नाठाळांचे माथी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2020
Total Views |
samarth swami_1 &nbs


नाठाळांना प्रसंगी डोक्यात काठी घालून समर्थांनी वठणीवर आणले आहे. आज समर्थ ग्रंथरुपाने वैचारिक प्रहार करीत आहेत. आपण त्यांचे अध्ययन करून त्याला सामोरे गेले पाहिजे. समर्थ विचारांचे फटके दासबोधातून आणखीही शोधता येतील. त्यासाठी साधकाची दृष्टी हवी.


अज्ञानामुळे समाजात काही समज इतके दृढ झालेले असतात की, ते घालवण्यासाठी संतांना कठोरपणे बोलावे लागते. संत निःस्वार्थी, बुद्धिमान, ज्ञानी असल्याने आपल्या अधिकारवाणीने व विचाराने समाजविचारात बदल घडवून आणू शकतात. समाजात सुधारणा घडवून आणण्याचा विचार स्वामींच्या मनात आल्यावर त्यांनी पारमार्थिक विचारांबरोबर प्रपंचविज्ञानाचे प्रतिपादन करायला सुरुवात केली. ‘बुडते हे जन व देखवे डोळा’ असे तुकारामबाबा म्हणाले, त्या बुडत्या लोकांना फटके मारून वठणीवर आणण्यासाठी समर्थांनी लोकांच्या भ्रामक समजुतींवर आघात करायला सुरुवात केली. त्यापैकी काही फटकारे आपण मागील लेखात पाहिले.

“आमच्यासारख्या नाठाळ माणसांना एकदा सांगून समजत नाही. त्यामुळे तेच ते पुन्हा पुन्हा सांगावे लागते,” असे स्वामींनी म्हटले आहे. त्यामुळे समाजातील भ्रामक कल्पनांवर फटकारे मारून स्वामींनी समाजसुधारणेचे कार्य पुढे नेले. त्यांचा आढावा घ्यायचा आहे.

एखादे मोठे काम पार पाडायचे, तर त्यासाठी वेगवेगळ्या योजना विचारात घ्याव्या लागतात. त्यासाठी लोकांची मते विचारात घेऊन कार्याची दिशा ठरवावी लागते. हे योग्य आहे. सर्व विचार तपासून कार्याची दिशा निश्चित झाली. लोक त्या कामासाठी एकत्र आले की लोकांनी कामाला लागावे. एकदा कामाला गती मिळाली की, तत्संबंधी मतमतांतराचा प्रश्न येत नाही. पण, तरीही काही अहंकारी लोक पुन्हा आपले मत मांडून त्यावरून भांडत बसतात. त्या लोकांचा अहंकार त्यांना स्वस्थ बसू देत नाही. ते वादविवाद वाढवतात. समर्थांच्या भाषेत, ‘जो तो बुद्धीच सांगतो.’ या वादामुळे वेळेचा अपव्यय होऊन नियोजित कार्याचा नाश होतो. हे निरर्थक वाद स्वामींना मान्य नाहीत. स्वामी म्हणतात, आपण वाद घालीत बसलो म्हणून काही काळ थांबत नाही, आयुष्य थांबत नाही. आयुष्य गतिमान आहे. तेव्हा कार्याची दिशा एकदा ठरल्यावर वादविवाद करून निरर्थक वेळ घालवणे शहाणपणाचे नाही. लोकांचे नेतृत्व करणार्‍या माणसाने आपल्या गटात असा गलका माजू देऊ नये. असा गलका माजवणार्‍या लोकांना स्वामींनी जाणीव करून दिली आहे की-



