कोकण किनारपट्टीला धडकणार उंच लाटा - पालघर, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांसह पुणे घाट परिसरात ‘रेड अलर्ट’

    26-Jul-2025   
Total Views |

मुंबई : मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना दि.२६ जुलै रोजी सायंकाळी ५.३० ते दि. २८ जुलै २०२५ रोजी रात्री ८.३० पर्यंत ४.२ ते ४.७ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. याकालावधीत लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा असल्याने प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

राज्यात पुढील २४ तासासाठी पालघर, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यात आणि पुणे घाट परिसरात ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका व सावित्री नदी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील वाघाड धरण ९८ टक्के भरले असून कोळवण नदी पात्रत ५०० ते १ हजार क्युसेक विसर्ग होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुणे जिल्ह्यात पवना धरणातून ७ हजार ४१० क्यूसेक विसर्ग, खडकवासला धरणातून १ हजार ७४४ क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाऊस वाढल्यास विसर्ग वाढवला जाऊ शकतो. याबाबत नागरिकांना सूचना देण्यात आल्या असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गवर खोपोलीजवळ बोरघाटात मुंबई लेनवर दरड कोसळली होती दरड हटविण्यात आली वाहतूक सुरळीत चालू आहे.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असता निजामाबाद जगदलपूर रस्त्यावरील पुलाची संरक्षक भिंत कोसळली होती. सदर मार्ग वाहतुकीसाठी काही वेळ बंद करण्यात आला होता. सध्या सदर रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत चालू आहे. राज्यात सध्या सुरू असलेला पाऊस व संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.