पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मारले गेल्याने हीच बाबांना खरी श्रध्दाजंली- हर्षल लेले यांची भावूक प्रतिक्रिया

    28-Jul-2025
Total Views |

डोंबिवली,
 भारतीय सैन्याने पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना मारल्याचे वृत्त समजताच आज बाबांना खरी श्रध्दांजली मिळाली आहे अशी प्रतिक्रिया संजय लेले यांचे सुपुत्र हर्षल यांनी दिली. यावेळी तो भावूक झाला होता. बाबाचा रविवारी वाढदिवस झाला आणि सोमवारी या हल्ल्यातील दहशतवादी मारला गेल्याचे समजल्याने समाधान वाटत आहे. भारतीय लष्कर आणि सैन्याचे ही पहलगाम हल्ल्यातील बळी संजय लेले यांचे सुपुत्र हर्षल यांनी आभार मानले.

पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी तीन पर्यटक हे डोंबिवलीतील होते. त्यामध्ये संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचा समावेश होता. या तिन्ही घरातील कर्ते पुरूष गेल्याने कुटुंबांवर दुखाचा डोंगर कोसळला होता. दहशतवाद हा मूळपासून नष्ट झाला पाहिजे अशीच या कुटुंबियांची भावना होती. डोंबिवलीतील या तिन्ही पर्यटकांच्या अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डोंबिवलीत आले होते. यावेळी मृतांच्या नातेवाईकांसह नागरिकांनी मुख्यमंत्र्याकडे तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता अशी मागणी केली होती. त्यानंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये आले होते. भारतीय लष्कराच्या मदतीने सरकारने ऑपरेशन सिंदूर ही मोहिम राबविली होती. पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हल्ले करून शंभरहून अधिक दहशतवादी मारले गेले. त्यानंतर आता ऑपरेशन महादेव राबविले गेले आहे.

भारतीय सैन्याने ऑपरेशन महादेव करत काश्मीर येथे दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. यामध्ये पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मारला गेल्याचे वृत्त समजताच डोंबिवलीमधील पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले संजय लेले यांचे सुपुत्र हर्षल यांनी प्रतिक्रिया देताना भारतीय सैन्यासह सरकारचे आभार मानले. यावेळी हर्षल यांनी सांगितले, दहशतवाद विरोधातील ऑपरेशन त्यांनी सुरू ठेवले आहे. अनेकदा असे होते की काही गोष्टी घडतात आणि लोकांना नंतर त्याचा विसर पडतो आणि लोक ते विसरून देखील जातात. मात्र काश्मीरमधील हल्ल्याची दखल घेऊन दहशतवाद्यांना विरोधातील कारवाई अजूनही सुरू असल्यामुळे त्या गोष्टीचा आनंद आहे. ज्यांनी आमच्या घरच्यांना मारले त्यांच्या विरोधात हे मिशन त्यांनी सातत्याने सुरू ठेवले आहे. जोपर्यत सर्व दहशतवाद्यांचा खात्मा होत नाही. तोपर्यत हे मिशन भारतीय सैन्याने सुरूच ठेवले पाहिजे. दहशतवादी हल्ले करतात आणि नंतर पाक व्याप्त काश्मीर मध्ये लपून बसतात. त्यामुळे ती जागा ताब्यात घेतली तर त्यांना लपायला जागा उरणार नाही. दरम्यान पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅच नाही झाली पाहिजे अशी भावना ही हर्षल यांनी यावेळी व्यक्त केली.