‘कोऽहम ते सोहम’ या ‘स्व’शोधाच्या प्रवासाला केवळ आध्यात्मिक आधार नसून, व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात ‘मी कोण?’ या प्रश्नाचे उत्तर सापडणेही तितकेच महत्त्वाचे. त्यामुळे कौटुंबिक, सामाजिक संवादाबरोबरच आजच्या काळात स्वसंवादाचे महत्त्वही प्रकर्षाने अधोरेखित हवे. पण, दुर्दैवाने हा स्वसंवाद आज हरवलेला दिसतो. पर्यायाने आपल्या समस्या, त्यावरची उत्तरं ही बाहेर शोधण्याकडेच आजच्या पिढीचा कल. त्यामुळे या धकाधकीच्या जीवनात स्वविकासाचा जाण्याचा मार्ग हा स्वबोधातूनच जातो.विचलित करणार्या, अनिश्चित आणि गोंगाटाने भरलेल्या जगात, आपण काय करावे याबद्दल सूचनांचा भडिमार आपल्यावर अनेकदा केला जातो. अनेक लोक आपल्याभोवती असतात; काय करावे, काय टाळावे याचे ते भरामसाठ सल्लेही देत असतात. संगणकीय युगात आपण मीडियावर यशस्वी होण्याचे मार्ग, नोकरी शोधण्याचे मार्ग आणि संपन्नता मिळवण्याचे अनेक मार्ग शोधत असतो. कॉर्पोरेट शिडी चढणे, प्रचलित प्रवाहाचे अनुसरण करणे किंवा सामाजिक मानकांचा पाठलाग करणे, काही ना काही शोधात असतो. पण, जर, खरे उत्तर तुमचे ध्येय बाहेर शोधण्यात नसून स्वतःला पुन्हा शोधण्यात असेल तर काय? जर तुम्हाला अजून स्वतःला काय हवे आहे, हे माहीत नसेल तर काय? जर तुमच्या समोरचा प्रत्येक मार्ग तुम्हाला तुमचा वाटतच नाही, तुम्ही दुसर्याच्या मार्गावर चालल्यासारखा वाटत असेल तर काय? ते मनाची घुसमट करणारे नाही का? जग पुढे जात असताना आपण मात्र आहे त्याच जागी चाचपडत आहोत, हा विचार झोप उडवणारा आहे. जर तुमचे अंतर्मन अस्पष्ट किंवा गोंधळलेले असेल, तर ऐहिक यशाचे कोणतेही स्वरूप तुम्हाला समाधान देणार नाही. जर तुम्हाला ते स्वरूप कधीच कळले नाही, जर तुमच्या जीवनाला आकार देणारे स्वप्न कधीच पडले नाही, जर तुम्ही वर्षानुवर्षे अशा गोष्टींचा पाठलाग केला, ज्या कधीच तुमच्यासाठी नव्हत्या, तर आयुष्यभर इतरांच्या स्वप्नांमागे धावत राहून स्वतःला हरवून बसायची शक्यता नाकारता येत नाही.
पण, इथे एक गोष्ट आहे जी तुम्हाला कोणी कधीच सांगत नाही - सध्या सर्व उत्तरे मिळाली नाहीत तरी चालेल. खरं तर, कदाचित हा डळमळीत क्षण, ही अनिश्चितता, काहीतरी मोठ्या गोष्टीची सुरुवात आहे. काय करावे, हे माहीत नसण्यात लाज नाही. एका विशिष्ट वयापर्यंत सर्व काही शोधून काढणे, हा एक सांस्कृतिक भ्रम आहे. घटस्फोट, उद्योगात नुकसान व फसवणूक यामधून जागृत झाल्यावर बरेच लोक खूप नंतर आयुष्यात त्यांचा अनुरूप मार्ग शोधतात. जर तुम्हाला सध्या आयुष्यात काय करायचे, हे माहीत नसेल, तर स्वतःचा पाठलाग करा. स्वतःशी प्रामाणिक संवाद साधण्यासाठी आणि आपल्या मनाच्या खोल गाभ्यापर्यंत पोहोचण्यासाठी अंतर्मुखतेची गरज असते. कारण, तिथेच आपली खरी दिशा लपलेली असते. प्रसिद्ध ब्रिटिश लेखक जे. आर. आर. टोल्किन यांनी लिहिले आहे की, “भटकणारे सर्वच हरवलेले नाहीत. जर तुम्ही जाणीवपूर्वक भटकंती केली, तर ती एक समजूतदार कृती आहे.” याचा अर्थ असा की, तुम्ही आंधळेपणाने अनुसरण करत नाही आहात, तर जाणीवपूर्वक काहीतरी अर्थपूर्ण शोधत आहात.
