दत्त आमुचा हा विसावा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2020
Total Views |
datta jayanti_1 &nbs


दत्त नामाचा उच्चार। मुखी वसे निरंतर॥

या संत एकनाथ महाराजांनी रचलेल्या ओव्या महती सांगतात, त्या श्रीदत्तात्रेयांची. कार्तिक महिन्यातील अमावस्या संपल्यानंतर पवित्र असा मार्गशीर्ष महिना सुरू होतो. याच मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीदत्तात्रेयांचा जन्म झाला. त्यामुळे धार्मिक कार्यासाठी या महिन्याला महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला भगवान श्रीदत्तात्रेयांचा जन्मदिवस हा सर्वत्र ‘श्रीदत्त जयंती’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त आज दत्तस्मरण करुया...
 
आपल्या महाराष्ट्र राज्याच्या भूमीला मोठी अशी संतपरंपरा लाभली आहे. या संत मंडळींकडून धर्मजागृतीचे काम यथाशक्ती होत आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातदेखील पारंपरिक अशा दत्त जयंती उत्सवाचे महत्त्व समाजामध्ये कायम टिकून आहे. दत्त जयंती म्हटलं की, सर्वत्र धार्मिक वातावरण प्रत्येक भक्ताला भारावून टाकणारे असते.
 
हिंदू धर्मामध्ये दहा ते बारा हजार वर्षांपासून श्रीदत्त अवतार परंपरा सुरू झाली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यात जिथे जिथे श्रीदत्तात्रेयांनी अवतार वेगवेगळ्या रूपात घेतले, ती ठिकाणे तीर्थस्थाने म्हणून नावारूपाला आली आहेत. श्रीदत्तात्रेय हे अत्री ऋषींचे व अनसुया मातेचे पुत्र म्हणून ओळखले जातात. श्रीदत्तात्रेयांना शैवपंथी म्हणजेच शिवाचा आणि वैष्णवपंथी म्हणजेच विष्णूचा अवतार मानले जाते.
 
‘दत्तात्रेय’ हा शब्द ‘दत्त’ व ‘आत्रेय’ या दोन शब्दांनी बनला आहे. ‘दत्त’ या शब्दाचा अर्थ आपण ‘ब्रह्म’च आहोत म्हणजेच पूर्णपणे मुक्त की ज्याला काळाचे भय नाही. आपल्याला जे हवे आहे, ते दिले असे प्रेमाने देणारे ते दयाघन सद्गुरू म्हणजेच दत्तात्रेय.
 
दत्तात्रेयांचा प्रमुख अवतार हा प्रामुख्याने ‘त्रैमूर्तीं’चा अवतार म्हणून ओळखला जातो. ‘अनसुया माता पतिव्रता, अत्री ऋषींची कांता, धन्य त्रिलोकी गृही असता’ या पदाप्रमाणे अत्री ऋषींनी आपल्याला पुत्र व्हावेत, यासाठी कालपर्वत नावाच्या पर्वतावर घोर अशी तपश्चर्या केली. अत्री ऋषींची ही घनघोर तपश्चर्या फळास आली व अनसुया मातेच्या पोटी ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव मार्गशीर्ष पौर्णिमा या पवित्र दिनी जन्माला आले.
 
जगातील प्रत्येक वस्तूमध्ये आणि चराचरामध्ये परमेश्वर भरलेला आहे का, हे पाहण्यासाठी दत्तात्रेयांनी 24 गुरू केले. श्रीदत्तात्रेयांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या गाईला दत्तात्रेयांनी ‘पृथ्वी’ मानले, तर सोबतचे चार श्वान हे चार वेदांचे प्रतीक होते. पृथ्वीला गुरू मानून त्यांनी सहनशीलता व सहिष्णुता व अग्नीला गुरू मानून आपला देह हा क्षणभंगुर आहे, ही शिकवण त्यांनी घेतली.
 
‘आम्ही अवधूत अवधूत, नेणो जगाची मात’ या पदाप्रमाणे श्रीदत्त संप्रदायातील सर्वच मंडळी ‘अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त’ असा जयघोष आपल्या मुखातून करताना दिसतात. अवधूत हे श्रीदत्तात्रेयांचे एक नाव असून त्याचा अर्थ ‘अ’ म्हणजे अविनाशी व म्हणजे ‘वरैण्य.’ ‘धू’ म्हणजे धुतलेल्या तांदळासारखा स्वच्छ आणि ‘त’ म्हणजे ‘तत्त्वमसि’ असा आहे.
 
 
‘नित्य करी गंगास्नान, करवीर क्षेत्री भिक्षा जाण, कृष्णातीरी अनुष्ठान, दत्तात्रेय माझा’ याप्रमाणे श्रीदत्तात्रेय दररोज खूप भ्रमण करीत असत. सकाळचे स्नान, चंदन लावणे, दोन प्रहरी भिक्षा मागणे, दुपारचे भोजन, सायंकाळचे कीर्तन प्रवचन, योग करणे यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमण केलेले आहे. एखाद्या अवलियाप्रमाणे क्षणार्धात अंतर्धान पावणारा असा श्रीदत्तात्रेयांचा अवतार होता.
 
आपल्या भारत देशात प्रामुख्याने शैव, वैष्णव व शाक्त हे तीन पंथ कार्यरत आहेत. संपूर्ण भारत देशात महाराष्ट्र राज्यात दत्तात्रेयांच्या दिव्य आणि उज्ज्वल अशी परंपरा आहे. भारतात महानुभाव, नाथ, वारकरी, समर्थ आणि दत्त असे पाच सांप्रदाय श्रीदत्तात्रेयांची आराधना करताना आपल्याला दिसून येतात.
 
आज विविध संप्रदायांसोबतच विविध धर्मांमध्येही श्रीदत्तात्रेयांची उपासना केली जाते. श्रीदत्तात्रेयांचा श्रीपाद श्रीवल्लभ हा पहिला अवतार, नरसिंह सरस्वती हा दुसरा अवतार, स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे. जैन धर्मामध्ये श्रीदत्तात्रेयांना ‘नेमिनाथ’ म्हणून पूजले जाते, तर मुस्लीम धर्मात ‘फकीर’ म्हणून पूजले जाते. औदुंबर, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी, कारंजा, गाणगापूर, लातूर, कुरवपूर, कडगंची, पिठापूरम, नारायणपूर, अक्कलकोट, गिरनार, बसव कल्याण, माणगाव (सावंतवाडी), श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्री, वासुदेव निवास या पवित्र ठिकाणी श्रीदत्तात्रेयांच्या विविध प्रकारच्या पादुका स्थापित झालेल्या आहेत.
 
आज श्रीदत्त जयंती सोहळा हा महाराष्ट्रात नव्हे तर सबंध भारतात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी, आम्ही भाग्यवान आनंद निधान’ असे म्हणत पालखी सोहळा साजरा होतो. ठिकठिकाणी जी दत्तस्थाने आहेत, तेथे दत्त दर्शनाला जायचं म्हणजे ‘आनंद पोटात माझ्या मायेना’ असं म्हणत दत्तदर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात.
 
पण २०२० या वर्षात कोरोनामुळे महाराष्ट्रासह देशभरात जी दत्तस्थाने आहेत, त्या सर्व दत्तस्थानांवर श्रीदत्त जयंती उत्सव सोहळा अगदी साधेपणाने आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा होतो आहे. ‘बाळा जो जो रे’ हा पारंपरिक दत्त जन्माचा पाळणा म्हणत दत्तजन्म साजरा होतो. विविध ठिकाणी दत्त जयंतीनिमित्त महाप्रसाद, सामाजिक उपक्रम, यात्रांचे आयोजन होत असते. गुरूभजनाचा महिमा सांगून, ‘दत्त दत्त’ हे ध्यान लागून मन हरपून टाकणारा शांती सुखाचा अनमोल ठेवा सहजगत्या भक्तांना सांगणारे श्रीदत्त हा प्रत्येकाच्या जीवनातील एक विसावा आहे.
 
 
श्री गुरूदेव दत्त...!
- आदित्य कडू
@@AUTHORINFO_V1@@