पर्यावरणीय किंवा वन्यजीवांच्या समस्यांचे आकलन पुस्तकांतून नव्हे, तर अनुभवसिद्ध निरीक्षणातून होते, हा नियम मारुती चितमपल्लींनी रुजवला. आपली मुळे शोधता शोधताच ते ‘अरण्यऋषी’ झाले.
वातावरणीय बदलांच्या झळा शहरांना, पाणीपुरवठ्याला, उद्योगांना आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कृषिक्षेत्राला बसू लागल्या, तेव्हा त्यातले गांभीर्य आपल्या लक्षात यायला लागले. भारतातील पर्यावरणाची चळवळ तर कितीतरी काळ पाश्चिमात्य प्रतिमानांच्याच प्रेमात आहे. आजही त्यात फारसे बदल झालेले नाहीत. ‘अल गोर’ वगैरेसारख्या पर्यावरणाच्या नावाखाली उपायापेक्षा जगाला घाबरवण्याचेच उद्योग करणार्यांच्याच हाती ही चळवळ राहिली. देश म्हणून आपण निराळे आहोत, आपली जैवविविधता निराळी आहे, युरोप आणि अमेरिकेच्या मानवनिर्मित समस्यांपेक्षा दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या पर्यावरणीय समस्यांशी आपण अधिक अनुरक्त आहोत, याचे म्हणावे तसे भान आपल्याला आजही आलेले नाही. यातून भारताची पर्यावरणीय चळवळ कमालीच्या नकारात्मक भूमिकेत आजही दिसते. सरकारने आणलेल्या कुठल्याही नव्या संकल्पनांना किंवा विकासाच्या योजनांना असमंजसपणातून विरोध केला जातो. भारतीय भूमीतल्या वन्यजीवांच्या वर्तनाचा किंवा ऊन, वारा, पाऊस, थंडी यांच्या अंदाजाचा भारताच्या परिप्रेक्ष्यातला आपला अभ्यास तोकडा आहे. याला दोन कारणे आहेत; एक तर आपल्या संशोधनाला दिशा नाही आणि दुसर्या बाजूला आपल्या पूर्वजांनी जे सांगितले, त्यावर आपला विश्वास नाही. मारुती चितमपल्ली यांचे वेगळेपण सांगत असताना त्यांनी किती विपरीत परिस्थितीत स्वतःचा मार्ग निवडला, हे सांगणे आवश्यक आहे.
चितमपल्लींना ‘अरण्यऋषी’ ही उपाधी लागू झाली होती. भारतातील ‘पक्षीशास्त्राचे जनक’ म्हणून डॉ. सलीम अलींना ओळखले जाते. आपल्या हयातीत शेकडो भारतीय पक्ष्यांच्या प्रजातींचा शोध लावून त्याचे दस्तावेजीकरण करण्याचे काम डॉ. सलीम अलींनी केले. पक्षीकोषामुळे चितमपल्ली प्रकाशात आले. डॉ. सलीम अलींनी या पक्ष्यांची इंग्रजी आणि लॅटिन नावे दस्तावेजात आणली, तर चितमपल्लींनी जवळजवळ २४ भारतीय भाषांमध्ये प्रत्येक पक्ष्याला काय म्हणतात, ते लिहून काढले. यात अगदी जनजातींच्या भाषांचाही समावेश आहे, हे विशेष! याचाच अर्थ हे ज्ञान परंपरागत मौखिकमार्गे आपल्याकडे होते. त्यापूर्वी ‘मृगपक्षीशास्त्र’ या हंसदेव लिखित संस्कृत ग्रंथाचे मराठी भाषांतर त्यांनी पं. नरसिंह भातखंडे यांच्या साहाय्याने केले होते. यात गंमत आहे. आशियाई सिंहाची किंवा हत्तीची केवळ एक प्रजाती आधुनिक प्राणीशास्त्र सांगते. हंसदेवांनी या दोन्ही प्रजातींच्या किमान चार उपप्रजाती आहार-विहाराच्या लक्षणांसह दस्तावेजीकृत केल्या. यातील एकच प्रजाती सांगितलेल्या प्राण्यांच्या आजही एकच प्रजाती आहेत. मात्र, अमुक झाल्याने तमुक प्रजातीचा नाश झाला, हे सांगितले की आपल्याला खरे वाटते. हे ग्रंथ आज आधुनिक प्राणिशास्त्राच्या संदर्भग्रंथात नाहीत. कारण, पाश्चिमात्य आधारावरच्या ज्ञानाला त्याच्या मर्यादित ज्ञानाच्या पलीकडचे विस्तार मान्य नाहीत. मारुती चितमपल्लींचे योगदान हे इथे आहे.
