध्यमातून सुरुच आहे. चरकसंहितेत 600च्या आसपास, तर सुश्रुतसंहितेत 775 वनस्पतींचा उल्लेख आहे. याव्यतिरिक्त ऋग्वेदात 67, यजुर्वेदात 82 आणि अथर्वात 288 झाडांचा उपयोगांचा समावेश आहे. आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद समजला जातो. उपनिषदात 32 झाडांचा उपयोगासह उल्लेख आढळतो. वनस्पतींच्या प्रवृत्तींवरून त्यावेळी वर्गीकरण केले जात होते. आज हेच वर्गीकरणशास्त्र विक्राळ रूपात उपलब्ध आहे, जे अगदी जनुकीय फरकांवरती येऊन पोहोचले आहे.

भारतातील वेद, उपवेद, उपनिषदे, निघंटु, संहिता, व्याख्या यांतून वर्णन आणि वर्गीकरण केलेल्या वनस्पतींचा संदर्भ घेऊन लिनायसने आधुनिक वर्गीकरणशास्त्रात त्यांचा समावेश केला. गंमत म्हणजे, लिनायसचे काम सुरू होण्याआधीच आपल्या लोकांनी वनस्पतींचे वर्णन आणि वैशिष्ट्यांसह चित्रण तयार करून ठेवले होते. अगदी लॅटिन भाषेतदेखील ते उपलब्ध होते. या प्राचीन वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासाला ’एींहपेलेींरपू’ म्हटले जाते. आज भारतात 170 पेक्षा जास्त वनस्पती वर्ग सापडतात. त्यात 2 हजार, 500 पेक्षा जास्त कूळ आहेत, तर आजमितीला भारतात 47 हजारांहून अधिक विविध प्रजाती नांदत आहेत. नील-हरित शेवाळांच्या सूक्ष्म अवस्थांनी सुरुवात झालेले वनस्पतींचे जग वेगवेगळे टप्पे मांडत आजच्या महाकाय विशाल वृक्षांपर्यंत येऊन ठेपले. शेवाळं, बुरशा, कवकं, ब्रायोफाईट्स, टेरिडोफाईटस (नेचे वर्ग), एंजिओस्पर्म या उत्क्रांतीचे टप्पे. ही कधी समांतर झाली, कधी एकल झाली. गरम पाण्याच्या झर्‍यात वाढणार्‍या वनस्पती (शैवाले) तयार झाल्या, कधी खार्‍या पाण्यात निपजणार्‍या वनस्पतींची निर्मिती झाली. प्रतिदीप्त चमकणार्‍या वनस्पती तयार झाल्या, तर कधी दुसर्‍या वनस्पतींवर जगणार्‍या वनस्पती अवतरल्या. हे सगळं घडायला अनंत कोटी वर्षे लागली. डायनोसोर इथे येण्याच्या आधी याची सुरुवात झाली. मतमतांतरे असली, तरी क्रेटेशश काळापासून पर्णधारी वनस्पतींचे जग भूतलावर अवतरू लागले.

गडकिल्ल्यांवर फिरताना भिंतींवर दिसणार्‍या ‘मॉसेस’, ‘रिक्सीया’, ‘हॉर्नवर्ट’सारख्या इवल्या वनस्पतींनी जगाचा ताबा घ्यायला सुरुवात केली. बागेत शोभेसाठी लावतो, त्या नेचेवर्गीय वनस्पतींचे जग तयार झाले. या वनस्पतींच्या पानामागे एका रेषेत यांच्या बिया तयार होत. हे होता होता समांतर सायकस, देवदारसारखे जरा दिमाखदार वृक्ष तयार होऊ लागले. इथपर्यंत फुलांचा मागमूसही या झाडांना नव्हता. सगळ्यांच्या फक्त बिया तयार होत. त्यातही बरेचजण लिंगद्वयी होते. काही एकच झाड नर-स्त्री बिजे वेगवेगळी तयार करणारे होते. तोवर फुलांची झाडे तयार होऊ लागली होती. ती पाण्यात पहिल्यांदा तयार झाली असावीत किंवा पाणी-जमीन दोन्ही ठिकाणी समांतर विकसित झाली असावीत. यांतील सगळ्यांत जुने जीवाश्म हे ज्युरासिक काळ आणि त्याही आधीचे आहेत. फुलाच्या स्त्रीकेसराच्या माथ्यावर जेव्हा परागकण पडेल, तेव्हा तो कधी फुटणार, त्यातील द्रवाचा प्रवाह बरोबर बिजांडापर्यंत त्या वेळेतच पोहोचणार, ही सगळी व्यवस्था तयार होण्यासाठी वनस्पतींना स्वतःच्या जनुकीय परिक्षेत्रात अनेक बदल करावे लागले. वनस्पतींनी ते बदल आधी तपासले, आत्मसात केले आणि त्यात बदल केला. असंख्य किड्यांचे, प्राण्यांचे योगदानसुद्धा या निर्मितीप्रक्रियेत आहे. कारण, फुले देणार्‍या वनस्पतींचे प्रजनन हे वारा किंवा पाण्यासोबत कोणीतरी इतरांनी करावे लागण्याची गरज वनस्पतींना भासली. तिथून मधमाशा, भुंगे अवतरले.

आज वनस्पतीशास्त्र, वनस्पती औषधनिर्माणशास्त्र खूपच आधुनिक झाले आहे. आयुर्वेदसंहितेच्या पुढे जाऊन ‘अल्कलॉईड’, ‘फ्लेवोनॉईड्स’, ‘फेनॉल्स’ वेगळी काढून त्यावर आधुनिक आयुर्वेदशास्त्राचा प्रवास सुरू आहे. हे सगळे अनंत कोटी वर्षांच्या वनस्पतीनिर्मितीचे फलित आहे. वनस्पतींचा हा संसार समजा विठूरायाने वसवला असेल, तर रखुमाई ही उत्क्रांतीचे रूप घेऊन, या संपूर्ण वनस्पती साम्राज्याला सामर्थ्य आणि प्रतिभा देत आलेली आहे. यात सर्वांचे एकमत असावे.


रोहन पाटील
(लेखक वनस्पती अभ्यासक आहेत)