संघर्षातून भारतासाठी धडे : भाग २

    28-Jun-2025
Total Views |

इस्रायल-इराण संघर्षात इस्रायलच्या सैन्य आणि गुप्तचर संस्था यांच्यातील समन्वय अवघ्या जगाने पाहिला. या समन्वयाने मिळवलेले यश हे साहजिकच आचंबित करणारे ठरले. भारतानेही ‘ऑपरेशन सिंदूर’च्यावेळी अशाच सर्व विभागाच्या समन्वयाने भव्य यश मिळवले आहे. असे असले तरीही युद्धाच्या बदलत्या व्याख्यांमध्ये लष्कराचे आणि गुप्तचर संस्थांचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरण आवश्यक आहे. इस्रायल-इराण युद्धातून भारताने काय बोध घ्यावा, याचा घेतलेला आढावा...

इस्रायल-इराण संघर्ष आणि विशेषतः ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ने आधुनिक युद्धाचे बदलते स्वरूप स्पष्ट केले आहे. यामध्ये पूर्वतयारीने केलेले हल्ले, गुप्तचर यंत्रणेचे यश, बहुआयामी मोहिमा आणि प्रगत तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित होते. इराणने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्याला प्रभावीपणे निष्प्रभ करण्याची इस्रायलची क्षमता निव्वळ योगायोग नसून,ती अनेक वर्षांच्या धोरणात्मक नियोजनाचा, गुप्तचर संस्था व पारंपरिक सैन्यदलांमधील समन्वयाचा परिपाक होती. भारतासारख्या जटिल भूराजकीय परिस्थिती आणि सतत धोयांचा सामना करणार्या देशासाठी यातून मिळणारे धडे महत्त्वपूर्ण आहेत.

गुप्तचर यंत्रणा आणि आक्रमक गुप्त क्षमतांचे समन्वयन


‘ऑपरेशन रायझिंग लायन’मध्ये इस्रायलचे यश हे ‘मोसाद’ आणि आयडीएफ यांच्यातील समन्वयामुळे आणि धाडसी गुप्त कारवायांमुळेच शय झाले. शत्रूच्या हद्दीत गुप्त ड्रोनतळ स्थापन करणे आणि मोठ्या हवाई हल्ल्यापूर्वीच हवाई संरक्षणाला निष्प्रभ करणार्य्या शस्त्र प्रणालीची केलेली तस्करी , हे गुप्त घुसखोरी आणि ऑपरेशनल समन्वयाचे द्योतक आहे. इस्रायलचे युद्ध मॉडेल गुप्तचर यंत्रणेच्या सक्रिय आणि आक्रमक समन्वयावरच भर देते, जेणेकरून इस्रायलच्या सैन्यदलांना युद्धभूमीवर आधीच नियोजन करता येेते.

इस्रायलप्रमाणे भारतानेही गुप्तचर संस्थांच्या माध्यमातून पारंपरिक गुप्त माहिती गोळा करण्यापलीकडे, शत्रू क्षमतांना पूर्वनियोजितपणे निष्प्रभ करण्यासाठी गुप्तचर यंत्रणांचा सक्रियपणे वापर करणेही आवश्यक झाले आहे. यासाठी ‘रॉ’आणि ‘डीआयए’सारख्या भारतीय गुप्तचर संस्थांना वाढीव निधी, विशेष प्रशिक्षण आणि गुप्त कारवायांसाठी मोकळीक देणे आवश्यक आहेत.

सक्रिय प्रतिबंध आणि कॅलिब्रेटेड लष्करी प्रतिसाद


भारताच्या धोरणात मोठ्या दहशतवादी हल्ल्यांना केवळ ‘नॉन-स्टेट अॅटर्स’, दहशतवाद्यांनी केलेली कृत्ये न मानता, पाकिस्तानद्वारे नियोजित आणि समर्थित युद्धाचे थेट कृत्य मानले जावे. भारतातही कॅलिब्रेटेड लष्करी प्रतिसाद विकसित होत असलेल्या सिद्धांताचे एक उदाहरण म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’ हे आहे. दि. ७ मे रोजी सुरू झालेल्या या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवादीतळांवर बहुआयामी अचूक हल्ले करण्यात आले. या ऑपरेशनमध्ये ‘राफेल’, ‘सुखोई-३० एमकेआय’ आणि ‘मिराज-२०००’ या लढाऊ विमानांचा समावेश होता. या मोहिमेमध्ये ‘स्कॅल्प’ आणि ‘ब्रह्मोस’ सारख्या क्षेपणास्त्रांचा तसेच, ‘हार्पी हॅरॉप’ आणि ‘स्कायस्ट्रायकर’ या ड्रोनचाही यशस्वीपणे वापर करण्यात आला होता.

