नवी दिल्ली, राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकात सुधारणा केली आहे. त्यामध्ये दिल्ली सल्तनत आणि मुघल काळात "धार्मिक असहिष्णुतेची" अनेक उदाहरणे आढळून आल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.
विद्यार्थ्यांना सल्तनत आणि मुघल काळाची ओळख करून देणाऱ्या या पुस्तकात मुघळ शासकांचे सुयोग्य वर्णन करण्यात आले आहे. बाबराचे वर्णन ‘क्रूर आणि निर्दयी विजेता, ज्याने शहरांच्या संपूर्ण लोकसंख्येची कत्तल केली’, अकबराचे राज्य "क्रूरता आणि सहिष्णुतेचे मिश्रण" आणि ‘मंदिरे आणि गुरुद्वारा नष्ट करणारा औरंगजेब’ असे केले आहे. एनसीईआरटीने इयत्ता ८ वी साठी सामाजिक विज्ञान पुस्तकाचा भाग १, 'एक्सप्लोरिंग सोसायटी: इंडियन अँड बियॉन्ड' प्रकाशित केला. हे पुस्तक चालू शैक्षणिक सत्रात वापरण्यासाठी आहे. हे पुस्तक एनसीईआरटीच्या नवीन पुस्तकांपैकी पहिले पुस्तक आहे.
यापूर्वी १३ व्या ते १८ व्या शतकातील काळाची ओळख सुरुवातीच्या काळात ७ वी च्या विद्यार्थ्यांना करून देण्यात आली असली तरी, एनसीईआरटीने म्हटले आहे की दिल्ली सल्तनत, मुघल आणि मराठ्यांचा समावेश असलेला भारतीय इतिहासाचा काळ आता नवीन अभ्यासक्रमात फक्त ८ वी मध्येच शिकवला जाईल. पुस्तकाच्या 'भारताच्या राजकीय नकाशाचे पुनर्निर्माण' या प्रकरणात १३ व्या ते १७ व्या शतकातील भारतीय इतिहासाचा समावेश आहे. त्यामध्ये दिल्ली सल्तनतचा उदय आणि पतन आणि त्याचा प्रतिकार, विजयनगर साम्राज्य, मुघल आणि त्यांचा प्रतिकार आणि शिखांचा उदय यांचा समावेश आहे. या प्रकरणांमध्ये सुल्तनत काळाचे वर्णन राजकीय अस्थिरता आणि लष्करी मोहिमांनी केले आहे ज्यामध्ये गावे आणि शहरे लुटली गेली आणि मंदिरे आणि शिक्षण केंद्रे नष्ट झाली. सुल्तनत आणि मुघल यांच्यावरील विभागांमध्ये मंदिरांवरील हल्ले आणि काही शासकांच्या क्रूरतेचे अनेक संदर्भ आहेत.