मुंबई : भारत गौरव योजनेअंतर्गत एक विशेष "स्वर्णिम भारत यात्रा" पर्यटक ट्रेन १४ ऑगस्ट २०२५ रोजी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे स्मरण करून निघेल. ९ रात्री आणि १० दिवसांच्या या दौऱ्यात भारताच्या स्वातंत्र्य चळवळी आणि वारशाशी संबंधित प्रमुख ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देईल.
'स्वर्णिम भारत यात्रा;चे पहिले ठिकाण अहमदाबाद आहे, जिथे महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र असलेले साबरमती आश्रम आणि १५ व्या शतकातील अदलाज स्टेपवेल आहे. ही यात्रा प्राचीन सूर्य मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या मोढेरा आणि युनेस्कोने सूचीबद्ध केलेल्या 'राणी की वाव' येथे भेट देईल. केवडियामध्ये, प्रवासी जगातील सर्वात उंच पुतळा प्रतिष्ठित स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि सरदार सरोवर धरण पाहतील. त्यानंतर हा प्रवास पुण्याच्या दिशेने सुरु होईल. जिथे भारत छोडो चळवळीचे महत्त्वाचे ठिकाण असलेला आगा खान पॅलेस आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंगासारखी पवित्र स्थळे प्रवाशांच्या प्रतीक्षेत असतील. पुढे ही ट्रेन छत्रपती संभाजीनगर येथे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगासह अजिंठा आणि वेरूळ लेणी या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांना भेट देईल. शेवटी, दिल्लीला परतण्यापूर्वी झाशीचा किल्ला आणि ओरछा येथील ऐतिहासिक मंदिरे आणि राजवाड्यांना भेट देऊन हा दौरा संपेल.
डिलक्स एसी टूरिस्ट ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, सेकंड एसी आणि थर्ड एसी क्लासेस आहेत, ज्यामध्ये १५० पर्यटकांना डायनिंग कार, शॉवर क्यूबिकल्स, सेन्सर-आधारित वॉशरूम, फूट मसाजर आणि सीसीटीव्ही-सक्षम सुरक्षा यासारख्या आधुनिक सुविधा आहेत. दिल्ली सफदरजंग, गुडगाव, रेवाडी, रिंगस, फुलेरा आणि अजमेर येथून बोर्डिंग उपलब्ध आहे. या सहलीचे दर आयआरसीटीसीने ₹७१,५८५ (३एसी), ₹८१,६७५ (२एसी), ₹९४,८४५ (१एसी केबिन) आणि ₹१,०१,४३० (१एसी कूप) असे निश्चित केले आहेत. पॅकेजमध्ये रेल्वे प्रवास, ३ स्टार हॉटेलमध्ये राहणे, शाकाहारी जेवण, वाहतूक, एसी वाहनात पर्यटन, विमा आणि आयआरसीटीसी टूर मॅनेजर इत्यादी सेवांचा समावेश आहे.