वारली चित्रकला प्रशिक्षण समारोप सोहळा उत्साहात पार

    29-Jun-2025
Total Views |

पालघर, HSC, मुंबईने WRO अंतर्गत बहारे गाव, तालुका डहाणू, जिल्हा पालघर येथे २ मे २०२५ ते २८ जून २०२५ दरम्यान ३० अनुसूचित जातीच्या कारागिरांसाठी आयोजित केलेला गुरु-शिष्य हस्तकला प्रशिक्षण परंपरा (GSHPP) कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. हा प्रशिक्षण कार्यक्रम मास्टरक्राफ्ट व्यक्ती अनिल चैत्या वांगड यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि NHDP योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी आयोजित करण्यात आला होता.

समारोपप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत बहारे व घाडणे गावांचे प्रतिनिधी, तसेच पद्मश्री (२०११) आणि शिल्पगुरू (२००२) पुरस्कार प्राप्त दिवंगत जीव्या सोमा म्हसे यांचे पुत्र . सदाशिव जीव्या म्हसे यांची विशेष उपस्थिती लाभली. याशिवाय . सुरेश नारायण तांडेकर, सहाय्यक संचालक (हस्तकला), तसेच WRO, मुंबईचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी प्रशिक्षित कारागिरांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

वारली चित्रकला ही वारली समाजाच्या दैनंदिन जीवनातील विविध घटकांचे, निसर्गाशी असलेल्या नात्याचे, तसेच त्यांच्या सण-उत्सव, पूजा आणि परंपरेचे चित्रण करते. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे आधुनिक काळातील युवकांना या पारंपरिक कलेबद्दल जागरूक करणे आणि ती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे.

पद्मश्री . जीव्या सोमा म्हसे यांनी वारली चित्रकलेला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून दिली. त्यांनी या कलेतून एक वेगळी लिपी निर्माण केली, जी आजही समाजाच्या संस्कृती, इतिहास आणि जीवनपद्धतीचे दर्शन घडवते. परंतु, आजच्या तरुण पिढीत या कलेबद्दलची जाण कमी होत चालल्याने या प्रशिक्षणाची नितांत गरज भासते.

या दोन महिन्यांच्या प्रशिक्षणात कारागिरांना पारंपरिक वारली चित्रकलेच्या शैली, रेखाटन, संकल्पना, निसर्गाशी असलेले नाते, तसेच जल, जंगल आणि जीवन यांचे महत्व समजावून सांगण्यात आले. तसेच, श्री. जिव्या सोमा म्हसे यांचा अमूल्य वारसा जतन करण्याची प्रेरणा यामधून देण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी कारागिरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि वारली चित्रकला टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.