सलग तीन लोकसभा निवडणुका आणि कित्येक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव पत्करल्यानंतरही, काँग्रेसने पक्षसंघटनेत बदलांना प्राधान्य दिले नाहीच. आताही अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात आत्मचिंतनाच्या नावाखाली राजकीय आगपाखड करण्यातच बहुतांश नेत्यांनी धन्यता मानली. त्यामुळे काँग्रेसचे हे अधिवेशन म्हणजे नुसते बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात ठरण्याचीच शक्यता अधिक!
गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत 99 जागा जिंकून स्वतःला थोडे बळकट करणारा काँग्रेस पक्ष, अनेक दशकांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये मात्र सत्तेबाहेर आहे. हिमाचल प्रदेश, तेलंगण, कर्नाटकनंतर झारखंड (आघाडी सरकार) वगळता काँग्रेस पक्षाचे नामोनिशाण नाही. अशा परिस्थितीत, गुजरातमधील अहमदाबाद येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये भाजपचा सामना करण्यासाठी पक्षाला मजबूत करण्यासाठी मंथन करण्यात आले. अर्थात, ज्या राज्यात काँग्रेस तब्बल तीन दशकांहून अधिक काळ सत्तेबाहेर आहे, त्याच राज्यात पक्षाला बळकटी देण्याच्या आणाभाका काँग्रेसजनांनी घेतल्या आहेत. या अधिवेशनामध्ये काँग्रेसने प्रामुख्याने 2027 साली होणार्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाला बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अर्थात, या अधिवेशनामध्येही लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपले जुनेच मुद्दे मांडले. त्यामध्ये आरक्षणाची 50 टक्के मर्यादा ओलांडण्यापासून जातीय जनगणनेच्या जुन्याच मुद्द्यांचा समावेश होता. मात्र, हे सर्व मुद्दे काँग्रेसला गुजरातमध्ये यश मिळवून देतील का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण, याच मुद्द्यांवर हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीच्या जनतेने काँग्रेसला सपशेल नाकारले आहे, याचा काँग्रेसला सपशेल विसर पडलेला दिसतो.
काँग्रेसच्या अहमदाबाद अधिवेशनाकडे 2027 सालच्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने पाहिले जात आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेते झाल्यानंतर राहुल गांधी तिसर्यांदा गुजरातचा दौरा केला. गेल्या महिन्यात मार्चमधील दौर्यात त्यांनी विविध नेत्यांसह जिल्हास्तरावरील कार्यकर्त्यांची भेट घेतली होती. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये पुन्हा स्वतःला बळकट करण्याची हीच योग्य वेळ आहे. म्हणूनच राहुल गांधींनी गुजरातमधूनच भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात बिगुल फुंकण्याची तयारी केली आहे, असे काँग्रेसच्या रणनीतिकारांचे म्हणणे. त्याचप्रमाणे ज्या राज्यांत भाजप सर्वांत मजबूत आहे, तेथे पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन घेऊन राहुल गांधी यांनी ते भाजपविरोधात निर्णायक लढा देण्यास सज्ज असल्याचा संदेश दिल्याचेही काँग्रेसजनांचा दावा. मात्र, अशी तयारी राहुल गांधींनी नेमकी किती वेळा केली आणि दरवेळी त्यांना कसे अपयश आले; हे सांगणे काँग्रेसजन सोयीस्कररित्या टाळतात.
“आम्हाला जिल्हाध्यक्षांना अधिक राजकीय अधिकार द्यायचे आहेत. दोघांची जबाबदारी निश्चित करण्यात येईल आणि त्यांना अधिक स्वातंत्र्य देण्यात येईल. जिल्हाध्यक्षांना शक्तिशाली बनवून, आम्हाला ब्लॉक, डिव्हिजन, गाव, ग्रामीण आणि बूथ पातळीपर्यंत पोहोचायचे आहे.” काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी पक्षाचे सूक्ष्म व्यवस्थापन सूत्र असे दोन ओळींमध्ये स्पष्ट केले. अहमदाबादमधील दोन दिवसांच्या काँग्रेस अधिवेशनात पक्षाची हीच रणनीती असेल, असा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. एकप्रकारे भाजपच्या ‘मायक्रोमॅनेजमेंट’ची कॉपी करण्याचे काँग्रेस पक्षाचे धोरण असेल, असे दिसते. अर्थात, भाजपचे ‘मायक्रोमॅनेजमेंट’ काँग्रेसला कितपत जमेल आणि झेपेल, ही शंका आहेच. कारण, भाजपमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘मायक्रोमॅनेजमेंट’ची एक नवी व्याख्या प्रस्थापित केली आहे. मंडल अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष असे सुयोग्य नियोजन भाजपमध्ये आहे. आदेश आल्यानंतर तो टाळण्याची पद्धती आणि संस्कृती भाजपमध्ये नाही. त्यामुळे ‘पन्नाप्रमुख’सारखी रणनीती भाजप यशस्वीपणे राबवते. त्याचवेळी दुसरीकडे काँग्रेसमध्ये प्रत्येक नेता हा स्वतंत्र संस्थान असतो. त्यामुळे ‘मायक्रोमॅनेजमेंट’ काँग्रेसला जमेल का, असा प्रश्न निर्माण होतो.
