टिरा भाग-२

    28-Jun-2025
Total Views |

नाटकाचा प्रभाव हा फक्त प्रेक्षकांवरच होतो असे नाही, तर नाटक कलाकारालाही घडवत असते. कलाकार नाटकाच्या प्रवासात स्वतःलाही समृद्ध करतो, त्याच्या जीवनातही सकारात्मक बदल घडतात. टिरा या नाटकातील बालकरांचे आयुष्यही यापेक्षा वेगळे नाही. बालनाट्यामुळे त्यांचे आयुष्य कसे समृद्ध झाले आहे, याचा त्यांच्याच शब्दात घेतलेला आढावा...


आफ्रिकेतल्या एका पांढरपेशा झेब्राच्या बाळ म्हणजे टिरा. आजही टिरा आफ्रिकेच्या जंगलात आहे. तिच्यावर बालनाट्य लिहावेसे वाटले. हे बालनाट्य म्हणजे तिचीच कहाणी. बालनाट्याच्या माध्यमातून मुलांमध्ये ‘स्वीकृती आणि सामंजस्याची’ भावना जागृत करणारे हे नाटक आहे. आज माझे तीन बालकलाकार पुन्हा तुमच्या भेटीस घेऊन येत आहे. या तिघी गेली दोन वर्षे नाटकाचे प्रशिक्षण घेत आहेत. या मुलींनी ‘टिरा’ या बालनाट्यात विविध भूमिका साकारल्या असून, राशी बिडकर वयवर्ष ११, हिने टिराची भूमिका केली; रेवा पोटभरे, वयवर्ष नऊ, हिने क्वीन झुलीया म्हणजेच टिराच्या आईची भूमिका केली; तर प्रिस्का डिमॉन्ति वयवर्ष १२, हिने फोटोग्राफर ऋताची भूमिका केली. भाग १ मध्ये आपण पाच मुद्द्यांवर या कलाकारांचे विचार वाचले. जसे की नाटकाचे वाचन झाल्यावर तुम्हाला काय वाटले? तुम्हाला भूमिका मिळाल्यावर काय वाटले, कसा अभ्यास केला? एकूण नाटकाच्या तालमीचा प्रवास कसा वाटला? संघ म्हणून काम करताना अडचणी आल्या का, त्यावर तुम्ही उपाय काय केले? आता भाग दोनमध्ये अजून पाच प्रश्न विचारून, त्यांना बोलते करणार आहे नाटकाचा प्रभाव त्यांच्या मनावर कसा होतो, ते जाणून घेऊया.

नाटकातली वाय कशी पाठ करायची, हे मी तुम्हाला सांगतच आले आहे. पण, तुम्हाला एखादी युक्ती सापडली, तर ती वापरून पाहा, असेही सांगितले होते. यावर काही सांगू शकाल?


राशी : मी तर ठरवलेच होते की, मोठ्याने बोलायचे असेल तर आधी वाय २०० टक्के पाठ पाहिजे. मी सकाळी उठल्या उठल्या गादीतच ब्रश न करता, वाक्य पाहिली आहेत रोज आणि तू म्हणाली होतीस की, रात्री झोपताना पण कर. पण, माझ्याने ते नाही व्हायचं. याचे एक कारण म्हणजे आई. मी पुटपुटले जरी, तरी ए म्हणून दाखव ना एक तरी वाय असे ती म्हणायची.

रेवा : माझे पाठांतर मी अंघोळ करताना केले, ती बेस्ट जागा आहे. मोठ्याने नळ सोडायचा आणि वाय म्हणायची. एक-दोन दिवस पाणी गार झाले कारण, पाठांतर होतच नव्हते. पण, मग गरम पाणी घेत घेत वाय म्हणून पाहायची. मी शाळेत जिना चढता चढताही पण पाठांतर केले आहे.

प्रिस्का : माझी वायांमध्ये गडबड व्हायची, त्याचे एक कारण म्हणजे सर्वज्ञ. इतका फंबल मारायचा आणि त्याने वाय इकडचे तिकडे केले की, मला गोंधळायला व्हायचे. मग मला आरशासमोर उभे राहून पाठ केल्यावर, नीट पाठ झाले. सर्वज्ञची वाय असायची तेव्हा मी एकटक आरशात बघत बसायचे आणि हो एवढेच नाही, मला सर्वज्ञबरोबर बसून एकत्र पाठांतर करावे लागले आहे.

गुपित आणि आईबाबा. आपले ठरले आहे की, नाटकातली वाय आणि नाटकाची कथा कोणालाच सांगायची नाही. तुम्ही शहाणी आणि गुणी मुलं आहात. तुमच्याकडून कधी सांगितल्या नाही न गेल्या गोष्टी?


राशी : अरे यार, मी तुला काय सांगू. आईने इतयांदा गोडी गुलाबीने माझी वाय काय आणि कोणती आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सांग ना गं! सांग ना गं! करत पण, मी पक्की आहे. एकदा तर आजी गावाहून आली म्हणून तू तिला तरी म्हणून दाखव, असे म्हणत मागेच लागली. मी स्पष्टच सांगितले, मी रॅडीशी प्रतारणा करणार नाही. तिने नाही सांगितले आहे, मी नाही सांगणार. आजी तू तिकीट काढून ये नाटकाला कारण, आम्ही खूप मेहनत केली आहे आणि पेींहळपस लेाशी षेी षीशश. अगं आम्ही बर्थडे पार्टीला गेलो होतो तिथेही म्हणाली, राशी सगळ्यांना ऐकायचा आहे तुझा डायलॉग. मग घरी आल्यावर माझा आणि आईचा वाद झाला.

