ताक हे अनेकांच्या आवडीचे. फक्त उन्हाळ्यातच नव्हे तर सर्वच ऋतूंमध्ये ताक हे हितकारक मानले जाते. तेव्हा, आजच्या या लेखात ताकाचे आरोग्यविषयक फायदे आणि त्याचे विविध प्रकार यांची माहिती करुन घेऊया...
ताक म्हणजे रवीने चांगले घुसळलेले दही. सामान्यतः दह्यात चौथा हिस्सा पाणी घालतात. ताक हे आंबट, गोड, तुरट जठराग्नी प्रदीप्त करतो. अन्नाचे सम्यक पचन करतो. भूक वाढवतो. ते शुक्रधातूला हितकारक आहे. ताक रसधातूच पोषण करतो. त्यामुळे तृप्ती समाधान उत्पन्न होते. ताक प्यायल्यावर थकवा तत्काळ कमी होतो. मनाची तृप्ती होते. ताक अग्निप्रदीप्त करतो व मल बांधून आणतो. अग्निप्रदीप्त केल्यामुळे ते ग्रहणी रोगांमध्ये उपयोगी असते. ताक अग्निदीपक व स्रोतरोध नाहीसे करतो. त्यामुळे सूज, मुळव्याध, उदररोग, मूत्र प्रवृत्ती अडणे प्लीहावृद्धी, गुल्मरोग या व्याधीत अत्यंत उपयुक्त आहे.म्हणून आयुर्वेद तज्ज्ञ अनेक वेळा अशा अवस्थेत भोजनामध्ये ताकाचा समावेश करण्याचा रुग्णाला सल्ला देतात.
ताकाचे प्रकार
ताकाचे पुढीलप्रमाणे पाच प्रकार पडतात:
1) दधीमंण्ड
2) मथित मठ्ठा
3) तक्र
4) उदश्वित
5) छच्छिका ताक
याप्रकारे ताकाचे पाच प्रकार पाडण्यात येतात. तसेच, त्याच्या वेगवेगळ्या गुणधर्माप्रमाणे वेगवेगळ्या रोगांवर त्यांचा उपयोग केला जातो. प्रसूत स्त्रीला (बाळंतीण बाई) ताक देताना ताजे गोड ताक द्यावे. लोखंडाची पळी गरम करून ती ताकात बुडवावी आणि त्या उष्णतेने कोमट झालेले ताक द्यावे. त्यामुळे आईला व बाळाला त्रास होत नाही.
संस्कारित ताक
नुकतेच आपण बाळंतीण बाईला ताक कसे द्यावे हे बघितले. त्यामागचे कारण असे आहे की, प्रसूती क्रियेमध्ये तिचा बराच रक्तस्राव होऊन लोह कमी झालेले असते. तापलेल्या लोखंडी पळीतून ताकातल्या लॅक्टिक आम्लाद्वारे (लॅक्टिक आम्ल बनवण्याच्या क्रियेशिवाय दही, ताक बनवू शकत नाही.) लोखंडाचे अल्प पण योग्य प्रमाणात शुीींरलींळेप होते. अर्थातच असे ताक बाळंतपणात फारच उपयुक्त ठरू शकते. लोह शोषून घेण्यासाठी सी जीवनसत्वाची गरज असते. (जसे की वरण-भातावर आपण लिंबू पिळले की, त्या सगळ्या गोष्टींत वरण व भातामधले लोखंड आपल्या शरीराला पुरेपूर मिळते.) यालाच ‘संस्कारीत ताक’ असेही म्हणू शकतो. लोखंडाच्या पळीमध्ये तूप घालावे. तूप गरम झाल्यावर त्याच्यात जिरे, हिंग, थोडीशी मिरची घालावी आणि चांगली फोडणी झाली की, ताकात पळीसकट बुडवावे. त्याची चव खूप छान लागते.
1) ताकाचे प्रकार (दधीमण्ड): दह्यात पाणी घातल्याशिवाय जे ताक घुसळून केले जाते, त्याला ‘दधीमण्ड’ म्हणतात. ते ग्राही असते. म्हणजे मळ रोखणारे असते. दीपक, पाचक, शीतल असते. वातनाशक पण कफवर्धक असते. हिंग, जिरे, सैंधव घालून घेतले असता, वातनाशक हर्ष व अतिसार दूर करते, रुची वाढवते, पुष्टी देते, बलवर्धक असते. नाभीपासून खालील पोटाचा म्हणजे (ओटी पोटामधील) वेदना कमी करते. या ताकामध्ये गूळ घातले असता, ते मूत्रकृच्छावर (उन्हाळी लागणे) उत्तम उपयोगी पडते. यात साखर घातली असता, याचे गुणधर्म आंब्याच्या रसाइतके श्रेष्ठ होतात.
2) ताकाचे प्रकार-मथीत/मठ्ठा : साधे दही चांगल्या प्रकारे घुसळून घेतात आणि त्यात जवळजवळ तिप्पट पाणी घालतात.त्याला ‘मठ्ठा’ असे म्हणतात. मठ्ठा कफ व पित्तनाशक असतो. उष्णतेमुळे होणारे जुलाब अर्श संग्रहणीवर उपयुक्त आहे. पूर्वीच्या काळी लग्नाच्या जेवणावळीमध्ये जिलबीबरोबर मठ्ठा असायचाच. त्याच्यामध्ये एकदम पातळ ताक घेतात. त्यामध्ये थोडेसे चवीपुरते मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेले आले घालतात. असा मठ्ठा अतिशय चविष्ट लागतो.
3) तक्र : दह्याच्या चौथ्या भागाइतके पाणी घालून जे ताक बनविले जाते, त्याला ‘तक्र’ म्हणतात. तक्र मलास रोखते. तुरट, आम्ल पाकाने व मधुर रसाने पचण्यास हलके बनते. किंचित उष्णवीर्य असते. अग्निदीपक, मैथुन शक्तिवर्धक, तृप्तीदायक व वातनाशक असते. हे ग्रहणी रुग्णांना पथ्यकारक असते. तसेच, मधुर पाकाने पित्त प्रकोप करत नाही आणि (कषाय) तुरट, उष्णवीर्य रुक्ष असल्याने कफ दूर करतो.
4) उदश्वित : दही घुसळून त्यात अर्धा भाग पाणी घालून जे ताक तयार होते, त्याला ‘उदश्वित’ असे म्हणतात. ते कफकारक बलवर्धक आणि आम्लनाशक असते.
5) छच्छिका : साईचे दही घुसळावे व चांगले घुसळल्यावर त्यात पाणी घालावे. वर लोणी येते, ते लोणी काढून ठेवावे. त्यात परत पाणी घालावे. असे जे पातळ ताक असते, त्याला ‘लोण्याखालचे ताक’ म्हणतात. या ताकातील सर्व लोणी संपूर्णपणे काढून घेतले जाते. हे ताक आरोग्यदायी व लघु असते. ज्या ताकातील लोण्याचा थोडासा भाग त्यात ठेवलेला असतो. असे ताक पचायला जड, वृष्य व कफकारक असते. जे ताक लोण्यासह घेतले जाते. ते ताक पचायला खूप जड, पौष्टिक आणि कफवर्धक असते. दधीमण्डापेक्षा मठ्ठा, मठ्ठापेक्षा ताक पचण्यास हलके असते.