दोडामार्गाचे जैववैभव

    05-Jun-2025
Total Views |
The glory of the Dodamarga

महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेच्या कुशीत वसलेल्या दोडामार्ग तालुक्याच्या जैवसंपन्न प्रदेशामधील दुर्लक्षित वन्यजीवांची माहिती देणारा हा लेख...


दोडामार्ग हा महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवर सह्याद्रीच्या कुशीत वसलेला तालुका. या तालुक्यातील तिलारी खोरे खर्‍या अर्थाने जैवविविधतेने संपन्न व समृद्ध आहे. गेल्या २० वर्षांपासून या भागात असलेला रानटी हत्तींचा वावर, तसेच सावंतवाडी तालुयातील आंबोली ते दोडामार्ग तालुयातीत मांगेली येथील जंगलात आठ वाघ असल्याचा वनखात्याने प्रसिद्ध केलेला अहवाल, हे जंगल समृद्ध असल्याचा पुरावा आहे. तिलारी खोर्‍यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत मोठमोठे दुर्मीळ वृक्ष असणारे दाट जंगल असून, त्यात कित्येक दुर्मीळ वन्यप्राणी, पक्षी, बेडूक, वटवाघळे, साप, फुलपाखरे यांचा अधिवास आहे. म्हणूनच येथील जैवविविधता अगदी उच्चस्तराची आहे, असे म्हणता येईल.

लाखो वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या गोड्या पाण्याच्या दलदलीच्या परिसरातील ‘मायरिस्टीकास्वॅम्प’चे जंगल महाराष्ट्रात फक्त दोडामार्ग तालुयातच आढळते. बेडकासारखे तोंड असणारा ‘श्रीलंकन फ्राग माऊथ’ हा निशाचर पक्षी तालुयातील दाट जंगलाच्या जवळपास आढळतो. याचा आवाज मोठा व कर्कश असतो. या बेडूकतोंड्या पक्ष्याचा रंग झाडाच्या सालीसारखा असल्याने दिवसा झाडाच्या फांदीवर बसलेला पक्षी झाडाशी अगदी एकरूप होऊन जातो. दिवसा झाडाच्या फांदीवर गप्प बसून राहणारा पक्षी रात्र होताच सक्रिय होतो. ‘मलायन नाईट हेरॉन’ हा राखाडी तपकिरी रंगाचा असणारा पक्षी दोडामार्ग तालुयातील तळकट वनबाग परिसरात पावसाळी हंगामात दिसतो. खूपच लाजरा असणारा हा पक्षी पाण्याच्या जवळपास दाट जंगलामध्ये दिसतो. हा पक्षी दिसल्याच्या नोंदी खूपच कमी आहेत.

‘लाजवंती’ (Slendor Ioris) किंवा ‘वनमानव’ या नावाने ओळखला जाणारा सस्तन कुळातील हा प्राणी लाजरा, भित्रा, सहसा एकटा राहणारा निशाचरप्राणी भारताच्या दक्षिण भागात तसेच श्रीलंकेत आढळतो. दोडामार्ग तिलारी भागात कमी प्रमाणात दिसतो. शरीराचा रंग गर्द करडा किंवा मातेरी असून उंची सुमारे २५ ते ३० सेमी आणि वजन सुमारे ३०० ते ४०० ग्रॅम असते. डोळे मोठे असून डोळ्याभोवती गडद तपकिरी रंगाची वर्तुळे असतात. हात, पाय काटकुळे असून त्याच्या साहाय्याने तो झाडाच्या फांद्यांवरून जलदगतीने हालचाली करत असतो. हा प्राणी वृक्षवासी असून छोटे कीटक, नाकतोडे, सरडे, छोटे बेडूक यांच्यावर आपली उपजीविका करतो. लाजाळू असल्याने मनुष्यापासून दूर निघून जाणेच पसंत करतो. म्हणून ‘लाजवंती’ नावाने ओळखला जातो. तसेच, त्याची चेहरेपट्टी लहान मुलाशी मिळतीजुळती असल्याने स्थानिक लोक त्याला वनमाणूस नावाने ओळखतात. अंधश्रद्धेमुळे काळ्या जादूसारख्या प्रकारासाठी याची तस्करी होते आणि त्यामुळे त्याचे अस्तित्व धोयात आले आहे.

