
- लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेस प्रारंभ
- विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून जबाबदार वर्तनाची अपेक्षा
- ‘ऑपरेशन सिंदूर’ १०० टक्के यशस्वी, पाकचे कंबरडे मोडले
नवी दिल्ली : भारताचे धैर्य आणि शौर्य राम आणि कृष्णापासून आले आहे. शंभर अपराध भरल्यानंतर ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने धर्मरक्षणासाठी सुदर्शन चक्र धारण केले होते, तसेच भारतानेही आता सुदर्शन चक्र धारण केले आहे. पाकिस्तानकडून पुन्हा कोणत्याही प्रकारची आगळीक झाल्यास स्थगित असलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ पुन्हा सुरू केले जाईल, असा इशारा देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी लोकसभेत केले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे चोख प्रत्युत्तर दिले होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत त्यावरील चर्चेस प्रारंभ झाला. चर्चेचा प्रारंभ सरकारतर्फे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’विषयक सर्व आक्षेपांना उत्तर दिले. ते म्हणाले, यापूर्वी भारताने संसदेवरील हल्ला ते २६/११चा मुंबई हल्ला असे अनेक दहशतवादी हल्ले सहन केले आहेत. पाकसोबत शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडविण्यावरच भारताचा भर राहिला आहे. मात्र, शिशुपालाच्या १०० चुका माफ केल्यानंतर श्रीकृष्णाला धर्माच्या रक्षणासाठी सुदर्शन चक्र धारण करावे लागले होते; त्याचप्रमाणे भारतानेही आता सुदर्शन चक्र हाती घेतली आहे. भारताचे शौर्य आणि धैर्य हे राम आणि कृष्णाकडून आले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने पाक आणि दहशतवादाविरोधातील आपले बदललेले धोरण जगाला दाखवून दिले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ सध्या स्थगित असले तरीही पाककडून पुन्हा कोणत्याही प्रकारची आगळीक झाल्यास ‘ऑपरेशन सिंदूर’ पुन्हा सुरू केले जाईल, असा इशारा संरक्षण मंत्र्यांनी दिला.
‘ऑपरेशन सिंदूर’ची उद्दिष्टे साध्य झाल्यानंतर आणि पाकच्या विनवणीनंतर भारताने मोहिम स्थगित केली. त्यामुळे अन्य कोणाच्या सांगण्यावरून ‘ऑपरेशन सिंदूर’ स्थगित केल्याचा दावा आणि आरोप बिनबुडाचा असल्याचा पुनरुच्चार संरक्षण मंत्र्यांनी केला. ते पुढे म्हणाले, सशस्त्र दलांनी प्रत्येक पैलूचा सखोल अभ्यास करून ऑपरेशन सिंदूर राबवले. "टेबलवर अनेक पर्याय होते, परंतु आम्ही असा पर्याय निवडला ज्यामध्ये दहशतवादी आणि त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांना जास्तीत जास्त नुकसान झाले आणि पाकिस्तानातील सामान्य नागरिकांना कोणतेही नुकसान झाले नाही. एका अंदाजानुसार, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी पायाभूत सुविधांवर अचूकपणे केलेल्या सुसंयोजित हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी, त्यांचे प्रशिक्षक, हँडलर आणि सहकारी मारले गेले. बहुतेक दहशतवादी जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या संघटनांचे होते, ज्यांना पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयचा उघड पाठिंबा आहे. आमची कारवाई पूर्णपणे स्वसंरक्षणार्थ होती. ती चिथावणीखोर किंवा विस्तारवादी नव्हती. विशेष म्हणजे पाकने भारताच्या सैन्यतळांवर आणि दारुगोळ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारताच्या सक्षम हवाई प्रणालीने पाकचा प्रत्येक हल्ला नेस्तनाबूत केला, असेही संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले.
विरोधी पक्षांनो, प्रश्न असे विचारा...
लोकांचे हित लक्षात घेऊन काम करणे हे सत्ताधारी पक्षाचे काम आहे आणि विरोधी पक्षाचे काम जनतेशी संबंधित मुद्द्यांवर सरकारला प्रश्न विचारणे आहे. मात्र, आमच्या विरोधी पक्षांनी ‘भारताची किती विमाने पडली’ असे प्रश्न विचारले आहे. मात्र, जर त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर त्यांचा प्रश्न असा असावा की आम्ही दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले का?, त्याचे उत्तर हो आहे. जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर हे विचारा: या ऑपरेशनमध्ये आमच्या कोणत्याही शूर सैनिकांना दुखापत झाली का?, याचे उत्तर नाही असे आहे, आमच्या कोणत्याही सैनिकांना दुखापत झाली नाही. जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा की ज्या दहशतवाद्यांनी आमच्या बहिणी आणि मुलींचा सिंदूर उजाड केला, त्यांच्या आकांना ऑपरेशन सिंदूरमध्ये आमच्या सैन्याने त्यांच्या मालकांना संपवले आहे का?. याचे उत्तर हो असे आहे. त्यामुळे विरोदी पक्षांनी जबाबदार वर्तन अपेक्षित आहे, असा सल्ला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला.
भारताने लढावे, अशी पाकची लायकीच नाही
भारताने कधीही कोणाच्याही जमिनीचा एक इंचही ताबा घेतलेला नाही आणि आकार, ताकद, शक्ती आणि समृद्धीमध्ये जवळपासही नसलेल्या पाकची लायकी नाही. सैन्यसंघर्षात भारताचा पराभव करणे शक्य नसल्यानेच पाकने दहशतवादाचा आधारा घेतला आहे. दहशतवाद हे पाकचे अधिकृत धोरण असून ती जगाची दहशतवादाची नर्सरी आहे, असा टोला संरक्षण मंत्र्यांनी लगावला.
शांततेसाठी भारताने स्वीकारला दुसरा मार्ग
भारताने नेहमीच पाकिस्तानसह आपल्या शेजाऱ्यांशी सौहार्दपूर्ण आणि सहकार्यात्मक संबंधांची भूमिका घेतली आहे. मात्र, पाकने भारताच्या या धोरणाविषयी गैरसमज करून घेतला. यापूर्वी भारताने लढा २०१६ मध्ये सर्जिकल स्ट्राईक, २०१९ मध्ये बालाकोट एअर स्ट्राईक आणि २०२५ मध्ये ऑपरेशन सिंदूरद्वारे शांतता सुनिश्चित करण्यासाठी दुसरा मार्ग स्वीकारला आहे. सुसंस्कृत, लोकशाही देशांमध्ये चर्चा होतात. परंतु, ज्या देशात लोकशाही अस्तित्वात नाही आणि ज्या देशात फक्त धार्मिक कट्टरता, दहशतवाद आणि भारताविरुद्ध द्वेष आहे, तेथे संवाद होऊ शकत नाही; असे संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले.