
स्पर्धा म्हणजे एकाच नाण्याच्या खरं तर दोन बाजू. म्हणूनच ही स्पर्धा नकोशी तरीही हवीहवीशी. स्पर्धा नाही म्हटले की तिथे स्वैराचाराचा दर्प येतो आणि अनैतिक मार्गांनी केलेली स्पर्धा ही तर घातकच. मग नेमके स्पर्धा या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरील अविभाज्य परिस्थितीकडे नेमके बघायचे तरी कसे? काय सांगते स्पर्धेचे मानसशास्त्र... ते आजच्या लेखात समजून घेेऊया...
आधुनिक जगात सर्वत्र स्पर्धेचा जमाना आहे. शिक्षण, करिअर, व्यवसाय, कलेचे क्षेत्र, अगदी आध्यात्मिक पातळीवरही स्पर्धा दिसून येते. स्पर्धा म्हणजे प्रगतीचे साधन आहे, असे मानले जाते. पण, ही स्पर्धा आपल्याला घडवते का की छिन्नविछिन्न करते, हा प्रश्न आज अधिक तीव्रतेने विचार करण्यास भाग पाडतो. स्पर्धा म्हणजे जेव्हा लोक जिंकण्यासाठी जे काही नैतिक असेल व अनैतिक असेल ते सर्वकाही करतात. परंतु, विजेता फक्त एकच असतो. याचा अर्थ असा असू शकतो की, वेगवेगळ्या युक्त्या वापरणे किंवा इतरांपेक्षा चांगले करण्यासाठी तणाव असणे. तरीही जिंकणे हे मुख्य ध्येय असल्याने, स्पर्धा तुम्हाला प्रेरित करते, तुम्हाला सर्जनशीलपणे विचार करण्यास भाग पाडते आणि तुम्हाला यशाची भावना देते. सर्वसाधारणपणे बालपणापासूनच स्पर्धेची बीजे पेरली जातात. अभ्यासात प्रथम यायचे, खेळात चमक दाखवायची, जेथे जमेल तेथे इतरांपेक्षा सरसच ठरायचे, ही अपेक्षा मुलांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या लादली जाते. ती पूर्ण झाली नाही, तर न्यूनगंड, हेवा, द्वेष असमाधान, चिडचिड या भावना उफाळून येतात. कधीकधी मुलांचे मानसिक आरोग्यही ढासळते. आज मुलांमध्ये असणारी चिंता, भीती, आत्महत्येचे वाढते प्रमाण यामागेही अटीतटीची स्पर्धा कारणीभूत आहे.
स्पर्धेला दोन बाजू आहेत. एक म्हणजे, स्वतःशी स्पर्धा - स्वतःच्या क्षमतेचा अधिकाधिक विकास करणे, कालच्या तुलनेत आज अधिक चांगले बनणे. ही स्पर्धा सकारात्मक आहे. ती माणसाला प्रगल्भ करते, आत्मविश्वास देते. दुसरी बाजू म्हणजे, इतरांशी स्पर्धा - ज्यात तुलनांची मालिका असते, असमाधानाची किनार असते आणि यशाची व्याख्या केवळ इतरांना मागे टाकण्यात सीमित होते. आजची सोशल मीडिया संस्कृती ही तुलनांना खतपाणीच घालते. कोण किती सुंदर दिसतो, कुठे फिरायला गेला, काय खाल्ले, काय कमावले - यावरून आपण सतत स्वतःची तुलना करत असतो. त्यातून असमाधान, मत्सर आणि खोटेपणाची मानसिकता वाढते. खरे सांगायचे तर, ही स्पर्धा केवळ बाह्य गोष्टींवर आधारलेली असते. अंतर्मुख होणार्या, शांततेचा शोध घेणार्या व्यक्तींसाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरत नाही.
शैक्षणिक क्षेत्रातही ‘हाय स्कोअर’, ‘टॉप कॉलेज’, ‘रेअरेस्ट ब्रांच’ यांची चढाओढ सुरू असते. मुलांच्या स्वाभाविक गती, आवडीनिवडी, कुवती याचा विचार न करता केवळ गुणांवरून त्यांचे मूल्यांकन केले जाते. यातून एक अवास्तव दबाव तयार होतो. ही स्पर्धा शिकवते, ती एकमेकांना टपकावणे, युक्त्या लढवणे, स्वार्थ साधणे - जे मुळात शिक्षणाच्या मूल्यांशी विसंगत आहे. व्यावसायिक क्षेत्रातही हीच परिस्थिती आहे. नोकरीतील पदोन्नती, पगारवाढ, प्रतिष्ठा यासाठी चाललेली धावपळ कधीकधी नैतिकतेचा, माणुसकीचा बळी घेते. कधीकधी असे वाटते, ही स्पर्धा म्हणजे एक अखंड शर्यत आहे, जिचा अंत नसतो, विश्रांती नसते, समाधान नसते.