‘हंपनोज पिटवायपर’ (Hump nosed pit viper) हा साप Viperidae कुळातील असून तो विषारी आहे. पूर्ण वाढ झालेल्या सापाची लांबी साधारणपणे दोन फुटापर्यंत असून डोके त्रिकोणी व चपटे असते. तोंडाच्या पुढील भागावर असलेल्या उंचवट्यासारख्या भागामुळे याचे नाव ‘हंपनोज पिटवायपर’ किंवा ‘नाकाड्या’ असे पडले आहे. शरीर तपकिरी मातकट रंगाचे असून त्यावर गडद काळ्या रंगाचे ठिपके असतात. नाकाड्या साप अत्यंत विषारी असला तरी फार कमी प्रमाणात आढळतो. पश्चिम घाटाच्या दक्षिण भागात म्हणजे गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू तसेच श्रीलंकेमध्ये आढळतो. याची महाराष्ट्रातील सर्वप्रथम अधिकृत नोंद दोडामार्ग तालुयातील तिलारी परिसरातून करण्यात आली आहे. हा साप पालापाचोळ्यात शांतपणे कोणतीही हालचाल न करता पडून राहतो. पालापाचोळ्याशी असलेल्या रंगसाधर्म्यामुळे पटकन ओळखता येत नाही. फारसा आक्रमक नसला, तरी डिवचल्यावर फुरश्यासारखी झेप घेऊन चावा घेतो. प्रसंगी त्याच्या चाव्याने मृत्यूदेखील ओढवू शकतो. लहानपाली, सरडे बेडूक हे त्याचे भक्ष असून रात्रीच्या वेळी तो सक्रिय असतो.

गेल्या काही वर्षांत दोडामार्गात वाढत चाललेली काजू, रबर यांसारख्या नगदी पिकांची शेती आणि त्याकरिता तुटणारे जंगल, त्यामुळे होणारे जंगलाचे विलगीकरण (Fragmentation), वणवे तसेच मानव-वन्यजीव संघर्ष यांसारख्या कारणामुळेही समृद्ध व संपन्न जैवविविधता धोयात आली आहे.

उडणारा सरडा / Indian flying lizard (Draco dussumieri)- प्रामुख्याने भारताच्या दक्षिण पश्चिम घाटात आढळणारा हा सरडा, Indian flying lizard नावाने परिचित आहे. हा सरडा वृक्षवासी असून मादी फक्त अंडी देण्यासाठी जमिनीवर येते. त्याच्या पुढील आणि मागील पायाच्या दरम्यान शरीराच्या बाजूने असणार्‍या पातळ कातडीचा पंखासारखा वापर करून हा सरडा एका झाडावरून दुसर्‍या झाडावर हवेतून घरंगळत (glide) जातो. झाडांवरील मुंग्या, छोटे कीटक हे त्याचे भक्ष आहे. खाद्य शोधण्याकरिता किंवा शत्रूपासून दूर जाण्याकरिता तो हवेतून घरंगळत जातो. या सरड्याच्या गळ्याच्या येथे एक वैशिष्ट्यपूर्ण कातडी पडदा (dewlap) असतो. नरामध्ये हा पडदा गडद पिवळ्या रंगाचा व मादीपेक्षा मोठा असतो. विणीच्या काळात आपल्या हद्दीत अतिक्रमण करून येणार्‍या नरास धोयाचा इशारा देण्याकरिता तसेच मादीला आकर्षित करण्याकरिता केला जातो. मादीमध्ये असणारा छोटा पडदा उघडून मादीदेखील नराला प्रतिसाद देते.

संजय नाटेकर
(लेखक दोडामार्ग तालुयात वन्यजीव निरीक्षणाचे काम करतात.)