अधारणीय शारीरिक वेगांच्या श्रृंखलेतील या लेखामध्ये श्रमश्वासामुळे होणार्या तक्रारींवरील उपाय सविस्तर बघूया. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे, श्रमश्वासाच्या आवेगाला जर रोखले, तर शरीरातील वाताच्या प्राकृतिक गतीला निर्बंध निर्माण होतो. शरीरातील प्राकृत वाताचा अवरोध तरी निर्माण होतो किंवा त्याच्या वेगात बिघाड उत्पन्न होतो (अति किंवा कमी गती) शरीरात प्राकृततः वाताचे पाच प्रकार आहेत. प्रत्येक वायु प्रकाराचे स्वतःचे असे विशिष्ट स्थान व कार्य आहे. यातील ज्या उपप्रक्रारामध्ये बिघाड (दोष) उत्पन्न होतो, त्यानुसार शरीरातील त्या स्थानी व्याधीची लक्षणे उत्पन्न होतात.
प्राकृतिक वायुचे नैसर्गिकरित्या काही गुण आहेत. जसे, वात हा रुक्ष (कोरडा), लघु (हलका), शीत (थंड), खर (खरखरीत), सूक्ष्म, चल (गतिमान) इ. या गुणांमुळे शरीरातील विविध कार्ये सुस्थितीत होत असतात. जसे, शरीरातील संवहन (संवेदना, रक्त संवहन, मल-मूल संवहन इ.) स्पंदन (शरीरातील विविध गति - जसे हृद्गती, श्वसन गती, पोटाची गती.) म्हणजे रक्ताभिसरण, मलमूत्राचे शरीरातील विशिष्ट अवयवांत एकत्रीकरण व निष्कासन, विविध स्पर्शांचे ज्ञान व त्यावरील प्रतिक्रिया, पोटाची आतड्यांची गती हृदयाची नियमित गती, शरीरातील पोषक घटकांचे त्या त्या विशिष्ट अवयवांपर्यंत पोहोचविणे आणि शरीरातील मलभाग, टाकाऊ भाग उत्सर्जनासाठी त्या त्या अवायवांपर्यंत नेणे, श्वासोच्छ्वासाची नियमित गती, शरीरात उत्साहाची अनुभूती आणि विविध वेगांची आवेगांची अनुभूती व पूर्ती इ. सर्व कार्ये वात सातत्याने करत असतो. याच्या कुठल्याही गुणांमध्ये दोष निर्माण झाला, तर वरील कार्यामध्ये-विशिष्ट कार्यामध्ये बाधा-बिघाड उत्पन्न होतो.
म्हणजे काय, तर थोडक्यात गॅसेस म्हणजे वात इतके साधे सोपे गणित नाही. सांधेदुखी म्हणजे तुम्हाला वात आहे, असे नाही. विकृत-बिघडलेल्या वातामुळे होणार्या काही तक्रारी, व्याधींमधील गॅसेस होणे, सांधेदुखी इ. त्रास उद्भवतात. वातामध्ये बिघाड (दुष्टी) निर्माण झाली की, त्यावर उपाय आयुर्वेदाने सांगितले आहेत, सामान्य चिकित्सा आणि विशेष चिकित्सा यामध्ये फक्त आभ्यंतर चिकित्सा अपेक्षित नाही, तर याचबरोबर पंचकर्म व बाह्य चिकित्साही तेवढीच महत्त्वाची आहे.
वाताच्या गुणांकडे बघितले की असे लक्षात येते की, रुक्षता, शुष्कता, कोरडेपणा, खरखरीतपणा इ. लक्षणे असतात. यावर उत्तम उपाय म्हणजे स्निग्धतेचा (तेल व तुपामध्ये उत्तम स्नेहांश असतो) जसे मारुतीला तेल वाहतात, तसेच वातामध्येही तेला-तुपाचा वापर करावा लागतो. तो आभ्यंतर, बाह्य व पंचकर्म या सगळ्या पद्घतीने केल्यास अधिक फायदा होतो. रोजच्या दिनक्रमात सर्वांगाला तेल लावून हलके चोळून थोड्या वेळाने कोमट पाण्याने आंघोळ केल्यास वाताला नियंत्रित ठेवण्यास मदत होते. याला ‘अभ्यंग’ असे म्हणतात. उन्हाळ्यात खोबरेल तेलाने व थंडी-पावसाळ्यात तीळाच्या तेलाने अभ्यंग करावे. थोडे कोमट तेल लावल्यास अधिक उत्तम. हा दिनक्रम केवळ दिवाळीपुरता मर्यादित न ठेवता, 12 महिने त्याचा अवलंब करावा. विशिष्ट लक्षणे असतील, तर तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनानंतरच अभ्यंग सुरू करावे. रोज कर्णपूरण व नस्य करावे. कानांत दोन-दोन थेंब तेल सोडावे व नाकालाही तेल-तूप लावावे-दोन-दोन थेंब सोडावे. जी जी नैसर्गिक रंध्रे या जागी वाताची गती नियंत्रित ठेवण्यासाठी रोज तेल लावावे. दोन-दोन थेंब सोडावे.
