स्पर्धेचे मानसशास्त्र : अस्मितेच्या स्पर्धेतील मानसिकतेचा शोध

    09-Jun-2025
Total Views |
 competition in human life
आजच्या युगावरच आपण खरं तर ‘स्पर्धात्मक युग’ असा कायमचा शिक्का मारल्याने, स्पर्धेचे मानवी जीवनातील स्थान लक्षात यावे. स्पर्धा तर सर्वत्र असते. मग नेमके या स्पर्धेला कसे तोंड द्यावे? स्पर्धा आणि प्रतिस्पर्धा यामध्ये नेमका फरक तो काय? यांविषयी ऊहापोह करणारा हा लेख...


स्पर्धा ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग. ती बालपणातील खेळांपासून जागतिक राजकारणापर्यंत, भावंडांतील तणावापासून व्यावसायिक क्षेत्रातील चढाओढीपर्यंत सर्वत्र आढळते. जरी ‘स्पर्धा’ आणि ‘प्रतिस्पर्धा’ हे शब्द एकमेकांच्या जवळचे वाटले, तरी मानसशास्त्राच्या दृष्टीने ‘रायव्हलरी’ ही म्हणजेच वैयक्तिक प्रतिस्पर्धा एक अधिक खोल आणि भावनिक संकल्पना आहे.


प्रतिस्पर्धा म्हणजे केवळ जिंकण्याचा प्रयत्न नाही, तर एखाद्या विशिष्ट व्यक्तीला हरविण्याची तीव्र इच्छा असते. यात स्वतःची अस्मिता, भावनिक गुंतवणूक आणि आत्मसन्मान गुंतलेला असतो.


प्रतिस्पर्धेची मुळे


 मानवाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात प्रतिस्पर्धेची मुळे खोलवर रुजलेली आहेत. प्रारंभीच्या काळात मर्यादित अन्न, निवारा आणि जोडीदार मिळवण्यासाठी माणसांना एकमेकांशी स्पर्धा करावी लागत असे. म्हणूनच मानसिकदृष्ट्या प्रतिस्पर्धा ही प्रेरणा देणारी शक्ती होती, जी जिवंत राहण्यासाठी आणि आपले सामाजिक स्थान किंवा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आवश्यक होती.



आजच्या काळात हे केवळ अस्तित्वापुरते मर्यादित राहिलेले नाही. स्पर्धा ही आत्मसन्मान, ओळख, प्रतिष्ठा आणि वैयक्तिक यशाशी निगडित झाली आहे. त्यामुळे आजच्या स्पर्धांमध्ये भावनिक गुंतवणूक अधिक असते.


प्रतिस्पर्धेची वैशिष्ट्ये


मानसशास्त्रज्ञांच्या मते, तीन प्रमुख गोष्टी वैयक्तिक प्रतिस्पर्धा अधिक तीव्र करतात:


राजकीय, सामाजिक किंवा वैयक्तिक क्षेत्रात स्पर्धा ही मानवी वर्तनाचा अत्यावश्यक भाग आहे. परंतु, काही नात्यांमध्ये, विशेषतः जिथे पुनःपुन्हा संपर्क, साम्य आणि समान दर्जा असतो, तिथे ही स्पर्धा केवळ सामान्य चढाओढ न राहता, तीव्र मानसिक व भावनिक संघर्षामध्ये परिवर्तित होऊ शकते. खाली या तीन मुद्द्यांचा विस्ताराने विचार केला आहे:


१. पुनःपुन्हा संपर्क येणे


जेव्हा दोन व्यक्ती सतत एकमेकांच्या संपर्कात राहतात. उदा. कार्यालयातील सहकारी, शेजारी, मित्रमंडळ, सहाध्यायी किंवा खेळाडू - तेव्हा एक प्रकारची ’सामाजिक पार्श्वभूमी’ तयार होते. या इतिहासात पूर्वीच्या यशापयशांची तुलना, चुकीच्या निर्णयांची आठवण, केलेल्या उपकारांची जाणीव किंवा ईर्ष्या साठलेली असते. यामुळे पुढील प्रत्येक संपर्कामध्ये भावनिक गुंतवणूक वाढते.