विशेष दलांचे आधुनिकीकरण आणि एकीकृत कमांड


इस्रायल इराणविरोधात प्रगत तंत्रज्ञान, विशेष दले आणि एजंट्सच्या ऑपरेशनवर अवलंबून राहिल्यामुळे आधुनिक युद्धात, अत्यंत प्रशिक्षित आणि सुसज्ज विशेष दलांची अपरिहार्य भूमिका अधोरेखित झाली. भारतानेही ही गरज ओळखली असून, भारत आता गुप्तयुद्ध व सखोल धोरणात्मक मोहिमांसाठी आपल्या विशेष दलांच्या क्षमतावृद्धींवर सक्रियपणे लक्ष देत आहे. भारतीय विशेष दलांमध्ये लष्कराचे ‘पॅरा-स्पेशल फोर्सेस’, ‘आयएएफ’चे ‘गरुड कमांडो’ आणि नौदलाचे ‘मार्कोस’ यांचा समावेश होतो. या स्पेशल फोर्सेचे विशेष प्रशिक्षण सुरु असून,‘लोईटरिंग म्युनिशन्स’, ‘नॅनो ड्रोन’, ‘एफएलआयआर’, ‘पेलोड’सह पाळत ठेवणारे हेलिकॉप्टर आणि ‘फिनिश साको स्नायपर रायफल्स’, ‘अमेरिकन एम४ए१ कार्बाइन’ आणि इस्रायली ‘टीएआर-२१ टावोर असॉल्ट रायफल्स’ यांसारख्या विशेष शस्त्रे चालवण्याच्या त्यात समावेश आहे.

सशस्त्रदल विशेष ऑपरेशन्स विभागाच्या निर्मितीमुळे, विविध दलांमध्ये एकत्रितपणा आणि समन्वय वाढला असला, तरी केवळ सामरिक नव्हे तर धोरणात्मक मोहिमांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी एकीकृत कमांड संरचना आवश्यक आहे. यामुळे शत्रुप्रदेशातील धोरणात्मक हल्ले आणि गुप्तचर आधारित मोहिमांसह, विशेष मोहिमांचे अधिक सुसंगत नियोजन आणि अंमलबजावणी शय होईल.

स्वदेशी ड्रोन आणि ‘एआय’ विकास

इराणचा प्रत्युत्तर हल्ल्यामध्ये डझनभर ‘युएव्ही’ आणि जवळजवळ १०० बॅलिस्टिक क्षेपणस्त्रांचा समावेश होता. या क्षेपणास्त्र लॉन्चर्सवर हल्ला करण्यासाठी इस्रायलने गुप्त ड्रोनचा वापर केल्याने, संघर्षात मानवरहित प्रणालींची भूमिका अधोरेखित झाली आहे. भारतालाही, एकीकडे शत्रुकडील ड्रोनचा सामना करण्याची तयारी करताना, स्वदेशी ड्रोन आणि ‘एआय’ विकासाला गती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

भारत त्याच्या ड्रोन क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण प्रगती करत असून, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये हॅरॉप आणि बंगळुरुमध्ये बनवलेले ‘स्कायस्ट्रायकर’, ‘आत्मघाती ड्रोन’ यांचा वापर करण्यात आला होता. हे ड्रोन दहा किलो ‘वॉरहेड’ वाहून नेण्यास आणि स्वायत्त ‘लोईटरिंग म्युनिशन्स’ म्हणून कार्य करण्यास सक्षम आहेत.

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, अति उत्कृष्ट तंत्रज्ञान कोणताही देश सहजासहजी देण्यास तयार नसतो. आपण निर्माण केलेले तंत्रज्ञान युद्धात आणि युद्धजन्य परिस्थितीत वापरले जावे, ज्यामुळे आपल्या शस्त्रांची क्षमता आणि तंत्रज्ञानाची कार्यक्षमता योग्य आहे की नाही, हे कळते. उदाहरणार्थ, आपण ‘ब्रह्मोस’, ‘आकाशतीर’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेंतर्गत तयार झालेली इतर शस्त्रे यांचा वापर करून, त्यांची क्षमता तपासणेही महत्त्वाचे आहे.