संपूर्ण अंगाला तेल (अभ्यंग) लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी उपयोगी आहे. पण, पावसाळ्यात (जेव्हा स्वाभाविकतः वाताचा जोर शरीरात वाढतो) आणि वार्धक्यामध्ये (जेव्हा स्वाभाविकतः वातावस्था असते) तेव्हा न चुकता अभ्यंग जरूर करावे.
तसेच शिरोऽभ्यंग (केसांना तेल लावणे), पादाभ्यंग (पायाच्या तळव्यांना तेल लावणे) इ. उपायदेखील आवर्जून करावे. वाताची दुष्टी असताना वाताच्या गुणांच्या विपरित आहारामध्ये बदल असावा (म्हणजे, कोरडे-शुष्क रस, अन्न खाऊ नये) थंड पदार्थ टाळावेत. गरम पाणी प्यावे. पचायला हलके अन्न पण स्निग्धांश असलेला असे असावे. म्हणजे तेलविरहित भाजी-पोळी खाऊ नये. गरम भातावर तूप, पोळीला तूप लावून खावे. आहारातून तुपाचा समावेश करावा. कोरडेपणामुळे शरीरात अडथळा निर्माण झाल्यास गरम दुधात तूप घालून प्यावे किंवा गरम पाण्यातून घ्यावे. हिंग-तुपाने पोटातील गॅसेसवर आराम पडतो. अति विचार, अति व्यायाम, अति जागरण, अति हालचाल, अति बडबड या सगळ्याने शरीरात वात वाढतो. (वाताची चल गती वाढते) तेव्हा अति प्रमाणात वरील कार्ये करू नयेत. विशेषतः जेव्हा वाताच्या दुष्टीच्या तक्रारी असतात.
मागील लेखात श्रमश्वासावरील जी चिकित्सा-उपाय सांगितले होते, त्यांचा अवलंब करावा. अन्न ताजे व गरम असावे. जसे शरीरातील वात विशिष्ट शारीरिक कारणाने वाढतो, बिघडतो, तसेच त्याला काही मानसिक कारणेही आहेत. अति विचार (चांगले व वाईट दोन्ही) अति भीती, सतत चिंता मनावर अति दाब, मनाचे अति प्रमाणात कार्य इ.नेही वाताची गती वाढते. तेव्हा मनाला व भावनांनाही रोखणे, थांबविणे गरजेचे. सतत भावनांच्या वर-खाली चढ-उताराने मनही थकते आणि वातही बिघडतो. त्यामुळे मनातील विचारांची गती, गोंधळ कमी करणे गरजेचे आहे. नको त्या गोष्टींचा सतत विचार, नकारात्मक गोष्टींचे चिंतन, इतरांबद्दल राग-द्वेष, घृणा इ. मनाशी बराच काळ धरून ठेवणे हे स्वतःच्या स्वास्थ्यासाठी घातक आहे. ’ङशीं-ॠे’ सोडून देणे, अति विचार, अति कष्ट (सहन होण्यापलीकडे) टाळावे. अभ्यंग जसे शरीराला रिलॅक्स करते, तसे एखादा छंद मनाला-भावनांना शांत करतो, सकारात्मक करतो. वाचन, कला, संगीत, बागकाम इ. बरेच प्रकारचे छंद असू शकतात. याचबरोबर इतरांची मदत, सेवा (पशु-पक्षी, प्राणी, व्यक्ती इ.) केल्यानेही आपण स्वतःच्या, स्वतः गुंफलेल्या कोषातून बाहेर निघणे सोपे होते. सतत आत्ममग्न (चश । जपश्रू चश) एवढाच विचार असू नये. इतरांना मदत करता करता आपण स्वतःच्या व्यथा, दुःखे विसरून पुन्हा जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघू लागतो.
मनुष्यामध्ये होणार्या बर्याचशा व्याधी या मनोकायिक आहेत. फक्त शारीरिक लक्षणांची चिकित्सा करून त्या व्याधी संपूर्ण बर्या होत नाहीत. त्याला नियंत्रित केले जाऊ शकते, पण संपूर्ण व्याधिमुक्त होण्यासाठी शरीराच्या चिकित्सेबरोबरच जिथे जिथे मनाची, भावनांची चिकित्सा-उपाय करावे लागतात, तेही वेळोवेळी करावे. कारण, मनाचा व शरीराचा परस्पर संबंध आहे. मनाच्या व्यथा शारीरिक लक्षणे म्हणून उत्पन्न होतात आणि शरीरातील विकृतींचा मनावर अनिष्ट परिणाम होतो.(क्रमशः)