अधिवेशनात असेही ठरविण्यात आले की, काँग्रेस पक्ष त्याच्या पुनरुज्जीवनावर काम करेल. राहुल गांधींनी महिनाभरापूर्वीच याचे संकेत दिले होते. दि. 8 मार्च रोजी अहमदाबादमधील सार्वजनिक व्यासपीठावर राहुल गांधींच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली. राहुल गांधी म्हणाले होते की, “गुजरात काँग्रेसमध्ये दोन प्रकारचे नेते आहेत. एक म्हणजे जो जनतेसोबत उभा राहतो. दुसरे म्हणजे जे जनतेपासून तुटलेले आहेत आणि त्यापैकी काही भाजपमध्ये सामील झाले आहेत.” काँग्रेस लग्नाच्या मिरवणुकीत शर्यतीचा घोडा पाठवते आणि लग्नाच्या घोड्याला शर्यतीला पाठवते. पक्षात नेत्यांची कमतरता नाही. जर कडक कारवाईत 30 ते 40 लोकांना काढून टाकायचे असेल, तर त्यांना काढून टाकावे. काँग्रेसच्या अधिवेशनातही या मुद्द्यांवर चर्चा झाली. याला ‘मिशन गुजरात’चे स्पष्ट आवाहन मानले जात आहे. देशद्रोही म्हणजेच ‘स्लीपर सेल्स’वर कारवाई करून पक्ष तळागाळातील नेत्यांना सत्ता देण्याची तयारी करत आहे. याद्वारे पक्ष केवळ गुजरात जिंकण्याची तयारी करत नाही. उलट, त्याचा परिणाम बिहार आणि इतर राज्यांमध्ये होणार्या निवडणुकांमध्येही दिसून येईल की नाही, ते लवकरच स्पष्ट होईल.
काँग्रेसच्या या अधिवेशनात वैशिष्ट्यपूर्ण ठरले ते सदाबहार काँग्रेस नेते शशी थरूर. असे मानले जाते की, शशी थरूर यांचा कोणताही सल्ला काँग्रेसमध्ये कधीच गांभीर्याने घेतला गेला नाही. कोणीही त्याची पर्वा केली नाही आणि कोणी कधी लक्ष दिले नाही. मात्र, अशा गोष्टींमुळे शशी थरूर यांना काही फरक पडला नाही. जेव्हा जेव्हा संधी मिळते, तेव्हा शशी थरूर त्यांचे विचार नक्कीच व्यक्त करतात. मग कोणी ऐको किंवा न ऐको. शशी थरूर यांचा सल्ला सामान्य नसतो; ते थेट राहुल गांधींना लक्ष्य करतात आणि त्यांच्या राजकीय भूमिकेलाही आव्हानही देतात. जर आपण शशी थरूर यांच्या विधानाकडे पाहिले, तर ते राहुल गांधींच्या राजकारणावर एक अतिशय कठोर टिप्पणी आहे, ज्यामध्ये त्यांना फक्त नकारात्मकता दिसते आणि म्हणूनच मोठा प्रश्न असा आहे की, राहुल गांधी शशी थरूर यांचा सल्ला काँग्रेसच्या बाजूने असला, तरी तो स्वीकारतील का? तरीदेखील शशी थरूर यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेतृत्वाला, विशेषतः राहुल गांधींना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
शशी थरूर यांनी काँग्रेस नेतृत्वाला नकारात्मकता सोडण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी यापूर्वी राहुल गांधींना मोदींवर वैयक्तिक हल्ला करण्याऐवजी सरकार आणि भाजपच्या धोरणांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला होता. काँग्रेस अधिवेशनात शशी थरूर म्हणाले की, “काँग्रेसने नकारात्मक टीका न करता अशा, भविष्य आणि सकारात्मक चर्चेसह राजकीय पक्ष म्हणून पुढे जावे.” शशी थरूर यांचा असा विश्वास आहे की, काँग्रेस हा केवळ भूतकाळाचा नाही, तर भविष्याचा पक्ष असावा. काँग्रेस खासदार म्हणतात की, “काँग्रेसला देशातील लोकांसमोर सकारात्मक दृष्टिकोन मांडावा लागेल. आपल्याकडे कोणता रोडमॅप आहे, हे आपल्याला जनतेला सांगावे लागेल. आतापर्यंत आम्ही फक्त नकारात्मक प्रचार करत आहोत आणि भाजपला चुकीचे म्हणत आहोत, परिणामी जनता काँग्रेसकडे नकारात्मक पक्ष म्हणून बघत आहे. शशी थरूर यांना वाटते की, काँग्रेसने सत्तेत आल्यास जनतेला सांगावे की पक्ष जनतेसाठी काय करेल. भविष्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे.” शशी थरूर म्हणतात, “असे दिसते की, आपण ऐतिहासिक काळातील पक्ष बनलो आहोत आणि त्याच जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगत आहोत.”
थरूर यांनी जे म्हटले ते अगदी बरोबर. पण, ते फक्त एका दृष्टिकोनातून चुकीचे आहे ते म्हणजे थेट राहुल गांधींना लक्ष्य करणे. अर्थात, थरूर यांनी थेट नाव घेतलेले नाही; मात्र सध्याचे राहुल गांधी यांचे कर्कश राजकारण पाहता थरूर यांचे आवाहन हे राहुल गांधी यांनाच थेट टोला ठरला आहे.