मुंबईच्या समुद्रकिनार्यांवर अनोख्या सूक्ष्म सागरी जीवांचे विश्व दडले आहे. सामान्य मुंबईकरांच्या नजरेतून या विश्वाची ओळख करून देणारा हा लेख...
स्वप्ननगरी, मायानगरी, कधीही न झोपणारे शहर, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे केंद्र, देशाची आर्थिक राजधानी किंवा मग पोर्तुगीजांनी आंदण म्हणून ब्रिटिशांना दिलेले शहर, अशी मुंबई या शहराची वैविध्यपूर्ण ओळख. पण, आज या लेखातून मुंबईच्या फारशा माहिती नसलेल्या आणि अपरिचित ओळखीबद्दल जाणून घेणार आहात.
मुंबईमध्ये प्रियदर्शिनी पार्क म्हणजेच नेपियन्सी रोड, महालक्ष्मी मंदिर, हाजीअली, बॅण्डस्टॅण्ड, कार्टर रोड वांद्रे, जुहू कोळीवाडा या ठिकाणी खडकाळ समुद्रकिनारे आहेत. ओहोटीच्या वेळेस नेपियन्सी रोड येथे प्रियदर्शनी पार्कमधून समुद्राच्या दिशेने सरळ चालत गेल्यावर जिथे जॉगिंग ट्रॅक संपतो, तिथे थांबल्यावर आपल्याला समुद्रात अगदी थोड्याच अंतरावर एक मोठा खडक वर आलेला दिसतो. समुद्री प्रवाळ या सुप्रसिद्ध गटामध्ये मोडणारे ‘झूऍन्थिड्स’ नावाचे प्राणी आपल्याला सहज पाहायला मिळतात. भरती संपून ओहोटीच्या वेळेस जेव्हा समुद्राचे पाणी खाली जाते, तेव्हा या दगडांमधील खड्ड्यांमध्ये पाणी साचते आणि याच डबयांमध्ये ‘झूऍन्थिड्स’ नावाचे प्राणी एकमेकांना अगदी चिकटून दाटीवाटीने कायमस्वरूपी तिथेच राहतात. त्याच वसाहतीमध्ये भटकंती करताना आपल्याला ‘साधू खेकडा’ म्हणजेच ‘हर्मिट क्रॅब’ नावाचा प्राणी दिसतो. इतर खेकड्यांसारखे ‘हर्मिट क्रॅब’च्या शरीराच्या पृष्ठभागावर कवच नसते. त्यामुळे त्याची शिकार खूप सहजशय असते. परिणामी, हे खेकडे मेलेल्या समुद्री गोगलगायींचे शंख हे स्वतःचा बचाव तसेच आसरा म्हणून वापरतात.
महालक्ष्मी मंदिर व हाजीअली दर्गा यांच्यामध्ये असाच एक भलामोठा खडकाळ समुद्रकिनारा आहे. याठिकाणी ओहोटीच्या वेळेस विविध प्राणी दिसतात. त्यातील एक प्राणी म्हणजे मुंबईची गोगलगाय. १९४६ साली मुंबईत ‘विंकवर्थ’ नावाच्या ब्रिटिश संशोधकाने या गोगलगायीची नोंद केली. त्यानंतर जवळपास ७० वर्षांनंतर ‘मरीन लाईफ ऑफ मुंबई’तर्फे आयोजित केल्या गेलेल्या ‘किनाराभ्रमंती’ उपक्रमादरम्यान त्यांना ती दिसली. ‘गोनीओब्रँकस बॉम्बेयानस’ या नावाने आज ओळखली जाणारी ही गोगलगाय त्याकाळी मुंबईत पहिल्यांदा दिसली म्हणून तिचे नाव ‘बॉम्बे स्लग’ (मुंबई गोगलगाय) असे ठेवण्यात आले. गुलाबी रंगाचे ठिपके संपूर्ण शरीरावर मिरवणारी ही गोगलगाय अतिशय सुंदर दिसते. हिचे खास वैशिष्ट्य म्हणजे, या गोगलगायीला शंख नसतो. हिच्या पाठीवर मागच्या बाजूस अर्धवट उमललेल्या फुलासारखा एक देखणा अवयव असतो, ज्याला ’सळश्रश्री’ म्हणतात. या अवयवामार्फत ती गोगलगाय श्वासोच्छ्वास करते. तिच्या शरीराच्या पाठीवर पुढील भागी ’रायनोफोर’ नावाचा अवयव असतो. ज्याचा वापर ती नाकासारखा करून पाण्यातून मिळणारे रासायनिक संकेत आणि संवेदना ओळखण्याचे काम करते.
मुंबईच्या समुद्रकिनार्यावरती सौरऊर्जा असलेली एक गोगलगाय म्हणजे ‘एलिशिया गोगलगाय.’ हिलादेखील शंख नसतो. ही गोगलगाय दगडांवर असलेले शेवाळ खाते, साठवून ठेवते आणि जेव्हा अन्नाची कमतरता असेल, तेव्हा ती तिच्या शरीरात असलेल्या शेवाळाच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण करून स्वतःचे पोट भरते. या डबयामध्ये अजून एक प्राणी राहतो, त्याचे नाव आहे ‘हायड्रॉइड.’ हा जो हायड्रॉइड नावाचा प्राणी आहे, तो खोल समुद्रात मस्तपैकी राहणार्या, प्लास्टिक पिशवीसारखा दिसणार्या जेलीफिश या विषारी प्राण्याचा लांबचा नातेवाईक आहे. त्याचप्रमाणे या हायड्रॉइडचे विष पचवणारी एक गोगलगाय आहे, तिचे नाव ‘क्रेटना पवारशिंदेओरम.’ ही गोगलगाय त्या हायड्रॉइडला खाते आणि त्याचे विष हे स्वतःच्या पाठीवर असलेल्या सीराटा नावाच्या लांब, उभ्या अवयवांमध्ये साठवून ठेवते. जेव्हा कोणी हिला खाण्यासाठी येते, तेव्हा ती साठवलेली विषाची गोळी झाडून टाकते आणि स्वतःचा बचाव करते. समुद्र किनार्यावरील अशा हजारो प्रजाती सहजासहजी दिसत नसल्या, तरी हे किनारे सुरक्षित ठेवले, तरी या प्रजातींचेही संरक्षण होईल.
निखिल साठे
(लेखक सागरी निरीक्षक आहेत.)