चितमपल्ली रूढार्थाने लेखक, संशोधक वगैरे नव्हते. मात्र, वनविभागामुळे त्यांचा जंगलमायेशी खरा संपर्क आला. हा संपर्क पुढे श्रद्धेत परिवर्तित झाला आणि जंगलांनी त्यांचे जगणे ‘मनेन, वाचेन, कायेन’ समृद्ध झाले. ‘चकवाचांदण’ हे त्यांचे आत्मचरित्र. खरे तर हे पुस्तक वाचणे, हा एक सफारी अनुभवण्याचाच क्षण. लोक वाघ बघायला जातात. पण, भोवताली सजीव सृष्टी पाहात नाहीत, जी वाघाला सांभाळते. एखादा वाघ गेला, तर परत येऊ शकतो. पण, ही सृष्टीच नसेल, तर वाघ परत येऊनही स्थिरावू शकत नाही. चितमपल्लींना हे नेमके उमगले होते. त्यांच्या लिखाणात वाघ संदर्भासाठी येतो. वनांचे सारे घटक आणि वनांवर जगण्यासाठी विसंबून राहणारी माणसं मात्र वारंवार येत राहतात. त्यांच्या पारंपरिक ज्ञानातून त्यांना ज्ञानाच्या प्रकाशवाटा सापडतात. चितमपल्ली या वाटांचे दस्तावेजीकरण करत राहिले. ‘अस्वलाची भाकरी’, ‘वानरांची शेकोटी’, ‘कासव खाणारी निलगाय’ या त्यांच्या गोष्टींची नवपर्यावरणवाद्यांनी चेष्टा केली. मात्र, एका मोठ्या काळानंतर जसजसा वन्यजीवांच्या वर्तनाचा अभ्यास प्रकाशात यायला लागला, तसतशा या गोष्टी मान्य व्हायला लागल्या. चितमपल्लींना त्याचा काहीच फरक पडत नव्हता. तणमोरांचा शोध घेताना फासे पारधी जमातीला सोबत घेतले की पायपीट वाचते, हा त्यांचा ‘कॉमन सेन्स’ अफलातून होता. वन्यजीवांच्या क्षेत्रातले संस्कृत ग्रंथ त्यांना माहीत होते. इतकी वर्षे सरकारी नोकरी केल्यानंतर आधुनिकतेचे त्यांना वावडे नव्हते. पण, वन्यजीव व वनसंपदेच्या क्षेत्रातली आपली मुळे ते शोधत होते. चितमपल्लींचे लिखाण ललित स्वरूपाचे असले, तरी त्याला भटकंतीतून आलेल्या अनुभवाचा भक्कम पाया होता. ‘जंगलांचं देणं’, ‘पाखर माया’, ‘आनंददायी बगळे’, ‘चकवाचांदण’ याव्यतिरिक्त विपुल वृत्तपत्रीय लिखाण त्यांनी केले. ‘चकवाचांदण’ हे त्यांचे आत्मचरित्र. पण, त्यालाही त्यांनी ‘वनोपनिषद’ हे नाव दिले. भारतीयांचे सगळे ज्ञान वेदांच्या, उपनिषदांच्या, श्लोकांच्या स्वरूपात संचित आहे. आपल्याला आलेल्या ज्ञानाची अनुभूती इतरांना देण्यासाठी चितमपल्लींनीही तोच मार्ग निवडला.
जंगलासाठी झटणार्या सगळ्याच वन अधिकार्यांसाठी ते एक आदर्श होते. निवृत्तीनंतरही ते थकले नाहीत. खर्या अर्थाने त्यांनी जंगलांनी दिलेले देणे फेडायला सुरुवात केली. साहित्याच्या माध्यमातून त्यांनी जंगलांची जी सेवा केली, ती त्यांची उतराईच आहे. केंद्र सरकारने नुकताच ‘पद्मश्री’ने त्यांचा कार्यगौरव केला; त्याने ते कृतार्थही झाले होते. एका ज्ञानमग्न अवस्थेत गेलेला हा अरण्यऋषी कैलासवासी झाला. संदर्भासाठी मराठीतून कोशवाङ्मय निर्माण करण्याच्या एका अनोख्या ज्ञानयज्ञाला आपण आता मुकलो आहोत. असा वल्ली होणे नाही. दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे ‘अरण्यऋषी’ मारुती चितमपल्लींना भावपूर्ण श्रद्धांजली...