स्वाभिमान, अहंकार आणि सकारात्मक ऊर्जा
निसर्गाची ऊर्जाशक्ती म्हणजेच ‘कॉस्मिक एनर्जी’ही जशी शुद्ध असते, त्याचप्रमाणे जर आपण आपल्या शरीरातील ऊर्जा शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला, तर या दोन्ही ऊर्जा एकमेकांना पूरक ठरून एकमेकांना सशक्त करण्याचे काम करतात. नैसर्गिक ऊर्जाशक्ती ही फार विशालकाय असते व तिचा शरीरातील चैतन्यशक्तीवर परिणाम होत असतो. परंतु, शरीरातील जी चैतन्यऊर्जा आहे तिचासुद्धा या निसर्गातील ‘कॉस्मिक एनर्जी’वर थोड्या प्रमाणात का होईना, पण परिणाम होतच असतो. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी आपण जेव्हा जातो, तेव्हा आपल्याला अतिशय ‘सकारात्मक ऊर्जा’ जाणवते, ज्याला आपण ‘पॉझिटिव्ह व्हाईब्स’ म्हणतो, तर काही ठिकाणी गेल्यावर आपली घुसमट होते आणि कधी एकदा तिथून निघतो असे होते, त्यालाच आपण ‘नकारात्मक ऊर्जा’ किंवा ‘निगेटिव्ह व्हाईब्स’ असे म्हणतो.
‘सकारात्मक ऊर्जा’ जर वाढवली तरच शरीरातील चैतन्यशक्तीला ती पूरक ठरते आणि तरच माणसाची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. मागे आपण पाहिले की, विश्वास, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक आशावाद ही निरोगी त्रिसूत्री आहे. याच त्रिसूत्रीबरोबरच आणखी काही गुण असे आहेत की, जे आपण जर अंगी बाळगले तर सकारात्मकतावाढीला लागेल. स्वाभिमान असणे व इतरांच्या विचारांचा आदर करणे, आपल्याला लोक कसे वागवतात, हे सर्वस्वी आपण लोकांशी कसे वागतो व आपण त्यांचे वागणे कसे स्वीकारतो, यावर अवलंबून असते. ‘मान’ हा कधीही मागून मिळत नाही, तर तो आपल्या वागण्यातून, विचारांमधून आणि आचरणातून कमवावा लागतो. जेव्हा आपण इतरांच्या विचारांचा यथोचित आदर करतो, तेव्हा समोरचा माणूसही आपल्या विचारांचा आदर करत असतो. जेव्हा आपण इतरांशी आदराने वागतो व त्यांच्या मतांचा आदर करतो, तेव्हा ते सामाजिक शिष्टाचार व चांगुलपणाचे लक्षण मानले जाते आणि जेव्हा आपण आपल्या स्वत:च्या मतांचा आदर करत असतो, त्यावेळी आपण आपले स्वत:चे मानसिक बळ वाढवत असतो.
स्वत:चे मानसिक बळ वाढवल्यावर मग स्वत:वरचा विश्वास वाढतो. आत्मविश्वास वाढल्यामुळे निर्णयक्षमता वाढते आणि त्यानेच एकप्रकारची ‘सकारात्मक ऊर्जा’ तयार होत असते. या सकारात्मक ऊर्जेतूनच तयार होत असतो, तो स्वाभिमान. स्वाभिमान अंगी बाणवला की, मग आपल्या हातून ‘सकारात्मक’ कृत्ये होतात व कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपल्याला काम करता येते. स्वाभिमान असणे म्हणजे स्वत:बद्दल अभिमान असणे, पण तो अहंकारामध्ये रुपांतरित होता नये. स्वाभिमान व अहंकार यात अतिशय सूक्ष्म फरक आहे. उदाहरणच घ्यायचे झाले, तर छत्रपती शिवाजी महाराजांकडे होता तो स्वाभिमान आणि औरंगजेबाकडे होता तो अहंकार. स्वाभिमान हा नेहमी ‘कन्स्ट्रक्टिव्ह’ असतो व अहंकार हा नेहमी ‘डिस्ट्रक्टिव्ह’ असतो. म्हणूनच अहंकार आला की, त्यासोबत, लोभ, मद, मत्सर, क्रोध इत्यादी वाईट गुण व नकारात्मकता येते. त्यामुळे ‘प्युरिटी’ निघून जाते. यामुळे माणसाची रोगप्रतिकारकशक्ती अशक्त होते आणि माणूस आजारी पडतो. म्हणूनच अहंकार सोडण्यासाठी स्वत:ला ओळखायला शिकावे, असे विचारवंत सांगतात. यापुढे आपण काही घटक पाहणार आहोत की, ज्यामुळे माणसाची सकारात्मकता वाढीस लागते.
- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)