आपल्या शरीररचनेप्रमाणे प्रत्येक सांध्याच्या ठेवणीनुसार एक तेलाची, ज्याला ‘वंगण’ म्हणता येईल, अशी पिशवी असते. जसजसा सांध्याचा वापर होत जातो, तसतसं हे तेल संपायला लागतं व सांध्यातील कूर्चा (कार्टिलेजेस) कडक होऊन सांध्यातील हाडे एकमेकांवर घासायला सुरुवात होते व सांधे दुखायला सुरुवात होते. ते होऊ नये, म्हणून उत्तम नैसर्गिक उपाय म्हणजे तेलाचा मसाज. प्रत्येक सांध्यावर कसा करायचा, हे तंत्र जाणून मसाज करायचा असतो. मसाजकरिता शास्त्रात दिवसही ठरवून दिलेले आहेत. स्त्री-पुरुषांसाठी वेगवेगळे दिवस आहेत. ‘मॉडर्न सायन्स’ला हे माहीत नाही. त्यामुळे ते हा उपाय सूचवत नाहीत. त्याची कारणं फार वेगळी आहेत. आजकाल ‘मेडिकल सायन्स’च्या सर्व गोष्टी व्यावसायिक झाल्या आहेत, हेही त्यात मुख्य कारण आहे. ते असू दे. तो विषय आपला नाही, तर भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचा तो विषय आहे, ज्यांनी भारतीय उपचार पद्धती विकसित करण्याचा विडा उचलला आहे. आपण भारतीय पद्धतीने यावर योगोपचार काय आहेत, ते बघूया.
गुडघेदुखी व पायदुखीवर योगासने
1. जानू-शिरासन/वृक्षासन:
कृती : खाली बसून पाय समोर तिरपे पसरून बसा. उजवी टाच पकडून ती डाव्या जांघेत फसवा. जांघेतील धारणाशक्तीच्या तीन ग्रंथीवर दाब येईल, अशी रचना करावी. दोन्ही हात श्वास खेचत वर पसरवा व मान मागे वळवून छताकडे बघा. श्वास सोडत डाव्या पायाकडे शरीर झुकवून हातांनी डाव्या पायाची बोटे, घोटा अथवा पोटरी, जे शक्य असेल ते धरून ठेवा. दोन्ही दंडांमध्ये मान, डावा गुडघा जमिनीकडे दाबलेला, डोळे बंद अशी स्थिती घ्या. श्वास खेचा, श्वास सोडत कमरेतून पुढे वाकत, कोपर बाहेरच्या दिशेने वाकवत कपाळ गुडघ्यांवर लावण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास करू नका. याचा उद्देश डाव्या जांघेतील ग्रंथीवर दाब आला पाहिजे. तो अनुभवा. श्वास खेचत पाय न सोडता पूर्वस्थितीत या. श्वास खेचून सोडत परत खाली जा. अशी पाच-दहा आवर्तने करा. हीच कृती उजव्या जांघेतील ग्रंथीवर दाब येण्यासाठी डाव्या टाचेने करा. 15 दिवस असा सराव झाला की, दोन व तीन स्थिती माहीत करून योगशिक्षकांच्या निगराणीखाली करा. (चित्र बघा) वृक्षासनातही हे साधते. त्याने पायदुखी पुर्णपणे थांबते, असा अनुभव आहे.
2. अर्ध-पश्चिमोत्तानासन (1/2/3 स्थिती) :
कृती : खाली बसून पाय समोर पसरून बसा. दोन्ही हात श्वास खेचत वर पसरवा व मान मागे वळवून छताकडे बघा. श्वास सोडत पायाकडे शरीर झुकवून हातांनी पायाची बोटे, घोटे अथवा पोटर्या, जे शक्य असेल ते धरून ठेवा. दोन्ही दंडांमध्ये मान, गुडघे जमिनीकडे दाबलेले, डोळे बंद अशी स्थिती घ्या. श्वास खेचा, श्वास सोडत कमरेतून पुढे वाकत, कोपर बाहेरच्या दिशेने झुकवत कपाळ गुडघ्यांवर लावण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास करू नका. श्वास खेचत पाय न सोडता कोपर सरळ करत पूर्वस्थितीत या. श्वास खेचून सोडत परत कमरेतून वाकत खाली जा. अशी दहा ते 25 आवर्तने करा. प्रत्येक वेळी कमरेतून वाकत खाली जा, केवळ खांद्यांतून वाकत खाली जाण्याची चूक करू नका. 15 दिवस सराव झाला की दोन व तीन स्थिती माहीत करून योगशिक्षकांच्या निगराणीखाली करा.
3. वक्रासन-(1/2 स्थिती)
वरील पाय पसरून बसलेल्या स्थितीतून डावे पाऊल उजव्या गुडघ्याजवळ ठेवा. डावा हात शरीराच्या मागे पाठीच्या कण्याच्या सरळ रेषेत ठेवा. उजवे कोपर डाव्या गुडघ्यात अडकवून उजव्या हाताने डावा घोटा धरा. शरीर तीन ठिकाणी, कंबर, छाती व मान येथून डावीकडून मागे फिरवा, ताण अनुभवून समोर या व परत तीन वेळा फिरवा. अशीच कृती उजवीकडे करा. (चित्र बघा)
(क्रमशः)
- गजानन जोग
(लेखक योगोपचारतज्ज्ञ व समुपदेशक आहेत.)