बहुआयामी युद्ध आणि धोरणात्मक संवाद

‘ऑपरेशन रायझिंग लायन’ आणि इराणचा प्रत्युत्तर हल्ला दर्शवतो की, आधुनिक युद्ध हे बहुआयामी आहे. इस्रायलचे यश हल्ल्यांना सक्षम गुप्तचर, सायबर ऑपरेशन्स आणि माहिती युद्धाच्या समन्वयातून मिळाले. भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’देखील सायबर, अंतराळ, हवाई, भूमी, समुद्र आणि माहिती युद्ध अशा एकीकृत लष्करी सिद्धांताचा एक भाग होते.

‘ऑपरेशन सिंदूर’ने भारताच्या सर्व सहा क्षेत्रांमध्ये, क्षमतांचे उत्तम प्रदर्शन केले. सायबर विभागाने शत्रुचे लष्करी संप्रेषण अक्षम करण्यासाठी पूर्वनियोजित हल्ले केले. उपग्रह समन्वयाने वेळोवेळी शत्रुप्रदेशातील गुप्त माहिती प्रदान केली आणि इलेट्रॉनिक जॅमिंगनेही निर्णायक भूमिका बजावली.

भारतासाठी शिफारसी

या संघर्षातून मिळालेले धडे भारताला आपली सक्रिय प्रतिबंध स्थिती मजबूत करण्यासाठी मदत करू शकतात. यासाठी भारताला राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी, सुरक्षा आव्हानांना निर्णायकपणे प्रतिसाद देण्यासाठी, सर्वसमावेशक क्षमतांसाठी पुढील गोष्टी आवश्यक आहे:

गुप्तचर यंत्रणा : भारताने त्याचे लष्करी एकीकरण आणि गुप्त क्षमता वाढवणे आवश्यक आहे. भारताने आपल्या गुप्तचर संस्थांचा वापर करून, शत्रूच्या क्षमतांना आतूनच निष्प्रभ केल्या पाहिजेत.

प्रगत लष्करी तंत्रज्ञानाचा स्वदेशी विकास वेगवान करणे :
ड्रोन, ‘एआय’ आणि प्रगत हवाई संरक्षण प्रणालींमध्ये देशांतर्गत क्षमतांना प्राधान्य दिले पाहिजे.

एकात्मिक विशेष ‘ऑपरेशन्स कमांड’ची स्थापना :
‘एएफएसओडी’ हे सकारात्मक पाऊल असले, तरी विविध विशेष दलांना एकाच धोरणात्मक छत्राखाली आणण्यासाठी पूर्ण विकसित, एकात्मिक कमांड आवश्यक आहे.

बहुआयामी युद्ध सिद्धांताला परिष्कृत करणे : भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ सिद्धांत हा एक मजबूत पाया आहे. परंतु, त्याच्या सर्व सहा क्षेत्रांमध्ये व्यावहारिक अंमलबजावणीला सतत परिष्कृत केले पाहिजे.

धोरणात्मक संवाद आणि माहिती वर्चस्व मजबूत करणे : इस्रायलने कथांना आकार देण्यासाठी आणि शत्रूच्या लोकसंख्येवर प्रभाव टाकण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमधून धडा घेऊन, भारताने एक अत्याधुनिक आणि सक्रिय धोरणात्मक संवाद यंत्रणा विकसित करणहीे आवश्यक आहे.

दीर्घकालीन धोरणात्मक नियोजन आणि व्यापक दृष्टिकोन : भारताने आपल्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी आणि सततच्या धोयांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी एक दीर्घकालीन, व्यापक धोरण विकसित केले पाहिजे.

निष्कर्ष

गुप्तचर व लष्करी एकत्रित धोरण राबवणे ही काळाची गरज आहे, तसेच ‘स्वदेशी ड्रोन’, ‘एआय’ व सायबर क्षमतांचा झपाट्याने विकासही आवश्यक आहे. त्याचबरोबर भारताने पूर्णपणे एकत्रित विशेष ‘ऑपरेशन्स कमांड’ स्थापनेलाही चालना दिली पाहिजे. सैन्याच्या क्षमतांमध्ये वृद्धी करण्यासाठी बहुआयामी युद्ध सिद्धांत प्रशिक्षणही आवश्यक आहे. जागतिक व राष्ट्रीय माहिती युद्धात सक्रिय व प्रभावी भूमिका घेणे हे फार महत्त्चाचे झाले आहे. दीर्घकालीन धोरणात्मक नियोजनाची देशाच्या संरक्षण क्षेत्राला गरज आहे. इराण-इस्रायल संघर्षापासून शिकत, भारताने बहुआयामी व तांत्रिकदृष्ट्या सक्षम लष्करी व गुप्तचर व्यवस्था विकसित केली पाहिजे.

(नि.) ब्रि.
हेमंत महाजन