अष्टपैलू अर्जुन...

    29-Jun-2025   
Total Views | 6

अतिशय हलाखीच्या परिस्थितीतही जीवनाने दिलेल्या संधीचे सोने करत आपल्यातील अष्टपैलुत्वाला जपलेल्या अर्जुन डोमाडे यांच्याविषयी...

अर्जुन यांचा जन्म नाशिकमधील सिन्नर तालुयातील देशवंडी येथे, दि. ७ जून १९६८ रोजी एका शेतकरी कुटुंबांत झाला. वडील भीमा आणि आई जनाबाई दोघेही शेती करायचे. त्यांची घरी जिरायती शेती आहे. जिरायती म्हणजे पावसावर अवलंबून असलेली शेती. त्यामुळे फक्त बाजरी, ज्वारी, कुळीथ, मटकी हीच पिके घेता येत. या पिकांना आवश्यक असलेला पाऊस आला तरच घरात दाणे यायचे, नाहीतर वर्षभर उपासमार ही पाचवीलाच पुजलेली. जिरायती शेतीमुळे पावसानंतर इतरांच्या शेतात मजुरीने जावे लागे. जीवनात दोन वेळाच्या भाकरीसाठी हा संघर्ष सुरू असतानाच, १९७२ साली दुष्काळ पडला. त्यानंतर आई आणि वडील दोघेही सरकारच्या ‘रोजगार हमी योजने’च्याअंतर्गत कधी रस्त्यांच्या कामाला जायचे, तर कधी विहीर खोदण्यासाठी मजूर म्हणून काम करत. त्यामुळे वेळप्रसंगी अर्ध पोटीही राहावे लागत होते. आईवडील आणि मोठे काका यांनी आपल्या परिवारासोबत पोट भरण्यासाठी, मुंबईची वाट धरली. १९७८ साली ते कल्याणमध्ये आले आणि कल्याण मधील नमस्कार मंडळासमोरील मांगवाडा या झोपडपट्टीवजा वस्तीत भाड्याने छोटी खोली घेऊन राहू लागले. अर्जून यांचे काका किराणा दुकानात, तर वडील कल्याण स्थानक परिसरात माथाडी कामगार म्हणून काम करू लागले. आई लक्ष्मी मार्केटमध्ये हेलपाटी (भाजीच्या पाट्याची हमाली) करत असे. पुढे कौटुंबिक कलहातून आईवडील कल्याण रेतीबंदरजवळ असलेल्या तागाच्या चाळीत, भाड्याने राहू लागले. तिथे गेल्यानंतर अर्जुन यांना, जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक एकमध्ये पहिलीच्या वर्गात दाखल केल गेलेे. त्यांचे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण ठाणे जिल्हा परिषदेची शाळा क्रमांक १, गांधी चौक कल्याण येथे झाले. पुढे इयत्ता आठवी ते दहावीचे शिक्षण कल्याणमधील अभिनव विद्यामंदिर येथे झाले घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने, दहावीनंतर त्यांना शैक्षणिक संघर्षही करावा लागला. पण, त्याही परिस्थितीत त्यांनी हार मानली नाही किंवा कधी शिक्षण अर्ध्यावर सोडून देण्याचा विचारही केला नाही. दिवसा ‘आयटीआय’ अंबरनाथ येथे दोन वर्षे पेंटरचे प्रशिक्षण घेतले व रात्री कल्याणमधील सिद्धार्थ रात्र महाविद्यालयात अकरावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण केले.

‘एफवाय’ ते ‘टीवायबीए’पर्यंतचे शिक्षण त्यांनी बिर्ला महाविद्यालयातून घेतले. शिक्षण घेत असतानाच घरोघरी वर्तमानपत्र टाकणे, दूध टाकणे, लग्नात वाढपी, कपाट, फ्रिज, रंगकाम या कामांसह, कंपनीतही नोकरी केली. वेळप्रसंगी आईसोबत केळीच्या वखारीत जाऊन, केळीचे ट्रॅक खाली करण्याचेही काम त्यांनी केले. त्यानंतर अर्जुन यांच्या आईने भाजी विकण्याचे काम सुरू केले. त्यावेळी उरलेली भाजीची टोपली डोयावर घेऊन, गल्लोगल्ली आरोळी देत भाजी विकून त्यांनी कुटुंबाला मदतीचा हात दिला. या कमाईतूनच त्यांनी आपले शिक्षणदेखील पूर्ण केले.

