नवी दिल्ली, भारतीय लष्कराने स्वदेशी अत्याधुनिक ‘आकाश प्राइम’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची लडाखच्या १५,००० फूटांपेक्षा अधिक उंचीवर यशस्वी चाचणी पार पाडली आहे. लष्कराच्या हवाई संरक्षण दलाने संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या समवेत ही चाचणी पार पाडली.
या चाचण्यांदरम्यान आकाश प्राइम प्रणालीने अतिशय वेगाने हालचाल करणाऱ्या लक्ष्य विमानांवर दोन अचूक हल्ले करत त्यांच्या दिशेने थेट आघात केला. लडाखमधील अत्यंत विरळ हवामान आणि कमी ऑक्सिजनच्या परिस्थितीतही या प्रणालीने अचूक कार्यक्षमता दाखवली. लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या चाचण्या केवळ तांत्रिक यश नसून प्रत्यक्ष युद्धजन्य परिस्थितीत या प्रणालीची भूमिका किती निर्णायक ठरू शकते, याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे.
संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडेच पार पडलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यानही आकाश प्राइम प्रणालीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पाकिस्तानच्या लष्कराने चिनी बनावटीची लढाऊ विमाने आणि तुर्की बनावटीचे ड्रोन वापरत भारताच्या सीमांवर हवाई आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आकाश प्राइम प्रणालीने त्वरित प्रतिसाद देत हवाई आक्रमण निष्फळ ठरवले आणि पाकिस्तानला मोठा फटका दिला होता.
अशी आहे आकाश प्राईम• ‘आकाश प्राइम’ ही आकाश क्षेपणास्त्र प्रणालीची सुधारित आवृत्ती असून, ती उच्च अचूकतेसह अतिउंच उड्डाण करणाऱ्या लक्ष्यांवर हल्ला करू शकते.
• तिचा शोध, लक्ष्य अधोरेखित करणे, आणि क्षणात प्रतिसाद देणे या बाबतीत ती अत्याधुनिक मानली जाते.
• यामध्ये सुधारित सेंसर्स, अधिक कार्यक्षम शोध यंत्रणा, आणि जास्त उंचीवरही लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे.
• ही प्रणाली आता भारतीय लष्कराच्या तिसऱ्या व चौथ्या ‘आकाश रेजिमेंट’चा भाग बनणार असून, सीमावर्ती भागात भारतीय हवाई संरक्षण अधिक सक्षम बनवण्याचा सरकारचा उद्देश आहे.
• लवकरच ही प्रणाली अन्य संवेदनशील भागांमध्येही तैनात केली जाणार आहे.