लौकिकी गलबला होतो । काळ जातो निरर्थकू ।
विवेकी करीना ऐसे । आयुष्ये धाव घेतली ॥



समाजातील काही लोकांना वादविवाद करण्याची भारी हौस असते. स्वतःजवळ चांगले विचार नसतानाही काही लोक केवळ वादाकरिता वाद घालत बसतात. तुम्ही जे मत व्यक्त करता, त्याच्याविरोधी मत घेऊन हे लोक, ‘मग हे असे का नाही’ असे वायफळ मुद्दे उपस्थित करून उगीच वेळ घालवीत असतात. बरं त्यांच्या मतप्रदर्शनात काही अक्कलहुशारी असेल तर आपण समजू शकतो. समोर वेगळे उपयुक्त मत आले तर संवाद घडून येतो. पण, बेअक्कलपणे वाद घालत बसणे हे केवळ आपली वादाची हौस भागवण्याकरता केलेले कृत्य असते. त्यातून काही निष्पन्न होत नाही. स्वामींनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ‘म्हणोनी वादविवाद । सांडोन कीजे संवाद ॥’ ‘मनाच्या श्लोका’तही स्वामींनी सांगितले आहे की, ‘नको रे मना वाद हा खेदकारी.’ वादाने खेद निर्माण होतो, हे माहीत असूनही तो सोडून देण्याची बुद्धी या वादपटूंना होत नाही. समर्थ ‘मनाच्या श्लोका’त कळकळीने सांगतात की,



जनी वादविवाद सोडूनि द्यावा ।
जनी सुखसंवाद सुखे करावा ॥



पण, तरीही वादाची हौस असणारे हा उपदेश मनावर घेत नाहीत. निरर्थक वाद घालायला अक्कल लागत नाही. उलट बेअक्कलपणाचे ते प्रदर्शन असते. अशा वादहौशी लोकांना समर्थांनी फटकारले आहे.



आकलबंद नाही जेथे। अवघेचि विस्कळीत तेथे।
येके आकलेविण ते। काय आहे॥



अक्कलहुशारीने, समंजसपणे विचार प्रगटीकरण केले, तर तो वाद न होता संवाद होतो. एका अकलेशिवाय सर्व व्यर्थ आहे. बेअक्कलपणे वाद वाढवणार्‍यांना स्वामींनी हा फटका दिला आहे.


काही लोकांना स्वतःची लायकी नसताना, आपल्या वाडवडिलांचा बडेजाव सांगून स्वतःचीच स्तुती करण्याची सवय असते. त्यांना असे वाटत असते की, आपले वाडवडील मोठे, आपले घराणे नावाजलेले, मान्यता पावलेले असे सांगितल्याने लोक माझी योग्यता, म्हणजेच नालायकी विसरून जातील. त्याकडे लक्ष देणार नाहीत. आपल्या अंगी कर्तृत्व नसतानाही केवळ वडिलांच्या नावलौकिकावर आपल्याला नाव मिळेल, अशी त्यांना आशा असते. म्हणून ते वडिलांची म्हणजेच पूर्वजांची कीर्ती वारंवार सांगत असतात. स्वामींनी त्यांचे कान उपटून त्यांना वेगळ्याच गटात बसवले आहे.



आपली आपण करी स्तुती । स्वदेशी भोगी विपत्ती ।
सांगे वडिलांची कीर्ती । तो येक मूर्ख ॥ (२.१.१२)



मूर्खलक्षणात व पढतमूर्खलक्षणात स्वामींनी अनेक नमुनेदार प्रसंग सांगून तसे वागणार्‍यांना फटकारले आहे.


समाजात अशीही काही माणसे असतात की, ज्यांना आपल्या जातीचा, कुळाचा वृथा अभिमान असतो. ती माणसे अहंकाराने वारंवार आपल्या जातीच्या श्रेष्ठत्वाचा उल्लेख करीत असतात. बरं, त्यांच्या जातीचे श्रेष्ठत्व मान्य करावे, तर त्याच जातीत उपजाती व गोत्र आढळतात. तेथे पुन्हा श्रेष्ठ-कनिष्ठतेचा मुद्दा येतो. गोत्राचा विचार करताना ही अहंकारी माणसे ‘आमचे गोत्र श्रेष्ठ’ असे सांगत सुटतात. गोत्राच्या विचारातून पुढे जावे तर कुळाभिमान डोके वर काढू लागतो. कुळाच्या आडनावाच्या श्रेष्ठ-कनिष्ठतेत ही अहंकारी माणसे मग वैयक्तिक पातळीवर येतात. माझे ज्ञान माझ्या मोक्षकल्पना यावर श्रेष्ठत्व सांगत सुटतात. या गोष्टींना काही अंत नाही. या वृथाभिमानी, अहंकारी माणसांना समर्थांनी ‘भ्रमिष्ट’ म्हणून फटका लगावला आहे.



