मनाला कधीही सुटी नसते. ते सतत काहीतरी विचार करत असतं. कुणी काय बोललं, काय घडलं, भविष्यात काय होईल, इत्यादी. पण, योग आणि ध्यानाच्या साहाय्याने आपण मनाला शांत, समाधानी आणि स्थिर ठेवायला शिकू शकतो.
कल्पना करा, तुम्ही एका जुनाट गाडीतून लांबच्या प्रवासाला निघाला आहात. सुंदर निसर्गाचं सौंदर्य अनुभवण्याऐवजी, तुम्ही गाडीच्या अडचणींमध्ये अडकून जाता. आपल्या मनाचंही काहीसं असंच होतं. जेव्हा ते भूतकाळातल्या घटना किंवा भविष्यातल्या चिंतेने व्यापलेलं असतं, तेव्हा आपण वर्तमानातील साधेपणातली सुंदरता अनुभवू शकत नाही. जसं की, निसर्गात रमणं, एखादा सूर्यास्त पाहणं. मग असं काही आहे का, जे मन शांत करेल आणि आपल्याला हा आताचा क्षण जगू देईल? योग हा त्याचं उत्तर ठरू शकतो.
योग : शारीरिक नव्हे, तर मानसिक आरोग्याचं खंबीर बळ
योग हा केवळ शारीरिक व्यायाम नाही, तर मानसिक स्वास्थ्याचा खरा पाया आहे. योग शरीर, मन आणि आत्मा यांच्यात समरसता निर्माण करतो आणि आजच्या गुंतागुंतीच्या जगण्यात शांततेचं सुरक्षित आश्रयस्थान देतो. योग आपल्याला स्वतःबद्दल प्रेम, करुणा आणि सहनशीलता शिकवतो. ‘मेट्टा भावना ध्यान’ (र्ङेींळपस-घळपवपशीी चशवळींरींळेप) सारख्या पद्धती योगसत्रांमध्ये आत्मप्रेमाचा विकास करतात, जे चिंता आणि नैराश्यावर मात करण्यासाठी अत्यावश्यक असतं.
योग म्हणजे फक्त लवचिकता किंवा शारीरिक संतुलन नव्हे, तर आत्मस्वीकृती, मनःशांती आणि आंतरिक बळाचा प्रवास आहे.
मन-शरीर संबंध : अंतर्गत संवादाचे विज्ञान
आपण जसं विचार करतो, तसं आपण स्वतःला अनुभवतो आणि तसंच आपलं वागणं, संवाद आणि भावनिक प्रतिसाद ठरतात. हाच आहे मन-शरीर संबंध, ज्यातून हे स्पष्ट होतं की, आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य परस्परांशी जोडलेलं आहे.
आपल्या शरीरातील मेंदू, तंत्रिका, अंतःस्रावी आणि रोगप्रतिकारक प्रणाली एकमेकांशी रासायनिक भाषेत सातत्याने संवाद साधतात. आपल्या भावना, विचार आणि शरीराच्या प्रतिक्रिया एकत्र काम करतात आणि मन-शरीर संवादातूनच त्या आकार घेतात.
आपल्या शरीरातील तंत्रिका प्रणालीतील ‘सिंपथेटिक’ (लढा, पळ, गोठणे, गोंधळ) आणि ‘पॅरसिंपथेटिक’ (शांतता, विश्रांती) या दोन भागांमध्ये शरीरातील व्यवहार सुरू असतो. योगासने आणि प्राणायामाच्या सरावातून ‘पॅरसिंपथेटिक’ प्रणाली सक्रिय होते, विशेषतः ‘वेगस’ नावाच्या नर्व्हच्या माध्यमातून, जी शरीर आणि मेंदू यांच्यातील मुख्य दुवा आहे.
ध्यान, चांगला आहार, योगासने, सकारात्मक सवयी या सगळ्यांमुळे शरीरातील नर्व्ह सिग्नल्स स्पष्ट होतात आणि आपल्या मन-शरीर यंत्रणेला संतुलन आणि लवचिकता प्राप्त होते.