रेवा : माझ्या आईबाबांनी मला कधीच म्हटले नाही की, वाय म्हणून दाखव आणि मी गार्डनमध्ये पण जायचे आईला सांगून की, मी तिथे जाऊन वाय म्हणून पाहते आहे. तर तिने त्याला ही कधी नाही म्हटले नाही पण, मला नाटक झाल्यानंतर कळले. म्हणजे उडत उडत अशी खबर आली की, तिने माझ्या डायलॉग्सचे पान एकदा वाचून काढले आहे म्हणून. मला राग आला पण, काय करणार? मी बोलूनही दाखवले तिला पण, आया असेच करतात.

प्रिस्का : नाटकाची गोष्ट आणि कोणाला कोणते काम दिले आहे, हे गुपित ठेवणे आवश्यक आहे. तरी माझी आई आणि खास करून ताई खूप प्रश्न विचारतात आणि माझ्याकडून काढून घेण्याचा प्रयत्नही करतात. मी घरी सगळे सांगते पण, मला सांगायचे नाही असे सांगितल्यावरच त्यांना माझ्याकडून जास्तच ऐकावेसे वाटते. माझ्या घरी मी खोली बंद करून बसू शकत नाही. मग मला दार लावून नाटकाचे डायलॉग्स म्हणावे लागतात. पण, ताई मुद्दामून आत बाहेर करून माझे डायलॉग्स जाणून घेण्याचा प्रयत्न करते.

एखादा मजेदार किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतो आहे?

राशी : किस्से तर खूप आहेत. कारण, नाटकाचा लास म्हणजेच धम्माल. माझी आई झेब्रांची राणी दाखवली आहे. तालमीत तिने मुकुट कधीच घातला नव्हता. पण, एक दिवस अचानक तिने मुकुट घालून एन्ट्री घेतली. मला इतके हसू आले, की मी माझीच वाय विसरले. कारण, त्या मुकुटातली फुलं विचित्र हलत होती. नाटकाच्या प्रयोगाच्या दिवशीसुद्धा मला इतके हसू येत होते पण, मी ते दाबले आणि प्रसंगावधान ठेवून माझी वाय बोलले. पण, माझ्या आत काय होत होते ते मलाच माहिती.

रेवा :
मी एका वायात इतकी अडखळले आहे की विचारू नकोस. सगळे हसले तेव्हा मला सगळ्यांचा राग आला पण, नंतर माझेच मला हसू आले. वाय होते, ”आम्ही किनई करवंदाची भाजी, डाळिंबाची खिचडी आणि स्ट्रॉबेरीचे थालीपीठ आणले आहे डब्यात.” मी हे वाक्य उलट-पुलट करून बोलायचे.

नाटकात सातत्याने काम केल्यावर तुम्हाला तुमच्यात काय बदल जाणवतो आहे?

राशी : लाजाळूचे झाड होते. मला काय आणि कसे वाटते आहे, हे मोकळेपणाने सांगया येत नव्हते. आता तर मी अनोळखी लोकांशीही बोलू शकते. मी तर १०० टक्के बालरंगभूमीवर काम केले पाहिजे, असे सांगेन.

रेवा : मी स्वतःचाच विचार करणे सोडून, दुसर्यांचा पण विचार करायला शिकले आहे. आता मी प्रत्येक गोष्टीत पुढे पुढे करत नाही. मी ९० टक्के नक्की बालरंगभूमीवर काम करा, असे सांगेन. दहा टक्के कमी कारण जर तुम्हाला मुख्य भूमिका नाही मिळाली, तर तुम्ही नाराज होऊ शकता. जशी मी झाले. मला नाटक खूप आवडते आणि मला पूर्ण वेळ मी स्टेजवर असावे, असेही वाटते रॅडी.

प्रिस्का : मी तर १०० टक्के करा, असेच सांगेन. कारण, इथे गमवण्यासारखे काहीच नाही, सारे काही मिळवायचेच आहे. मी अचानक इतकी बडबडी झाले आहे की, माझ्या घरच्यांना पण आश्चर्य वाटते. माझी आई मला म्हणते, अशी कशी तू इतकी बोलतेस गं? सगळा नाटकाचा परिणाम आहे. कधी आई रागाने तर कधी लाडाने म्हणते आणि मला आवडते आहे. मी शांत बसून राहायचे, पण आता खूप बोलते. थँक यू रॅडी.

तुम्हाला लक्षात आलेच असेल की, प्रत्येक मूल हे वेगळे असते आणि त्याला येणारे अनुभवही वेगळे असतात. ते त्यांच्या गतीने शिकतात. मुलांना त्यांच्या गतीने शिकू द्यावे. त्यांची तुलना इतरांशी करणे अयोग्य ठरेल. मला आनंद आहे की मुलं शिकत आहेत, अनुभवांनी मोठी होत आहेत. एकाच आयुष्यात त्यांना विविध आयुष्य जगायची संधी नाटक देते. त्यांचे बालपण समृद्ध आणि गोड प्रसंगांनी भरलेले असेल.

रानी राधिका देशपांडे