शाळा म्हणजे आनंदाचे ठिकाण असायला हवे. पण, काही मुलांसाठी ते भीतीचे कारण बनते. मुलं लहान असो वा मोठी; कधी कधी त्यांना शाळेची एक अनामिक भीती वाटते. ही भीती केवळ अभ्यासाची नसते; मित्र बनवणे, वर्गात बोलणे, परीक्षा देणे, शिक्षकांचे लक्ष आपल्या कामगिरीकडे लागणे या सगळ्याच गोष्टी काही मुलांसाठी तणावाचे कारण बनतात. तेव्हा, यामागची नेमकी कारणं आणि त्यावरील उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
शाळेची भीती म्हणजे काय?
ही एक मानसिक स्थिती आहे, जिथे मुलं शाळेमुळे खूप घाबरलेली असतात. कधी ही भीती इतकी वाढते की, ती त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेत आणि रोजच्या कामात अडथळा निर्माण करु शकते.
शाळेत न जाण्याची कारणे कायअसू शकतात?
शाळेत न जाण्यामागे अनेक कारणे असू शकतात आणि अनेकदा ती एकाच वेळी कार्यरत असतात. काही सामान्य कारणे पुढीलप्रमाणे :
1) शाळेतील तणाव : मुलं कधी कधी सांगू शकत नाहीत की, त्यांना नेमका काय त्रास होेत आहे. त्यांना शिक्षकांचा रागावलेला आवाज, वर्गमित्रांचे वागणे, बसमधून शाळेत येणे, वर्ग बदलणे अशा गोष्टी त्रासदायक वाटू शकतात.
2) पालकांपासून दूर होण्याची भीती
काही मुलांना आईवडिलांपासून दूर होणे फारच कठीण वाटते. त्यांना वाटते की, ते शाळेत असताना घरी काही वाईट होईल.
3) कौटुंबिक तणाव व घटना : घरात भांडणे, घटस्फोट किंवा नवीन ठिकाणी स्थलांतर अशा गोष्टींचा परिणाम मुलांच्या मनावर होतो.
4) अभ्यासाचा दबाव व शैक्षणिक अपयशाची भीती : काही मुलांना परीक्षेचे, गुणांचे किंवा वर्गात उत्तर देण्याचे खूप दडपण वाटते.
5) शाळेतील सुरक्षिततेचा अभाव : शाळेत जर कधी मारहाण झाली असेल, धमकी दिली गेली असेल किंवा कर्मचारी वर्गाकडून संरक्षण मिळाले नसेल, तर मुलं शाळेला टाळू लागतात.
6) मनोरंजनाचा आकर्षक पर्याय : मोबाईल गेम्स, टीव्ही किंवा इतर गोष्टी शाळेपेक्षा अधिक आकर्षक वाटू लागतात.
मग ही शाळेची भीती कशी दिसून येते? जर तुमच्या पाल्यामध्ये खालीलपैकी अनेक लक्षणे दिसली, तर त्यांना शाळेसंबंधित चिंता असू शकते.
शारीरिक तक्रारी : सकाळी उठल्यावर पोट दुखणे, डोकेदुखी, मळमळ, थकवा, चक्कर अशा तक्रारी मुलं वारंवार करतात.
या तक्रारी जास्त शाळेत जाण्याच्या वेळी करतात आणि शाळेत जाण्याची वेळ टाळून गेली की, या तक्रारी संपतात.
भावनिक प्रतिक्रिया : रडणे, चिडचिड करणे, भीती वाटणे, ओरडणे, आत्महत्येच्या धमक्या देणे.
शाळेला टाळणे : शाळेत जाण्यावेळी घराबाहेर न जाणे, झोपण्याचे नाटक करणे.
शाळेत गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते.
शाळेत समवयस्कांशी संबंध कमी झाल्याचेही तुमच्या निदर्शनास येईल.
शैक्षणिक कामगिरी खालावलीकी अभ्यासात घसरगुंडी झालेली दिसून येते.
शाळेत रस नसणे.
शाळेत जाण्याबद्दल चिंता दिसून येते.
शाळेची वेळ झाल्यावर लहान मुलांमध्ये कमी बोलणे, नकार देणे, रडणे, राग येणे दिसून येते.
चिंतेची शारीरिक लक्षणे : डोकेदुखी, पोटदुखी, रात्री लघवी होणे, इतर वेदना होतात.