मात्र, स्पर्धा पूर्णतः टाळता येणार नाही, हेही तितकेच खरे. कारण, समाजात उत्तमतेचा आणि गुणवत्तेचा पुरस्कार आवश्यक आहे. कोण चांगले काम करतो, कोण अधिक प्रयत्नशील आहे, याचे मूल्यमापन हवेच. मात्र, ते करताना इतरांची ओझी वाटू नयेत, द्वेष निर्माण होऊ नये, ही काळजी घेतली पाहिजे. स्पर्धा ही बहुतेकदा एक शर्यत म्हणून समजली जाते. सन्मान किंवा बक्षिसे मिळविण्यासाठीची लढाई, जिथे व्यक्ती किंवा गट एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, स्पर्धा ही केवळ शारीरिक स्पर्धा नाही. ही पैसा, ओळख, सामाजिक प्रतिष्ठा किंवा अगदी वैयक्तिक वाढ यांसारख्या गोष्टींसाठी एक अव्यक्त संघर्ष आहे. यशस्वी होण्याची ही प्रेरणा जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये दिसून येते, शैक्षणिक कामगिरी आणि खेळांपासून ते करिअरच्या महत्त्वाकांक्षा आणि सामाजिक संवादांपर्यंत!
मुळात, स्पर्धा दुर्मीळ संसाधनांच्या वाटपाबद्दल आहे. नोकरीच्या संधी असोत, शैक्षणिक जागा असोत किंवा अगदी रोमॅण्टिक आवडी असोत, मूळ तत्त्व तेच राहते. प्रत्येकासाठी हवे ते पुरेसे नाही, म्हणून आपण आपल्या वाट्यासाठी स्पर्धा केली पाहिजे. स्पर्धा टंचाई, निकड आणि प्रेरणेची भावना निर्माण करते, ज्यामुळे लोकांना अधिक मेहनत करण्यास आणि त्यांच्या मर्यादेपलीकडे जाण्यास प्रवृत्त करते.
आपल्या संस्कृतीत सहकार, सहअस्तित्व, स्नेह, मैत्री या मूल्यांचा गौरव आहे. स्पर्धेचे अतिरेक होऊन ही मूल्ये नष्ट होऊ नयेत, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जो आपल्या बाजूला धावत आहे, त्याच्याशी सहकार्य करत दोघांनीही अधिक चांगले करणे - ही वृत्ती जोपासायला हवी. स्पर्धा जर सहर्ष सामर्थ्यवृद्धी बनली, तर ती खरोखरीच फलदायी ठरू शकते. शिवाय, स्पर्धा एक प्रेरक साधन म्हणून काम करते. ती आपल्याला आपल्या मर्यादा ओलांडण्यास आणि नवोन्मेष करण्यास प्रवृत्त करते. आपल्या यशाची इतरांशी तुलना करून आपण सुधारणा आणि वैयक्तिक वाढीसाठी क्षेत्रे ओळखतो, ज्यामुळे वैयक्तिक क्षमता आणि व्यापक सामाजिक प्रगतीमध्ये आपण लक्षणीय प्रगती करू शकतो.
तरीही, स्पर्धा करण्याची इच्छा वैयक्तिक समाधानाशीदेखील जोडली जाऊ शकते. अनेकांना केवळ निकालच नाही, तर उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्याच्या प्रक्रियेत आनंद आणि सिद्धीची भावना मिळते. बाह्य बक्षिसांपासून वेगळे असे हे अंतर्गत समाधान एक शक्तिशाली प्रेरक असू शकते. म्हणूनच, आजच्या तरुणाईला, पालकांना, शिक्षकांना आणि समाजाला या स्पर्धेच्या स्वरूपाबाबत पुनर्विचार करायला हवा. केवळ जिंकण्याच्या नादात हरवले जाणारे माणूसपण, नातेसंबंध आणि मानसिक शांतता पुन्हा गवसावी, यासाठी ही शुद्धी आवश्यक आहे.