कारण, जेव्हा तुम्हाला आयुष्यात काय मिळवायचे आहे, काय शोधायचे हे माहीत नसते, तेव्हा एक असा पाठलाग शक्य असतो, जो कधीही वाया जाणार नाही, तो म्हणजे स्वतःचा पाठलाग. आयुष्य हे अनेक पर्यायांनी भरलेले आहे, काही रोमांचक, काही गोंधळात टाकणारे आणि काही लय भारी, जबरदस्त. कधीकधी, पुढचा रस्ता धुक्यासारखा दिसतो, करिअर, नातेसंबंध किंवा उद्देशाबद्दल अनिश्चिततेने भरलेला असतो. अशा क्षणी, जेव्हा बाहेरील सर्व काही धूसर वाटते, तेव्हा सर्वांत धाडसी आणि फलदायी प्रवास म्हणजे आत जाणारा, स्वतःचा पाठलाग करणारा. स्वतःचं सर्वांत निरोगी, आनंदी, तृप्त झालेलं रूप शोधण्याचा प्रवास कधीच वाया जात नाही. तेव्हाच खरे तर तुमचा योग्य मार्ग स्वतःला प्रकट करेल. स्वतःचा पाठलाग करणारी ही कल्पना शब्दांत सोपी वाटली, तरी प्रत्यक्षात ती गूढ आणि गुंतागुंतीची आहे. स्वतःचा पाठलाग करणे म्हणजे तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय महत्त्व आहे आणि तुमच्या जीवनाला काय अर्थ आहे, हे समजून घेण्यासाठी तुमचे लक्ष आत वळवणे. जेव्हा उत्तरं बाहेर नसतात, तेव्हा आत पाहा. करिअर निवडण्यासाठी घाई करण्याऐवजी किंवा दुसर्याच्या यशाच्या आवृत्तीचा पाठलाग करण्याऐवजी, स्वतःचे होकायंत्र बनण्याबद्दल आहे. ‘कोरोना’च्या काळात एक तरुण काम, अभ्यास, नातेसंबंध - सर्वच गोष्टींतून निराश झाला होता. त्याने लहानपणी शिकलेलं गिटार परत उचललं. सुरुवातीला केवळ वेळ घालवण्यासाठी, पण मग संगीतच त्याचं साधन बनलं. काही महिन्यांनी त्याने छोट्या मैफिलींमध्ये वाजवायला सुरुवात केली आणि त्या संगीताने त्याला स्वतःच्या मनातल्या खोल तळाशी पोहोचवले. स्वतःचा पाठलाग करणे म्हणजे स्वतःवर लक्ष केंद्रित करणे का महत्त्वाचे आहे?
जेव्हा तुम्ही तुमच्या एकूण आरोग्यावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुम्ही फक्त स्वतःच्या आरोग्याचा सुधारणांवर काम करत नाही, तुम्ही सुरक्षित आयुष्य जगण्यासाठीदेखील पायादेखील तयार करता. जसजसे तुम्ही निरोगी आणि अधिक आत्मविश्वासू बनता, तसतसे तुम्हाला लक्षात येईल की, कोणते मार्ग तुम्हाला स्वीकारायचे आहेत आणि तुम्हाला खरोखर काय हवे आहे. ही प्रक्रिया तुमच्या डोळ्यांवर दाटलेले असुरक्षिततेचे धुके दूर करते, जेणेकरून तुम्हाला पुढचा रस्ता अधिक स्पष्टपणे दिसेल. उदाहरणार्थ, तुमच्या आरोग्यात गुंतवणूक केल्यानंतर, तुम्हाला इतरांना त्यांच्या फिटनेस प्रवासात मदत करायची आहे, असे वाटेल किंवा कदाचित, तुम्ही स्वतःबद्दल अधिक जागरूक होताच तुमचा नव्याने निर्माण झालेला आत्मविश्वास तुम्हाला अशा नवीन संधी शोधण्यास प्रवृत्त करू शकतो, ज्यांचा तुम्ही यापूर्वी कधी विचारही केला नाही. बाह्य मार्गांचा पाठलाग करण्यापेक्षा किंवा इतरांची नक्कल करण्यापेक्षा हा दृष्टिकोन अधिक फायदेशीर ठरू शकतो. कारण, तो अंतर्गत विकास आणि समाधानावर लक्ष केंद्रित करतो. जेव्हा तुम्ही स्वतःचा पाठलाग करता, तेव्हा तुम्ही तुमच्या हितासाठी आणि कल्याणासाठी ऊर्जेची गुंतवणूक करता, ज्यामुळे तुमच्या जीवनातील इतर सर्व पैलूंसाठी एक मजबूत पाया तयार होतो.
डॉ. शुभांगी पारकर