कॉमेडी नव्हे, हा तर रावडी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2020   
Total Views |
kunal arnab_1  



‘नेशन वाँट्स टू नो’ म्हणत घराघरात पोहोचलेला एक आक्रमक, सुप्रसिद्ध संपादक, वृत्तनिवेदक म्हणजे अर्थातच अर्णब गोस्वामी. अर्णबची सडेतोड, बिनधास्त प्रश्न विचारण्याची शैली कित्येकांना भावते, तर काहींना तो त्याचा आक्रस्ताळेपणाही वाटतो. पण, अर्णब मात्र कोणत्याही टीकाटिप्पणीला भीक न घालता, आपल्या राष्ट्रवादी भूमिका अगदी छातीठोकपणे मांडतो. पुरोगामी, फुटीरतावादी, तथाकथित बुद्धीजीवी, डावे-जेएनयुवाले यांना न पटणार्‍या, रुचणार्‍या भूमिका अर्णब आपल्या चॅनेलवरून अगदी निर्भीडपणे, कोणत्याही दबावाला बळी न पडता सादर करत असतो. त्यामुळे अर्णब तुम्हाला आवडो अथवा न आवडो, एक पत्रकार म्हणून, एका वृत्तवाहिनीचा अनुभवी संपादक म्हणून त्याच्या शब्दांना, मतांना ‘नॅशनल इंटरेस्ट’ आहेच. पण, मंगळवारी मुंबई-लखनऊ विमानप्रवासादरम्यान स्टॅण्डअप कॉमेडियन असलेल्या कोणा कुणाल कामराने अर्णबला उलटसुलट बरळायला सुरुवात केली. त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आणि ते सोशल मीडियावर अपलोड करून प्रसिद्धीची हौस भागवून घेतली. पण, कामराची ही करतूद त्याच्या चांगलीच अंगलट आली असून इंडिगोसह आता एअर इंडिया, गो-एअर, स्पाईस जेट यांसारख्या इतर विमान कंपन्यांनीही कामरावर बेशिस्त वर्तनाबाबत सहा महिन्यांची हवाईबंदी लादली आहे. खरं तर कुणाल कामरा असो अथवा इतर कोणी, अशाप्रकारे विमान प्रवासादरम्यान कुठल्याही प्रवाशासोबत गैरवर्तन करणे मुळात अशोभनीयच. पण, डाव्या विचारसरणीच्या कोयत्याला लटकून हवेत झोके घेणार्‍या कामराने अर्णबच्या पत्रकारितेवर, त्याच्या राष्ट्रवादी भूमिकांवर अश्लाघ्य शब्दांत शेरेबाजी केली. कामरा तावातावाने म्हणतो, “अर्णब, तू भित्रा आहेस... अर्णब, सांग तू भित्रा आहेस की पत्रकार आहेस? तू कोण आहेस अर्णब? सांग मला...पण, मला माहितेय तू याचे उत्तर देणार नाहीस. कारण, अर्णब तू भित्रा आहेस!!! हे माझ्यासाठी नव्हे, तर रोहित वेमुलाच्या आईसाठी, जिच्या जातीवरून तू चॅनेलवर चर्चा रंगवल्या होत्यास. जा जाऊन रोहित वेमुलाने आत्महत्येपूर्वी लिहिलेले १० पानी पत्र वाच. जर तुला हृदय असेल, थोड्या जरी भावना शिल्लक असतील, तर तू मानवतावादाच्या दृष्टिकोनातून विचार करशील. यू नॅशनलिस्ट...”



कामराचे कारनामे

कामराने अर्णबला उद्देशून उच्चारलेला शेवटचा शब्द ‘नॅशनलिस्ट’ मुद्दाम इंग्रजीत दिला. कारण, कामरा आणि त्याच्यासारख्या मोदीद्वेषींसाठी ‘नॅशनलिस्ट’ अर्थात ‘राष्ट्रवादी असणे’ ही जणू शिवीच, हे यावरून सिद्ध झाले. कारण, कामरासारख्या डाव्या डोक्याने विचार करणार्‍यांना ‘राष्ट्रवाद’ ही मूळ संकल्पनाच पचत नाही, रुचत नाही. त्यांच्या लेखी एखादी व्यक्ती ‘राष्ट्रवादी’ विचारांची असेल, तर ती ‘सेक्युलर’ होऊच शकत नाही. असो. हल्ली डाव्यांची ‘डिक्शनरी’ आणि ‘डिक्शन’ दोन्हीही अगदी कालबाह्य झाल्याने ही सगळी पिल्लावळ चवताळलेली दिसते. तसा कामराचाही हा काही पहिलावहिला कारनामा नाहीच! कामराच्या एकूणच करतुदींवर नजर टाकली की, याची नेमकी ‘कामना’ काय, ते सहज लक्षात येईल. २०१७ साली ‘शटअप कुणाल’ या शोमुळे कामरा प्रसिद्धीझोतात आला. त्यानंतर २०१७ साली कामराने युट्यूबवर मुलाखती घेण्याचा धडाकाच लावला. मुलाखती कोणाच्या तर रवीश कुमार, कन्हैय्या कुमार, उमर खालिद, असदुद्दीन ओवेसी, शेहला रशीद, जिग्नेश मेवाणी, अरविंद केजरीवाल, जावेद अख्तर. आता ज्यांची या कामराने मुलाखत घेतली, त्या नावांच्या केवळ यादीवरूनच हा कम्युनिस्ट कार्टा असल्याचे लक्षात यावे. हाच कामरा ‘तुकडे तुकडे गँग’चा प्रणेता आणि लोकसभा निवडणूक लढविणार्‍या कन्हैय्या कुमारच्या प्रचारार्थ बेगुसरायमध्ये तळही ठोकून होताच. लोकांना हसवण्याचा दावा करणार्‍या या कलाकाराने तर चक्क काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनाही ‘कॉमेडी’चे धडे देऊन ‘कॉमेडियन’ म्हणून ‘लाँच’ केले. थरूरांच्या ‘वन माईक स्टॅण्ड’मधील तथाकथित हास्यामागचा खरा चेहरा हा याच कामराचा! कामराचा कावेबाजपणा इथेच संपत नाही. २०१९ साली या महाशयांनी ट्विटरवर धार्मिक टिप्पणी केली आणि कारवाईच्या भीतीपोटी ट्विटर अकाऊंटच बंद करून टाकले. याच मुद्द्यावरून मुंबईमधील घरही खाली करण्यासाठी कामराला सांगण्यात आले होते. त्यामुळे वाद, कामरा आणि प्रसिद्धी हे अगदी ठरलेलेच! अर्णब दिसताच, कामराच्या आतील डावा कार्यकर्ता एकाएकी जागृत झाला आणि पुढचामागचा विचार न करता, अर्णबवर त्याने तोंडसुख घेतले. कामराच्या या अजिबात ‘कॉमेडी’ नसलेल्या ‘रावडीगिरी’कडे अर्णबने साफ दुर्लक्ष करत, न बोलताच कामराची चांगलीच जिरवली. म्हणूनच, कामरासारख्या अशा मोदीद्वेषींचे पंख छाटायलाच हवे!


@@AUTHORINFO_V1@@