युक्रेनचा राष्ट्र‘नायक’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2019   
Total Views |




४१ वर्षीय विनोदवीर वलोडिमिर जेलेंस्की लवकरच युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. होय, एका ‘कॉमेडियन’च्या हाती आता युक्रेनच्या ‘पॉलिटिकल’ चाव्या असतील, म्हणूनच तो सर्वार्थाने ठरला आहे युक्रेनचा नायक, युक्रेनचा महानायक.


‘रिल लाईफ’ आणि ‘रिअल लाईफ’मध्ये फरक हा असतोच. ‘लाईट्स, कॅमेरा आणि अ‍ॅक्शन’चे कृत्रिम भावविश्व हे सत्य, संघर्ष आणि सहनशीलतेला प्राधान्य देणार्‍या खर्‍याखुर्‍या आयुष्यापेक्षा अगदी भिन्न. पण, कधी कधी ‘रिल लाईफ’ ‘रिअल’ वाटावी आणि ‘रिअल लाईफ’ ‘रिल’ भासावी, असे कित्येक प्रसंग जीवनपटावर उलगडताना दिसतात. असाच एक अजब प्रकार घडलाय, जगाच्या पाठीवरील युक्रेन या देशात. तत्पूर्वी फक्त २००१ साली प्रदर्शित झालेला ‘नायक’ हा अनिल कपूरचा गाजलेला चित्रपट आठवून बघा. भ्रष्ट, अत्याचारी व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारा निर्भीड पत्रकार शिवाजीराव (अनिल कपूर) आधी एक दिवसाचा मुख्यमंत्री म्हणून आव्हान स्वीकारतो. राज्यशकट आपल्या हाती घेतो. एका दिवसात शेकडो कामांचा धडाका लावतो. व्यवस्थेला अक्षरश: हादरवून टाकतो. अमरीश पुरींनी अभिनित केलेल्या बलराज चौहान या दुष्ट मुख्यमंत्र्याची शिवाजीराव चांगलीच जिरवतो. अखेरीस जिद्द, चिकाटी आणि जनशक्तीच्या जोरावर शिवाजीरावलाच मुख्यमंत्री म्हणून लोकपसंती मिळते आणि तो स्वत:ला समाजकारणात, राजकारणात वाहून घेतो. भारतीय ‘नायक’च्या कथाकथनाचे कारण की, असाच एक ‘नायक’ युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार आहे. ४१ वर्षीय विनोदवीर वलोडिमिर जेलेंस्की लवकरच युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. होय, एका ‘कॉमेडियन’च्या हाती आता युक्रेनच्या ‘पॉलिटिकल’ चाव्या असतील, म्हणूनच तो सर्वार्थाने ठरला आहे युक्रेनचा नायक, युक्रेनचा महानायक.

 

आश्चर्य म्हणजे, जेलेंस्कीला राजकारणाचा, अनुभव अगदी शून्य. पण, ‘रिल लाईफ’ मध्ये म्हणाल, तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्षपद जेलेंस्की आधीच भूषवून मोकळे झाले आहेत. कारण, युक्रेनच्या टीव्हीवरील ‘सर्व्हंट ऑफ द पीपल’ या विनोदी मालिकाशृंखलेमध्ये जेलेंस्कींनी राष्ट्राध्यक्षपदाची भूमिका लीलया निभावली होती आणि आता ‘रिल’ नाही, तर ‘रिअल लाईफ’मध्ये ते युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदी तब्बल ७३ टक्के मताधिक्क्याने निवडून आले आहेत. आता याला आश्चर्य म्हणायचे की, देशाचे दुर्देव, ते जेलेंस्कींच्या कामाचा धडाका बघितल्यानंतर कळेलच. पण, सांगण्याचा मुद्दा एवढाच की, टीव्ही मालिकेत राष्ट्राध्यक्षपदाचा अभिनय करणार्‍या एका विनोदवीरावर युक्रेनियन जनतेने इतका विश्वास दाखवून जेलेंस्कीप्रती आपले प्रेम, त्यांच्याकडून असलेल्या राष्ट्रनिर्माणाच्या अपेक्षाच व्यक्त केल्या आहेत. खरं तर आपण ही निवडणूक जिंकू, याची खुद्द जेलेंस्की यांनाच खात्री नव्हतीच मुळी. पण, आता निवडणुका जिंकल्यानंतर लोकहितासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे ते सांगतात. जेलेंस्कीच्या विजयाची ‘एक्झिट पोल’च्या निकालांनंतर चाहूल लागताच त्यांचे प्रतिस्पर्धी आणि राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेंको यांनी आपल्या पदाचा राजीनामाही देऊन टाकला.

 

जेलेंस्कींचा धडाकेबाज प्रचार सुरू होता, त्यावरून त्यांच्या विजयाचा अंदाज वर्तविण्यात आला होताच. कारण, जेलेंस्कींचे भरपूर हलकेफुलके, हसविणारे व्हिडिओ, फोटो युक्रेनच्या सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. म्हणूनच ३९ उमेदवारांच्या या शर्यतीत जेलेंस्कींनीच बाजी मारली. टीव्हीच्या छोट्या पडद्यावर केवळ राष्ट्राध्यक्षपदाची भूमिका नेटाने पार पाडणारा हा विनोदवीर आज युक्रेनचा सर्वार्थाने राष्ट्रवीर ठरला. पण, कुठलाही राजकीय-प्रशासकीय अनुभव गाठीशी नसताना संपूर्ण देशाचा गाडा हाकणे, हे जेलेंस्कींसाठी निश्चितच आव्हानात्मक असेल. कारण, राष्ट्राध्यक्ष म्हणून मालिकेत भूमिका पार पाडताना लेखक-दिग्दर्शकांची फळी जे सांगेल, ते जेलेंस्की अभिनित करायचे. पण, आता लेखक-दिग्दर्शक नव्हे, तर इतर मंत्री, नोकरशहांच्या सहकार्याने त्यांनाच या सरकारचे खरेखुरे नेतृत्व करावे लागणार आहे. १९९१ साली सोव्हिएत रशियामधून वेगळा झालेला हा देश अजूनही बर्‍यापैकी रशियाच्या प्रभावाखाली आहेच. त्यातच रशियाने २०१४ साली युक्रेनपासून ‘क्रीमिया’ हा भूभाग वेगळा करून हा स्वतंत्र देशच अस्तित्वात आला. आजही युक्रेनच्या पूर्व भागात रशियाच्या पाठिंब्याने फुटीरतावादी शक्तींनी डोके वर काढले आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चेतून मार्ग काढण्याबरोबरच, रशिया-पुतीन यांच्याशी संतुलित संबंध प्रस्थापित करण्याची तारेवरची कसरत जेलेंस्कींना करावी लागेल. सोबत युक्रेनच्या विकासाचे मोठे आव्हानही त्यांच्यासमोर असेल. एकूणात युरोपीय विश्वाने, अमेरिकेने जेलेंस्कींच्या विजयाचे स्वागत केले असून आगामी काळात ते युक्रेनला नव्या उंचीवर घेऊन जातील, अशी अपेक्षा...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@