‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हे तीन शब्द कानी पडले की, महाकवी कालिदासांच्या मेघदूताची आठवण येते. कालिदासांनी आपल्या अलौकिक प्रतिभेतून साहित्यविश्वात स्वतःची वेगळी छाप सोडली. आजसुद्धा रंगभूमीवर कालिदासांच्या रचना प्रेक्षकांना भूरळ घालतात. ‘भावकाव्याचे जनक’ अशी ओळख असणार्या कालिदासांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजमनावर संस्कारसुद्धा केले. काळाच्या प्रवाहात आजसुद्धा कालिदासांच्या रचना रसिक प्रेक्षकांच्या, साहित्यप्रेमींच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. त्यांची हीच प्रतिभा उलगडून सांगत आहेत, संस्कृत अभ्यासक आनंद गाडगीळ...
साहित्यप्रेमी आणि काव्यरसिक म्हणून महाकवी कालिदास यांच्या साहित्याकडे रसिकतेने बघितले गेले आहे. एका अभ्यासकाच्या भूमिकेतून आपण मेघदूत या रचनेकडे कसे बघता?महाकवी कालिदासांचा काळच पाचवे शतक किंवा त्यापूर्वीचा आहे. सहाव्या शतकातील एक शिलालेख आपल्याला सापडला असून, ज्याआधारे आपल्याला हे म्हणता येते. अन्यथा परकीयांच्या आक्रमणांच्या तडाख्यामध्ये नालंदा, तक्षशिला ही विद्यापीठ जाळली गेली, यामुळे आपल्या संस्कृतीचे वैभवच नष्ट झाले. तरीसुद्धा मौखिक परंपरेमुळे ‘रघुवंश’, ‘शाकुंतल’, ‘मेघदूत’ या सगळ्या संहिता जपल्या गेल्या. त्यामुळे एकाअर्थी कालिदासांविषयी बोलणे सोप्पे आहे आणि अवघडसुद्धा. अवघड यासाठी कारण, आपल्याकडे लेखकाने स्वतःचा डंका वाजवायचा अशी प्रथाच मुळी नव्हती. रुढार्थाने आपण ज्याला म्हणतो, ‘लेखकाचे चार शब्द’ असे त्याकाळी अस्तित्वातच नव्हते. म्हणूनच आपल्याला असे दिसून येते की, कालिदास स्वतःबद्दल मुग्ध राहतो. त्यांच्या रचना हेच त्यांचे बलस्थान आहे किंबहुना, त्यातूनच कालिदास आपल्यासमोर उलगडतो.
महाकवी कालिदासांच्या जीवनासंबंधी अनेक आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळतात, त्याबद्दल काय सांगाल?मौखिक परंपरा म्हटले की, आख्यायिका ओघाने आल्याच. महाकवी कालिदास यांच्या संदर्भात एक आख्यायिका अशी आहे की, कालिदासांचा सांभाळ अत्यंत साध्या कुटुंबाने केला. एक राजा होता, ज्याची कन्या अत्यंत बुद्धिमान आणि तितकीच देखणीही होती. तिने आपल्या पित्याला सांगितले की, तिचा वर ती स्वतः निवडेल. जो तिच्या प्रश्नांची उत्तरं देईल, ती त्याच्याशी लग्न करेल. आता लग्नासाठी वरसंशोधनामध्ये त्यामुळे अडचण निर्माण झाली. कारण, तिच्यासमोर कुणाचाही टिकावच लागेना. अशातच त्या राजाच्या प्रधनाला हा साधा मुलगा भेटला. त्याला सांगण्यात आले की, तू काहीही बोलायचे नाहीस, तुझ्यामागे ज्या तरुणांचा ताफा असेल ते सगळी उत्तरं देतील. अशा प्रकारे प्रधानाची युक्ती यशस्वी झाली आणि त्या साध्या मुलाचे, त्या राजकन्येशी लग्न लागले. लग्नानंतर मात्र, राजकन्येला सत्य लक्ष्यात आले. त्यावेळेस ती राजकन्या त्या तरुणाला म्हणाली, आपल्या संस्कृतीप्रमाणे मी तुम्हाला सोडू शकत नाही पण, तुम्ही बाहेर जा, विद्यासंपन्न व्हा आणि मगच माझ्याकडे परत या. तो तरुण तिथून बाहेर पडला. त्याने काली मातेच्या मंदिरात तपश्चर्या केली. मातेने त्याला आशीर्वाद दिला आणि सांगितले तू काशीला जा आणि अध्ययन कर, त्याबरोबर तो तरुण विद्या संपादन होण्यासाठी काशी क्षेत्री गेला आणि कालिदास होऊनच परतला. राजवाड्यावर परतल्यावर त्या राजकन्येने त्यांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तिने या तरुणाला विचारले की, ‘अस्ति कश्चित् वाग्विशेषः’. आता कालिदासांची गंमत खरी इथे आहे की, ‘अस्ति कश्चित् वाग्विशेषः’ या तीन शब्दांवरून तीन महाकाव्य रचली गेली आहे.
महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास, महाकवी कालिदास आणि या मराठी मुलखाचे नाते कसे आहे? कालिदास आणि ‘मेघदूत’ यांचा महाराष्ट्राशी संबंध असा आहे की, नागपूर जवळच्या रामटेक शहरात रामगिरी नामक पर्वत आहे. महामहोपाध्याय वासुदेवराव मिराशी यांनी हे सिद्ध केले आहे की, कालिदासांनी मेघदूत हे महाकाव्य या रामगिरीवरूनच रचले आहे.
भावकाव्यांचे जनक म्हणून कालिदासांकडे बघितले जाते, त्यामागचा विचार काय आहे?भावकाव्य म्हटले की, त्या काव्यामध्ये सगळ्या प्रकारचे भाव आले पाहिजेत ही अपेक्षा आहे. आपण कालिदासांचे रघुवंश बघितले, तर त्यामध्ये नवरसांचा परिपोष झालेला आढळतो. त्यातील आठव्या सर्गात अजविलाप आहे. म्हणजे पत्नीच्या वियोगानंतर रघुवंशातील राजा एवढा विलाप करतो की, शेवटी रघुवंश कुलाचे गुरू त्याची समजूत काढतात, त्या राजाला धीर देतात आणि कर्तव्यपथावर चालायला सांगतात. कालिदासांना श्रृंगाररसाचा राजाच म्हटले गेले आहे. यापलीकडेही कालिदासांच्या लेखणीमध्ये समाजात मूल्य पेरण्याची ताकद आहे, असे मला वाटते.
भारतीय जीवनशैली, संस्कृती याचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा ऋतू हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्या अनुषंगाने महाकवी कालिदासांचे साहित्य असो किंवा त्यांच्या नंतरच्या रचनाकारांनी केलेल्या कलाकृती, त्यामध्ये ऋतूंचे प्रतिबिंब कसे उमटले आहे?कुठल्याही लेखकाला आपल्या लिखाणाच्या माध्यमातून ऋतूंंवर भाष्य करणे भाग आहे. महाकवी कालिदासांनी तर ‘ऋतूसंहार’ नावाने काव्य लिहिले, ज्यामध्ये सहा ऋतूंंचा परामर्श घेतला आहे. कालिदासांना त्याकाळी असे लक्षात आले की, पूर्णतः ऋतूंंना वाहिलेले काव्य आपण लिहायला हवे. म्हणूनच त्यांनी हा लेखनप्रपंच केला. यामध्ये विशेषतः त्यांनी ग्रीष्माचे वर्णन अत्यंत सुंदररित्या केले आहे. उदाहारणार्थ, एके ठिकाणी कालिदास म्हणतात की, सूर्य इतका आग ओकतो आहे. छायेकरिता मोराच्या पिसार्यामागे साप येऊन बसला आहे. आता आपण मोर आणि साप यांच्यातील नाते आपल्याला ठाऊक आहेच. परंतु, या उन्हाने दोघांना एकत्र आणले आहे.
कुसुमाग्रज, शांताबाई शेळके, बा. भ. बोरकर यांनी महाकवी कालिदासांच्या रचना आधुनिक काळात आपल्या भावस्पर्शी लेखनाने लोकांपर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या लिखाणातील अनुभवासंदर्भात आपण काय सांगाल?
महाकवी कालिदासांच्या मेघदूतावर व्यक्तीशः माझे खूप प्रेम आहे. माझी अशी इच्छा आहे की, मराठी कवींनी मेघदूत ज्याप्रकारे आपल्यासमोर आणले आहे, ते नक्कीच वाचले गेले पाहिजे. बा. भ. बोरकर असतील, शांताबाई शेळके असतील यांची शब्दकळाच इतकी सुंदर आहे की, आपसूकच यावर आपला जीव जडतो. एके ठिकाणी बोरकरांनी असा अनुभव सांगितला की, मेघदूताच्या नवव्या श्लोकाचे अनुवाद करताना ते थकले आणि झोपी गेले. झोपल्यानंतर अर्धवट निद्रा आणि अर्धवट जागृती या अवस्थेमध्ये त्यांना अशी अनुभूती आली की, वर्गाच्या एका फळ्यावर त्या श्लोकाचा अनुवाद कुणीतरी लिहून ठेवला आणि त्या वर्गात जर दिवा लावला, तर तो श्लोक पुसला जाईल. त्याच अवस्थेमध्ये त्यांनी त्या श्लोकाचा अनुवाद केला आणि बोरकरांच्या लेखणीतून कालिदास नव्याने उलगडले. त्याचबरोबर मेघदूताचा स्वैर अनुवाद वसंत बापटांनीसुद्धा केला आहे. त्यामुळे महाकवी कालिदास हे प्रत्येक वेळी नव्याने उलगडणारे कवी आहेत, असे मला वाटते, ज्यांना वाचले गेलेच पाहिजे.