समाज सर्वांगाने समृद्ध व्हावा, हे बाबासाहेबांचे स्वप्न आपण सर्वांनी पूर्ण करावे - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

    29-Jun-2025
Total Views |

 नागपूर : समाजाला सुसज्ज स्थितीत आणण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न साकारायचे आहे - विवेक विचार मंच त्या दिशेने काम करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे केले. छत्रपती शाहू महाराज जयंती आणि सामाजिक न्याय दिनानिमित्त विवेक विचार मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून सुमारे २००० सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली. सामाजिक न्याय विषयात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील दहा मान्यवरांना “छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण जीवन समाजाच्या प्रगतीसाठी समर्पित केले. त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन व्यक्ती कर्तृत्वाने मोठी व्हावी, असे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हटले, त्याचा अर्थ समजून आपल्या मुलांना शिक्षणाच्या दिशेने वळवायला हवे. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जागतिक स्तरावर पोहोचले असून समाजाने त्यातून शिकले पाहिजे. सेवा, शिक्षण, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रत्येकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. समाजातील पाय खेचणाऱ्या प्रवृत्तींना आपल्या कर्तृत्वाने उत्तर द्या. जातपात, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कटिबद्ध राहा. “जो करेगा जात की बात, उसे देदो लाथ” असा ठाम संदेश त्यांनी दिला. शोषित, पीडित, वंचित, दलित, दिव्यांग यांना सक्षम करण्यासाठी सरकार आणि समाजातील प्रत्येक कार्यकर्त्याने पुढाकार घ्यावा. सामाजिक न्याय इतका बळकट व्हावा की भविष्यात अशा परिषदा घेण्याची गरजच भासू नये, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमात उपस्थित असलेले राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, सामाजिक न्यायाची चळवळ म्हणजे संविधानाचे भूषण आहे. आपल्या देशासाठी सर्वोच्च ग्रंथ म्हणजे संविधान आहे. पंतप्रधान २०४७ चा विकसित भारत साकार करण्यासाठी संविधानाला सर्वोच्च स्थान देत काम करत आहेत. नागपूरातील दीक्षाभूमी ही सामाजिक समतेला दिशा देणारी पवित्र भूमी आहे आणि अशा या पवित्र भूमीत ही सामाजिक न्याय परिषद भरल्याबद्दल त्यांनी संयोजकांचे विशेष आभार मानले. महाराष्ट्राला सामाजिक न्याय व समतेच्या दृष्टीने देशात आदर्श उभारण्याचा संकल्प सरकारने केला आहे. २०२९ पर्यंत महाराष्ट्र हा बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांनी विकसित करण्यासाठी सरकारने सर्व समाज घटकांना साद घातली आहे. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हे बाबासाहेबांचे महान विचार लक्षात ठेवून संघटित समाजच सामाजिक न्याय निर्माण करू शकतो असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, या परिषदेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांना अपेक्षित समाज आपण घडवूया. विवेक विचार मंचाने समाजातील समस्या आणि सूचना शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम जे हाथी घेतले आहे, त्यांचे निरसन करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि संपूर्ण महाराष्ट्र सरकार कटिबद्ध राहील असे त्यांनी स्पष्ट केले.

या सामाजिक न्याय परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात पद्मश्री नामदेव कांबळे यांनी सांगितले की, समाजातील भेदाभेद, अस्पृश्यता अजूनही अनेक ठिकाणी आढळते आणि ती आता हद्दपार व्हायला हवी. नरेंद्र मोदी सरकार धाडसी निर्णय घेऊन चांगले काम करत आहे. देशभरातील बहुजन दलित समाज भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत विधानिक कामात महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे सरकार आणि संघाने समन्वय ठेवून त्यांच्या विषयांचे समाधान केले पाहिजे. भाजप आणि संघासोबत असलेला बहुजन समाज हा धोरणात्मक कामावर विश्वास ठेवतो त्यामुळे त्यांना प्रवाहात आणले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या एकदिवसीय परिषदेत विविध दलित व वंचितांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी मिळून महाराष्ट्र जनसुरक्षा कायदाला समर्थन, जातिनिहाय जनगणनेचे स्वागत आणि बौद्धगया विहार विषयक सर्व समाजघटकांनी सौहार्दपूर्ण भूमिका घेण्याचे आवाहन. असे महत्वपूर्ण तीन ठराव एकमताने मंजूर केले आहेत.

या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेचे महासंचालक सुनील वारेही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश दायकर आणि विजय वेदपाठक यांनी केले. विवेक विचार मंचचे कार्यवाह महेश पोहनेरकर यांनी प्रास्ताविक आणि समारोपीय भाषण केले तर राज्य संयोजक सागर शिंदे यांनी आजवरच्या कामाचा आढावा मांडला. या वेळी विवेक विचार मंचाचे प्रतिनिधी मुंबई महानगर संयोजक जयवंत तांबे, आप्पासाहेब पारधे आणि अनेक कार्यकर्तेही सक्रिय सहभागी झाले.

राज्यभरातून आलेल्या श्रोत्यांनी कार्यक्रमातील मार्गदर्शन अत्यंत प्रेरणादायी आणि समाजाला दिशा देणारे असल्याची भावना व्यक्त केली. सामाजिक न्यायाच्या दिशेने समाज संघटित करण्याचा, शिक्षणाचा प्रसार करण्याचा आणि भेदभावाचा नायनाट करण्याचा संकल्प या भव्य सोहळ्यात सर्व स्तरांतील प्रतिनिधींनी एकमताने केला.