उदाहरणार्थ, एका कार्यालयात दोन सहकारी सातत्याने एकाच पदासाठी स्पर्धा करीत असतील, तर त्यांच्या संवादात सतत तुलनात्मकतेचा आणि अप्रत्यक्ष तणावाचा प्रभाव राहतो. ही पुनरावृत्ती त्या व्यक्तींच्या वागणुकीत असुरक्षितता, शंका आणि संघर्षही निर्माण करू शकते. लोक स्वतःची ओळख इतरांच्या तुलनेतच ठरवतात.


साम्य


जेव्हा दोन व्यक्तींमध्ये वय, शिक्षण, कौशल्य, सामाजिक स्तर, आर्थिक पार्श्वभूमी किंवा सामाजिक अनुभव याबाबतीत साम्य असते, तेव्हा त्या एकमेकींसाठी प्रत्यक्ष स्पर्धक होतात. कारण, अशा व्यक्तींना या दुसर्या व्यक्ती स्वतःच्या प्रतिबिंबासारख्या भासतात आणि त्यांचे यश किंवा अपयश स्वतःच्या यशाच्या किंवा अपयशाच्या मोजपट्टीसारखे भासते. उदाहरणार्थ, एकाच घरात वाढलेली भावंडे, विशेषतः एकाच वयोगटातील, आपापसांत सहसा जास्त स्पर्धात्मक असतात.


दोन डॉटर जे एकाच वयोगटात असून, एकाच रुग्णालयामध्ये काम करतात आणि ज्यांची सारखीच शैक्षणिक पार्श्वभूमी आहे, त्यांच्यात नैसर्गिकरित्या तुलना होते. ही तुलना सकारात्मक स्पर्धेतून सहकार्यही निर्माण करू शकते, पण अनेकदा ईर्ष्या, महत्त्वाकांक्षा आणि मानसिक दडपण यांमध्ये बदलते.


३. समान दर्जा किंवा कौशल्य


जेव्हा दोन व्यक्ती अत्यंत समान क्षमतेच्या असतात, उदा. दोघेही हुशार, परिश्रमी, लोकप्रिय किंवा नेतृत्वगुणांनी संपन्न असतात, तेव्हा स्पर्धा अधिक तीव्र होते. कारण, दोघांनाही वाटत असते की, मी त्याच्यापेक्षा कमी नाही. या बरोबरीमुळे यश हे फक्त गुणवत्ता नव्हे, तर नशीब, राजकारण याआधारे मिळतं, असं वाटू लागते आणि या भावना अधिक तीव्र होतात. अशा परिस्थितीत एकमेकांचे यश ही प्रेरणा ठरण्याऐवजी असह्य वाटू शकते. कौशल्य आणि क्षमता समान असताना जो थोडीशी आघाडी घेतो, त्याच्याकडे इतराचा राग, असुया किंवा दोषारोप सुरू होतो.


उदाहरणार्थ, दोघेही उत्तम वक्ते असलेल्या सहाध्यायींमध्ये सन्मानपत्रासाठी किंवा व्याख्यानात बोलण्याच्या संधीसाठी स्पर्धा अधिक तीव्र होते. सिनेमाक्षेत्रात समान लोकप्रियतेच्या दोन अभिनेत्यांमध्ये गुप्त प्रतिस्पर्धा सुरू असते, जिचं प्रतिबिंब माध्यमात किंवा चाहत्यांच्या चर्चेतही दिसतं.


निष्कर्ष


पुनःपुन्हा संपर्क, साम्य आणि समान दर्जा ही तीन कारणं मानवमात्रामध्ये स्पर्धा तीव्र का होते, हे स्पष्ट करतात. ही स्पर्धा प्रेरणा ठरू शकते, पण ती जर नीतिमूल्ये, आत्मसन्मान आणि परस्पर आदर नष्ट करेल, तर तिचा शेवट वैर, तणाव आणि मानसिक थकव्यामध्ये होतो. अशा स्पर्धेचे निरसन करण्यासाठी स्वस्वीकृती, प्रगतीची वैयक्तिक व्याख्या आणि योग्य संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे स्पर्धा सहकार्यामध्ये परिवर्तित होऊ शकते, जी खरी प्रगतीची नांदी आहे. जर्मन तत्त्वज्ञ नीत्शे यांचे वचन लक्षात ठेवण्यासारखे आहे, ‘जो राक्षसांशी झुंज देतो, त्याने हे लक्षात ठेवावे की, तो स्वतः राक्षस होऊ नये.’ स्पर्धेच्या वाटचालीत स्वचिंतन, संयम आणि सद्भावना हीच आपली खरी शस्त्रे आहेत.


डॉ. शुभांगी पारकर