अमेरिका आणि युरोपीय महासंघामध्ये व्यापारी करार - युरोपीय महासंघ करणार ७५० अब्ज डॉलर्सची खरेदी

    28-Jul-2025
Total Views |

वॉशिंग्टन, युरोपीय महासंघ आणि अमेरिकेदरम्यान व्यापारी करार झाला असून, त्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. रविवार दि.२७ जुलै रोजी युरोपीय महासंघाच्या अध्यक्ष उर्सुला लेयेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराची घोषणा केली. या करारान्वये युरोपीय महासंघाचे सदस्य असणारे देश अमेरिकेकडून ७५० अब्ज डॉलर्सच्या मालाची खरेदी करणार आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सध्या विविध देशांशी व्यापार करार करण्याला गती देत असून, पूर्वनिर्धारित १ ऑगस्ट या मुदतीच्या आधी काही महत्त्वाच्या देशांबरोबर करार करण्याचे त्यांचे प्रयोजन आहे. याचाच भाग म्हणून ट्रम्प यांनी नुकताच युरोपीय महासंघाबरोबर व्यापार करार केला.

आजवर ट्रम्प यांनी केलेल्या अनेक करारांपैकी हा एक महत्त्वाचा आणि मोठा करार असल्याचे म्हटले जात आहे. या करारासाठीची चर्चा स्कॉटलंडमधील ट्रम्प यांच्या गोल्फ कोर्समध्ये पार पडली.

युरोपीय महासंघाबरोबरचा अमेरिकेचा व्यापार हा २३५ अब्ज डॉलर्स एवढा होता. या व्यापारात अमेरिकेची निर्यात जास्त होती. नुकत्याच झालेल्या करारानुसार, अमेरिकेत युरोपीय महासंघामधून येणार्या जवळजवळ सर्व वस्तूंवर १५ टक्के कर आकारला जाणार आहे. यामध्ये गाड्यांचाही समावेश आहे. सध्या गाड्यांवर २७.५ टक्के कर आकारला जात आहे. युरोपीय महासंघ मात्र अमेरिकेतून आयात होणार्या गाड्यांवर फक्त २.५ टक्के कर आकारणी करणार आहे. या करारानुसार, अमेरिका आणि युरोपीय महासंघ विमाने आणि त्याचे सुटे भाग, रसायने, जेनेरिक औषधे, सेमीकंडटर उपकरणे, कृषी उत्पादने, नैसर्गिक संसाधने आणि महत्त्वाच्या कच्च्या मालावर शून्य शुल्क आकारतील. भविष्यात या यादीत नंतर आणखी उत्पादने जोडली जाण्याचेही करारामध्ये मान्य करण्यात आले आहे.

युरोपीय स्टील आणि अॅल्युमिनियमवर अमेरिकेत ५० टक्के शुल्क लागू राहील. तथापि, भविष्यात या सुधारणा होण्याचा आशावाद लेयेन यांनी व्यक्त केला. युरोपीय युनियनने ट्रम्प प्रशासनाच्या कार्यकाळात तेल, वायू, अणुऊर्जा, इंधन आणि सेमीकंडक्टर चिपसह ७५० अब्ज डॉलर्सची धोरणात्मक खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच युरोपीय महासंघाने अमेरिकेकडून लष्करी उपकरणे खरेदी करण्याचेही आश्वासन दिले असून, ट्रम्प प्रशासनाच्या कार्यकाळात युरोपीय कंपन्या अमेरिकेमध्ये ६०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत.

युरोपीय महासंघाच्या कराराआधी ट्रम्प यांनी जपानबरोबर ५५० अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. तसेच, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स या देशांबरोबरही ट्रम्प यांनी द्विपक्षीय व्यापारी करार पूर्ण केले आहेत. चीनबरोबर असलेल्या व्यापारी संघर्षाला कमी करण्यासाठी अमेरिकेची चीनशी चर्चा सुरु आहे.


युरोपीय महासंघ आणि अमेरिका यांच्यतील व्यापार

- २०२४ मध्ये युरोपीय महासंघ आणि अमेरिका यांच्यातील व्यापार १ लाख ६८ हजार युरोचा
- याकाळात युरोपीय महासंघाची आयात ३३ हजार ४८० कोटी युरो
- युरोपीय महासंघाची निर्यात ५३ हजार २२९ कोटी युरो

भारत- अमेरिका व्यापारी कराराची चर्चा प्रगतीपथावर

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी कराराची चर्चा प्रगतीपथावर असल्याचे, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले. अमेरिकेकडून ङ्गप्रोफेशनल ट्रिटमेंटफची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कृषी उत्पादन आणि दूग्ध उत्पादनासाठी भारतीय बाजारपेठ खुली करण्याच्या मागण्यांना भारताने ठाम विरोध केला आहे.