देहाभिमान कर्माभिमान। जात्याभिमान कुळाभिमान।
ज्ञानाभिमान मोक्षाभिमान। या नाव भ्रम॥ (१०.६.२९)



लोक आपल्या परंपरेनुसार, आवडीनुसार किंवा उपदेशानुसार देवदेवतांचे भजनपूजन करीत असतात. त्याला पुढे व्रतवैकल्ये, उपासतापास यांची जोड मिळाल्यावर भौतिक प्राप्तीसाठी अनेक कल्पना रूढी निर्माण होतात. अशाश्वत चंचळामागे धावण्यासाठी लोकांनी या क्षेत्रात अनेक मतप्रवाह निर्माण केले. त्या मतप्रवाहांची शास्त्रे तयार झाली. खरा देव बाजूला राहून अनेक देवदेवतांचा बाजार भरला. त्यात, मरण पावलेल्यांचाही समावेश होऊ लागला. परमार्थात अराजक निर्माण झाले. अशी स्थिती पाहिल्यावर रामदास कडाडले,



देव जाले उदंड। देवांचे माजले भंड।
भूतदेवांचे थोतांड। येकचि जाले॥
शास्त्रांचा बाजार भरला। देवांचा गल्बला जाला।
लोक कामनेच्या व्रताला। झोंबोन पडती॥



सगळ्यांचा अंतरात्मा एकच आहे. तेव्हा त्यांच्यात भेदभाव करू नये, अशी वाक्ये ऐकायला गोड वाटली तरी त्यांचा बेसावध समाजावर दुष्परिणाम होतो. सर्व माणसे सारखी हा भोळा भाव स्वामींना काढून टाकायचा होता. ते म्हणाले, या जोरावर माकडाला काही राजा करता येणार नाही. माणसे आणि गाढवे यांच्यात काही फरक नाही का? पंडितांच्या सभेत वात्रट पोरांना बोलू देणे योग्य होईल का? अंतरात्मा एक असला तरी देव वाटेल त्या लोकात वास करीत नाही. समाजात भेद हा राहणारच. समाजातील एकत्वाच्या भाबड्या कल्पनेला स्वामींनी फटकारले आहे.



पंडित आणि चाटें पोरे। येक कैसी॥
मनुष्य आणि गधडे। राजहंस आणि कोंबडें।
राजे आणि माकडे। येक कैसी॥ (१३.१०.१४)

भागीरथीचे जळ आप। मोरी संवदणी तेंहि आप।
कुश्चिल उदक अल्प । सेववेना ॥ (१५)



वाहत्या गंगेत पाणी आहे. तसेच मोरी किंवा धोब्याची कढई यातही पाणीच आहे. पण, गंगेचे पाणी पिता येते, तसे गटाराचे किंवा धोब्याकडील कपडे धुतलेले अल्प पाणीसुद्धा पिता येत नाही. म्हणून सर्वच समभाव ही भ्रामक समजूत स्वामींनी मोडीत काढली.
नाठाळांना प्रसंगी डोक्यात काठी घालून समर्थांनी वठणीवर आणले आहे. आज समर्थ ग्रंथरुपाने वैचारिक प्रहार करीत आहेत. आपण त्यांचे अध्ययन करून त्याला सामोरे गेले पाहिजे. समर्थ विचारांचे फटके दासबोधातून आणखीही शोधता येतील. त्यासाठी साधकाची दृष्टी हवी.
-सुरेश जाखडी
@@AUTHORINFO_V1@@