तत्कालीन कडक शिस्तीचे पोलीस उपआयुक्त वाय. सी. पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत दि. १ मे १९९२ रोजी, ठाणे शहर पोलीसदलात पोलीस हवालदार म्हणून अर्जुन दाखल झाले. १९९३ साली नागपूर पोलीस ट्रेनिंग सेंटर, नागपूर येथे नऊ महिने प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पोलीस मुख्यालय ठाणे, हिललाईन पोलीस ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ पोलीस ठाणे, अंबरनाथ, महात्मा फुले चौक पोलीस ठाणे, कल्याण, मानपाडा पोलीस ठाणे, डोंबिवली अशा विविध ठिकाणी सेवा दिली. सन २०१३ मध्ये झालेल्या खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर, ज्येष्ठता यादीनुसार दि. २३ मे रोजी पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली. ते सध्या खडकपाडा पोलीस ठाणे येथे, पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

अर्जुन यांना आईवडीलांकडून पारंपरिक आणि मौखिक लोकसाहित्याचा वारसा लाभला. त्याचप्रमाणे शालेय जीवनात वर्ग शिक्षक प्राध्यापक अरुण मैड यांच्याकडूनही त्यांना मिळालेले साहित्याचे धडे, यामुळे वाचन, लिखाणाची आवड त्यांच्यात निर्माण झाली. पोलीस खात्यात नोकरी करताना आलेले अनुभव, वाचलेली माणसे त्यांनी शब्दबद्ध केली आहेत. यामुळेच कथा, कविता, ललित लेख असे लिखाण झाले. त्यांना विविध मासिके, दिवाळी अंक, वृत्तपत्र यामध्ये प्रसिद्धी मिळाली आहे. अशा काही त्यांच्या पूर्वप्रसिद्ध आणि काही अप्रकाशित कथांचा ‘भितूर’ हा पहिला कथासंग्रहही प्रकाशित झाला आहे. या कथासंग्रहाला ‘कुंडल कृष्णाई प्रतिष्ठान, सातारा’ यांचा ‘उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार’ही मिळाला.

अर्जुन हे आपली नोकरी सांभाळून साहित्य लिखाण, वाचन आणि पु. ल. कट्टा, कल्याणच्या माध्यमातून साहित्यविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात सक्रिय सहभागी असतात. त्यांच्या ’पेरणी’ या कवितेला ‘याज्ञवलय संस्थे’चा सुप्रसिद्ध ‘उर्दू अभ्यासक व गझलकार कै. पद्याकर जोशी प्रथम पुरस्कार’, ‘अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती’ यांच्यावतीने ‘समाज गौरव पुरस्कार’, साप्ताहिक कल्याण नागरिक यांचा ‘आदर्श कल्याणकर पुरस्कार’ प्राप्त झाले आहेत. तसेच ‘साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे आधार प्रतिष्ठान’, उल्हासनगर यांचा ‘आदर्श लोकसेवक प्रेरणा पुरस्कार’ही जाहीर झाला आहे. "एका काव्यसंग्रहाचे लिखाण सुरू आहे, तो काव्यसंग्रह प्रकाशित करायचा आहे. तर लोककवी डॉ. वामनदादा कर्डक यांच्या चरित्रात्मक कादंबरीचेही लिखाण सुरू आहे. तेही पूर्ण करण्याचा संकल्प आहे,” असे अर्जुन सांगतात. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याच्या अनेक प्रयोगातील योगेश्वर भावकृषिचा प्रयोग म्हणजे ईश्वराच्या भक्ती बरोबर सर्वांनी मिळून सामाजिकता जपण्याचे भान ठेवणारा अनोखा प्रयोग . याप्रमाणे वसई तालुक्यातील अनेक गावांत सद्ध्या योगेश्वर भावकृषि लागवड सुरू असून स्वाध्यायींचा श्रमभक्तिमय भावार्थ यातून दिसून येतो.वसई पूर्वेतील एका गावात अश्याच प्रकारच्या भावार्थाने स्वाध्यायीं भातशेती लागवडीसाठी रविवारी कृषिवर एकत्र आले होते.यामध्ये बालसंस्कार केंद्रातील मुलेही समाविष्ट झाली होती.यावेळी मुलांची ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121