पतंजलींचा मौलिक दृष्टिकोन : मनावर मात म्हणजे योग
पतंजली म्हणतात, मनाचे विकार पार करून जाणं, मन थांबवणं आणि त्या मनाचाच भाग न राहणं हाच योग आहे.
योग ही फक्त कृती नाही, ती एक दृष्टी आहे, स्वतःकडे पाहण्याची, स्वतःला समजून घेण्याची आणि संतुलित जीवन जगण्याची. आजच्या धावपळीत, आपले मन पुन्हा एकदा शांत करण्यासाठी आणि शरीर-मन-आत्मा यांच्यात समरसता साधण्यासाठी योग हाच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे.जगातील सर्व अनुभव आपल्या मनाच्या माध्यमातून आपल्यात प्रवेश करतात. जर आपण सजगतेने मनाच्या पलीकडे गेलो, तर आपण सर्वांमध्ये एकरूप होतो. ‘मी आणि तू’, ‘येथे आणि तेथे’, ‘आता आणि मग’ ही सर्व द्वंद्वे केवळ मनामुळे निर्माण झाली आहेत. जर आपण मन बाजूला ठेवलं, तर वेळ, जागा, भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचे बंधनच नाहीसं होतं. उरतो तो केवळ साक्षात ‘आता’. जेव्हा आपण मनाच्या सर्व रुपांवर मात करतो, तेव्हा आपण मनाचा उपयोग हवा तसा करू शकतो. पण, जोपर्यंत आपण त्यात अडकलेलो असतो, तोपर्यंत मनाचं खरं स्वरूप आपल्याला समजत नाही. योग शरीरात आणि मनात सत्त्व गुण वाढवतो. म्हणजेच, समजूतदारपणा, स्थैर्य आणि समाधान. तो राजस (उद्विग्नता) आणि तमस (आळस, उदासीनता) गुणांवर नियंत्रण ठेवतो. म्हणूनच योग केवळ व्यायाम नाही, तो एक अंतर्मुख होण्याचा मार्ग आहे. ‘वर्क-आऊट’ नव्हे, तर ‘वर्क-इन’ स्वतःला समजून घेण्याची साधना.
योग आपल्याला क्षणोक्षणी सजग जगायला शिकवतो. तो आपल्याला आपल्या विचारांचा, भावना आणि क्रियांचा ताण सुसंवादात आणायला शिकवतो. आजच्या तणावपूर्ण, गोंधळलेल्या आणि बाह्य गोष्टींमध्ये हरवलेल्या जगात, योग आपल्याला स्वतःत परत आणतो. जिथे शांतता, आनंद आणि अस्तित्वाची खरी समज आहे. योग, मग तो प्राणायाम असो, आसने असोत, ध्यान असो किंवा आहारविहाराचे योग्य नियम असोत. हे सगळं आत्मकल्याणासाठीचं साधन आहे. आधुनिक न्यूरोसायन्ससुद्धा आता हे मान्य करत आहे की, योगामुळे मेंदूच्या पेशींमध्ये पुनर्रचना होते, तणाव संप्रेरक कमी होतात आणि मन अधिक लवचिक बनते. योगामुळे चिंता, नैराश्य आणि थकवा यांना नैसर्गिकरित्या सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होते. योग ही फक्त कृती नाही, ती एक सजग दृष्टी आहे, स्वतःकडे पाहण्याची, स्वतःला समजून घेण्याची आणि संतुलित जीवन जगण्याची. आजच्या धावपळीत, आपले मन पुन्हा एकदा शांत करण्यासाठी आणि शरीर-मन-आत्मा यांच्यात समरसता साधण्यासाठी योग हाच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. आज तुम्हाला ‘मनाची सुटी’ घ्यायची आहे का? तर उत्तर आहे, योग!
- डॉ. शुभांगी पारकर