डोंबिवली, डोंबिवलीत प्रथमच श्री जगन्नाथ रथयात्र मोठय़ा उत्साहात संपन्न झाली. निमित्त होते ते भाजपा आमदार व प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जगन्नाथ रथयात्रेचे.
या रथयात्रेला रविवारी आप्पा दातार चौकातून प्रारंभ झाला. या रथयात्रेत सकल उत्कल समाज, श्री राधाकृष्ण सेवा संस्था, रिजेन्सी अनंतम् उत्सव समिती या संस्था सहभागी झाल्या होत्या. आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते रथयात्रेला सुरूवात करण्यात आली. आप्पा दातार चौकातून ही रथयात्रा मदन ठाकरे चौक, ब्राम्हण सभा, लोकमान्य टिळक पुतळा, मंजुनाथ शाळा, शिवाजी महाराज चौक, पेंढरकर महाविद्यालय येथे फिरून रिजन्सी अनंतम संकुल येथे रथयात्रा समाप्त झाली. यावेळी भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष मितेश पेणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या रथयात्रेपूर्वी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सकाळी ९ वाजता संकुलातील श्री राधा-कृष्ण मंदिरात भगवान जगन्नाथ, बलभद्र व सुभद्रा यांचे आगमन, पूजा,पठण आणि कीर्तन संपन्न झाले. दुपारी १२ वाजता ५६ भोग अर्पण करण्यात आले. दुपारी श्री गणपती मंदिर, आप्पा दातार चौक येथून रथयात्रेला सुरूवात झाली. पहंडी करत रथाकडे प्रयाण झाल्यानंतर रथयात्रेचा शुभारंभ झाला. रविवारी सायंकाळी श्री राधा कृष्ण मंदिरात आरती, कीर्तन व प्रवचन संपन्न झाले. रथयात्रेत आप्पा दातार चौकापासून ते रिजन्सी अनंतम येथे पर्यत भाविकासाठी बसची व्यवस्था केली होती.