नवी दिल्ली : (NIA Raid in Jammu Kashmir) 'राष्ट्रीय तपास संस्थे'ने (एनआयए) गुरुवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशत पसरवण्याच्या पाकिस्तान समर्थित कटप्रकरणी ३२ ठिकाणी छापे टाकले. २०२२ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, गुरुवारी सकाळपासून केंद्रशासित प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील या ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दहशतवादी कटाशी संबंधित प्रकरणात विविध दहशतवादी संघटनांच्या ओव्हरग्राउंड दहशतवाद्यांविरुद्ध ही छापेमारी करण्यात आली. जम्मू प्रांतातील दहशतवादी नेटवर्क उध्वस्त करणे आणि स्थानिक तरुणांना कट्टरतावादी बनवून आणि ओव्हरग्राउंड दहशतवाद्यांनी एकत्रित करून जम्मू आणि काश्मीरमधील शांतता आणि सांप्रदायिक सौहार्द बिघडवण्याच्या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांच्या योजना उधळून लावणे हे या छाप्यांचे उद्दिष्ट होते.
छापेमारीत त्यानंतर शोधमोहिमेत हायब्रिड दहशतवादी साहित्य, प्रतिबंधित दहशतवादी संघटनांच्या नव्याने स्थापन झालेल्या शाखा आणि सहयोगी संघटनांशी संबंधित असलेल्या परिसरांमधून डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रांसह गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये 'लष्कर-ए-तैयबा' (एलईटी), 'जैश-ए-मोहम्मद' (जेईएम), 'हिज्बुल-मुजाहिदीन' (एचएम), 'अल-बद्र' आणि 'अल-कायदा' यांचा समावेश आहे.
या संघटनांद्वारे चालवले जाणारे दहशतवादी नेटवर्क तसेच 'द रेझिस्टन्स फ्रंट' (टीआरएफ), 'युनायटेड लिबरेशन फ्रंट जम्मू अँड काश्मीर' (यूएलएफजे अँड के), 'मुजाहिदीन गजवत-उल-हिंद' (एमजीएच), 'जम्मू अँड काश्मीर फ्रीडम फायटर्स' (जेकेएफएफ), 'काश्मीर टायगर्स', 'पीएएएफ' आणि इतर अशा त्यांच्या नव्याने सुरू झालेल्या शाखा नष्ट करण्यासाठी 'एनआयए'ने दि. २१ जून २०२२ रोजी स्वतःहून खटला दाखल केला होता. या प्रकरणाच्या तपासाचा एक भाग म्हणून, एनआयए अलिकडच्या काही महिन्यांत विविध ठिकाणी कारवाई करत आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\