भुवनेश्वर : प्राध्यापकाने केलेल्या लैंगिक छळाची तक्रार दाखल करूनसुद्धा प्राचार्य आणि महाविद्यालयाने निष्क्रियता दाखवल्याने विद्यार्थिनीने फकीर मोहन कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आत्मदहन केले. यात मृत्युमुखी पडलेल्या बालासोर महाविद्यालयातील विद्यार्थिनीला न्याय मिळावा या मागणीसाठी बुधवार दि. १६ जुलै रोजी विद्यार्थ्यांनी ओडिशा विधानसभेबाहेर मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. दरम्यान ओडिशामध्ये तणाव निर्माण झाला असून पोलीसांना विद्यार्थ्यांवर अश्रूधुराचा वापर करावा लागला.
एका विद्यार्थीनीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात दाद मागितली होती. मात्र, महाविद्यालय प्रशासनाने तिच्या तक्रारीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. याचा संताप म्हणून तिने आत्मदहन केले. तिच्या मृत्यूनंतर राज्यभरात तीव्र संतापाची लाट उमटली आहे. दरम्यान, बीजेडीचे उपाध्यक्ष देबी प्रसाद मिश्रा यांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले कि, “ याप्रकरणी आमची सरकारला झोपेतून बाहेर पडून न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी आहे, न्याय मिळेपर्यंत आम्ही आमचा निषेध सुरू ठेवू.” असे मिश्रा म्हणाले.
या घटनेबाबत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी X वर लिहिले कि, "ओडिशातील बालासोर येथे न्यायाच्या लढाईत प्राण गमावलेल्या धाडसी मुलीच्या वडिलांशी मी बोललो, त्यांच्या आवाजात मला त्यांच्या मुलीचे दुःख,स्वप्ने आणि संघर्ष जाणवला. काँग्रेस पक्ष आणि मी प्रत्येक पावलावर त्यांच्यासोबत आहोत." विद्यार्थ्यानीच्या मृत्यूने निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर, ओडिशातील विरोधी पक्ष असलेले काँग्रेस आणि बिजू जनता दल यांनी या प्रकरणात एकत्रित भूमिका घेतलेली दिसून येत आहे.