एरवीही दही खाण्याबाबत दोन मतप्रवाह दिसून येतात. काहींच्या मते, दही हे आरोग्यदायी आहे, तर काही तज्ज्ञ दही सेवन न करण्याचाही सल्ला देतात. म्हणूनच बरेचदा प्रश्न पडतो की, दही खावे की खाऊच नये? मग खायचे असेल तर नेमके किती, कधी आणि कसे खावे? तसेच सध्या पावसाळा सुरु आहे. तेव्हा, पावसाळ्यात दही खाणे कितपत योग्य? तेव्हा, अशाच काही तुमच्या-आमच्या मनातील दह्याच्या सेवनाविषयीच्या शंकाकुशंकांना उत्तर देणारा हा लेख...सध्या पावसाळा ऋतू सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये दही खाऊ किंवा नाही, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तेव्हा, सर्वप्रथम हे समजून घेतले पाहिजे की, पावसाळ्यामध्ये आपली पचनशक्ती मंद झालेली असते. त्यामुळे-
1) दही हे पचण्यास हलके नसून जड असते, त्यामुळे पावसाळ्यात दही खाऊ नये.
2) पावसाळ्यामध्ये आपली प्रतिकारशक्तीसुद्धा कमी झालेली असते. त्यामुळे पावसाळ्यातसुद्धा दही खाऊ नये.
3) पावसाळ्यात दही खाल्ल्याने सर्दी, खोकला, दमा यांसारखे विकार उद्भवू शकतात. तेव्हा अधिक त्रास असेल तर तो जास्त वाढतो. म्हणून या महिन्यांमध्ये दही खाऊ नये.
4) आषाढी एकादशीपासून आपण चातुर्मास प्रारंभ करतो. श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडे दही खाणे वर्ज्य सांगितले आहे, ते वरील कारणांमुळेच. त्यामुळे या महिन्यात (दही किंवा दह्यापासून बनवलेली कढी खाऊ नये.) दही दररोज खाऊ नये. कारण, त्याच्यामध्ये अभिष्यदी गुण असतो. आपल्या शरीरामध्ये जी स्त्रोतसे असतात (म्हणजे पोकळ अवयव) त्यामध्ये अवरोध उत्पन्न करते. ज्यांचे कोलेस्टेरॉल जास्त आहे, त्यांनी दह्याचा प्रयोग दररोज करू नये. दही रात्री खाऊ नये. खरं तर सूर्यास्तानंतर खाऊच नये. कारण, ते कफ वाढवते. सर्दीसारखे कफाचे आजार निर्माण करते. खाण्याची वेळ आली तर, तुपाबरोबर खावे किंवा त्यात साखर मिसळून खावे.
नियमित दही खाल्ल्याने शरीरात, हाडात आम्लता वाढते, केस गळतात, सुरकुत्या लवकर पडतात. आतापर्यंत आपण दही खाऊ नये, कुठच्या वेळी खाऊ नये, हे बघितले. आता ज्यांच्या तोंडाला चव नसेल, ज्यांचं वजन कमी असेल, ज्यांना वारंवार जुलाब होतात, या आजारांत दही अतिशय उपयोगी आहे. शरीराचे बल वाढविणारे आहे. शुक्रवर्धक आहे. दही बनवण्याच्यासुद्धा पद्धती असतात. दूध कोमट करावे. त्याच्यामध्ये दह्याचे विरजण लावावे. ऋतूनुसार उन्हाळ्याच्या दिवसांत अगदी थोडे दही, विरजण म्हणून पुरते. चार ते पाच तासांत उत्तम दही लागते. हिवाळ्यात व पावसाळ्यात जास्त वेळ लागतो.
दही तयार झाले हे कसे समजावे?
त्याच्यावर थोडसं पाणी सुटतं. त्याला ‘दधीमंड’ म्हणतात दही तयार झाले की ते वापरावे. अदमुरे दही - दही जर पूर्ण लागले नाही, तर ते चवीला पूर्ण गोड नसते. आंबट तर नसतेच. ते वापरू नये. ते वापरल्याने त्वचेचे विकार, रक्ताचे विकार होतात.
अति आंबट दही वापरू नये, त्यानेसुद्धा पित्ताचे विकार, रक्ताचे विकार होतात. दही हे कधीही गरम करून वापरू नये. फ्रिजमधून काढलेले थंड असे दही कधीच सेवन करू नये. कारण, असे दही आपली पचनशक्ती आणखीनच मंद करते. तसेच दह्याच्या आर्द्रता निर्माण करण्याच्या गुणामुळे शरीरात स्रोतरोध निर्माण करते. ज्या स्त्रियांना अनियमित पाळी येते, अशा स्त्रियांनी दही मुळीच सेवन करू नये. ज्या व्यक्तींना रक्तदाब, मधुमेह, सूज, दमा आहे अशा व्यक्तींनी फ्रीजमधून काढलेले थंड दही सेवन करूच नये. दह्यावरच्या पाण्याला ‘दधीमस्तू’ म्हणतात. दही एखाद्या कपड्यात बांधून टांगून ठेवले की, जे पाणी खाली उरते त्याला ‘दधीमस्तू’ म्हणतात. त्याला ’व्हे’पण म्हणतात. हे पाणी भूक वाढवते. कफ व वातदोष कमी करते.शरीराची ताकद लगेच भरून काढते. मलसंचयभेदक असा याचा महत्त्वाचा गुण आहे, म्हणजे ज्यांना मलप्रवृत्ती साफ होत नाही. संडासला खडे होतात, त्यांना हे खूप उपयोगी असते. हृदयाला रक्तपुरवठा करणार्या वाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाले, तर हृदयविकारासारखा गंभीर आजार होऊ शकतो. वाहिन्यांमध्ये चरबीचे थर किंवा चिकटा खरवडून काढण्याचा आणि स्रोतसे स्वच्छ ठेवण्याचा महत्त्वाचा गुण दह्याच्या पाण्यात आहे. त्यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांनी आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे पाणी आपल्या आहारात अवश्य समाविष्ट केले पाहिजे, अंदाजे 15 ते 20 मिलीलिटर सकाळच्या वेळी (जेवणामध्ये) घ्यावे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी किमान.
डॉ. अरुणा टिळक
9821478884