शाळेत जाण्याची भीती किंवा ‘स्कूल फोबिया’ हा आजार मुलांमध्ये बराच काळ राहतो. ज्यांच्याकडे अतिसंरक्षणात्मक काळजीवाहक पालक असतात, त्या बहुतेक मुलांना शाळेतील भीती असते, तर काहींना त्यांच्या चिंतांमुळे हा फोबिया कोणत्याही अशा कारणाशिवाय विकसित होऊ शकतो. जर मुले फक्त घरातले एकच लाडके मूल असेल, घरातील सर्वांत लहान मूल असेल किंवा दीर्घकालीन आजारी असेल, तर त्यांना शाळेत जायची भीती वाटू शकते. शाळेला जाण्याचे नकार देण्याचे प्रमाण मुले आणि मुली दोघांमध्ये समान प्रमाणात आढळते.
शाळेत जाण्याशी संबंधित वाईट मनःस्थिती दिसून येते. अशावेळी पालकांनी काय करायला हवे?
1) लवकर लक्ष द्या : हा केवळ हट्ट किंवा निघून जाणारा टप्पा आहे, असे समजून पालकांनी त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. लवकर लक्ष दिल्यास समस्या वाढण्यापासून थांबता येते.
2) मुलांचे ऐका : मुलांचे म्हणणेही समजून घ्या. एखादा शिक्षक, मित्र किंवा काही विशिष्ट प्रसंग त्यांना त्रास देत आहे का, हे पालकांनी समजून घ्यावे.
3) भावना मान्य करा : मुलांच्या भावना खर्या आहेत हे पटवून द्या. त्यांना सांगा की, आपण त्यांच्या भीतीला समजून घेत, आपण त्यांच्यासोबत आहोत आणि विश्वास द्या की ते ती भीती पार करू शकतात.
4) शाळेतील शिक्षकांशी संवाद साधा : शिक्षक, समुपदेशक यांच्याशी संपर्क साधा. तुमच्या मुलाला काय त्रास होतो आहे, हे समजावून सांगा. शाळेच्या सहकार्याने उपाय शोधता येतो.
5) शाळेला जाण्याबाबत ठाम राहा :
मुलं घाबरत असतील, तरी त्यांना समजावून, धीर देऊन शाळेत पाठवा. शाळेला न जाणे हा पर्याय त्यांना देऊ नका.
6) शाळेतील एखादी चांगली गोष्ट ओळखा : काहीतरी मजा किंवा आवडती गोष्ट, एखादा आवडता विषय, शिक्षक, मित्र, खेळ शोधा आणि त्याबद्दल बोलत राहा.
7) मुलांनी घरी राहणे कंटाळवाणे करा: शाळेला टाळण्यासाठी मुलं घरी मजा करत असतील, तर शाळेपासून अधिक दूर जातील. त्यामुळे शाळेच्या वेळेत टीव्ही, मोबाईल, झोप यांवर मर्यादा ठेवा.
8) तज्ज्ञांची मदत घ्या : मुलांच्या समस्या दीर्घकाळ टिकत असतील किंवा त्यांचे वागणे अतिशय अस्वस्थ करणारे असेल, तर मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्या. कधी काही मानसिक आजार असतील, त्यावर उपचार करणे आवश्यक आहे.
मुलांच्या विकासात शाळा खूप मोठी भूमिका बजावतात. शाळेत जाण्याने त्यांना जगाबद्दल पुरेसे ज्ञान मिळण्याची संधी मिळतेच. शिवाय, त्यांचे व्यक्तिमत्त्वही घडते. शाळा मुलांना एका शैक्षणिक वातावरणात आणतात आणि सुरुवातीपासूनच त्यांना वास्तविक जगासाठी आणि प्रौढत्वासाठी तयार करतात. शाळेत न जाण्यामुळे मुले मानसिक आणि भावनिक विकासात मागे पडू शकतात. शिक्षणाची जागा असली, तरी ती ‘सुरक्षित’ आणि ‘समजून घेणारी’ हवी. मगच मूल ती स्वीकारेल. पालक, शिक्षक, आणि समुपदेशक यांनी मिळून काम केल्यास शाळेच्या भीतीवर मात करता येते. प्रत्येक मूल वेगळे असते. त्याच्या भावना ऐकणे, समजून घेणे आणि धीर देणे हीच खरी गरज आहे.
- शुभांगी पारकर