वाढलेली स्पर्धा आणि हरवलेली मुल्ये

    08-Mar-2025
Total Views |

12th - SSC Board Exam Copy
 
दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपी होऊ नये यासाठी, राज्य सरकार विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र, कॉपी करण्यास विद्यार्थी का जातात हाच खरा प्रश्न आहे. त्याचे कारण आजच्या समाजाच्या विचारसरणीत लपलेले आहे. वाढत्या कॉपी प्रकरणांचा आणि सामाजाच्या विचारसरणीचा घेतलेला हा आढावा...
 
ज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. यावर्षी राज्यात परीक्षांमधील गैरप्रकाराला आळा बसावा, म्हणून मोठ्या प्रमाणावर शासन, प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन, गैरप्रकार करणार्‍यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. परीक्षा हा शालेय शिक्षण विभागांतर्गत येणारा विषय आहे. मात्र, आता परीक्षेतील गैरप्रकाराला आळा बसण्यासाठी जिल्हा स्तरावरील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांसारख्या अत्यंत जबाबदार आणि महत्त्वाच्या पदावरील अधिकार्‍यांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे. परीक्षेत गैरप्रकार होणार नाही, यासाठी विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे प्रयत्न झाले. त्यापलीकडे गैरप्रकार नियंत्रणासाठी, विविध स्वरूपात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळा’च्यावतीने राज्यातील प्रत्येक विद्यार्थी कॉपी करणार नाही, यासाठी विद्यार्थ्यांना शपथ दिली गेली आहे. यासारख्या विविध मार्गाने गैरप्रकारावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न होत असतानादेखील, राज्यात परीक्षेतील कॉपी प्रकाराला आळा बसवण्यात यश मिळू शकले नाही. माध्यमांमधून कॉपी संदर्भात छायाचित्र, वृत्त प्रकाशित होत आहेतच. मुळात विद्यार्थ्यांना शपथ देऊन त्यांच्या मनावर नियंत्रण आणले जाईल, गैरप्रकाराला आळा बसवण्यात यश मिळू शकेल, ही वर्तमानातील भाबडी आशा म्हणायला हवी. मुळात त्या दिशेचा प्रवास घडावा, यासाठी आवश्यक असलेले मूल्यशिक्षण आपल्या शिक्षणातून खरेच रूजले आहे का? प्रतिज्ञेचा अर्थ समजून घेत, पाऊलवाटा चालण्यासाठी शहाणपण आणि विवेकाचा विचार आपल्या शिक्षणातून पुरेशा प्रमाणात पेरला गेला आहे का? शिक्षणाचे बाजारीकरण झाल्यानंतर, बाजारीकरणाचे विपरित परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाले असल्याचे समोर आले आहे. आता आपण जे काही गैरप्रकार अनुभवतो आहोत, ते सारे मूल्यांची हरवलेली वाट दर्शित करणारी आहे.
 
शिक्षण म्हणजे शहाणपणाची वाट. शिक्षण म्हणजे संस्काराची पेरणी आहे. भविष्याची वाट चालण्यासाठी मनाची जडणघडण व्हावी, म्हणून शिक्षण संस्था निर्माण करण्यात आल्या आहेत. समाजाला उन्नत करण्यासाठी, शिक्षण आहे. याचा अर्थ शिक्षण हे मूल्यांची वाट आहे. मात्र, आज दुर्दैवाने आपल्याकडे शिक्षणातच अनेक वाईट प्रकार घडताना दिसता आहेत. शिक्षणात सध्या सर्वाधिक चर्चेला येणारा प्रकार म्हणजे परीक्षेतील गैरप्रकार, कॉपीसारखे प्रकार पुढे येत आहेत. राज्यात गेल्या काही वर्षांत, सामुहिक कॉपीचे प्रकार समोर आले आहेत. यावर्षीच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षा सुरू असताना, अहिल्यानगरमध्ये नायब तहसीलदार यांच्यावर आपल्या मुलाला कॉपीच्या उद्देशाने मदत करण्यासाठी, परीक्षा केंद्रात प्रवेश केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, राज्यभर विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले आहे. काही ठिकाणी शिक्षक विद्यार्थ्यांना मदत करत असल्याचे समोर आले.पेपर फुटीसारखे प्रकारही आपल्याकडे घडताना दिसता आहेत. गैरप्रकाराच्या विविध वाटा, विद्यार्थी धुंडाळताना दिसत आहेत. पालकही या प्रकारात आघाडीवर आहेत.नव तंत्रज्ञानाचा उपयोग करत, विद्यार्थी मार्गक्रमण करत आहेत. विद्यार्थी, पालक, समाज, शिक्षक, संस्थाचालक या सर्वांनाच, मूळ शिक्षणाच्या हेतूपेक्षा केवळ गुण हवे आहेत. शिक्षणाच्या वाटा आणि हेतू चुकला की, यापेक्षा वेगळे काही वाट्याला येणार नाही. मूलभूत शिक्षणाचे महत्त्व हरवत चालले आहे आणि केवळ परीक्षा, परीक्षांमधील गुण महत्त्वाचे ठरू लागले आहेत. शिक्षणाचा हेतू हरवला की, गैरप्रकाराचा धुमाकूळ सुरू होणारच.
 
विद्यार्थ्यांना गुण हवे असतील, तर त्यासाठी कष्टाची वाट चालण्याची गरज आहे. संत तुकोबा म्हणाले होते की, ‘असाध्य ते साध्य करीता सायास। कारण अभ्यास तुका म्हणे.’ संतानी सांगितलेला हा अत्यंत परिणामकारक मार्ग आहे. यशाचे शिखर पादाक्रांत करायचे असेल, तर आपल्याला कष्टसाध्यतेची वाट चालावी लागेल. कष्टाला कोणताही पर्याय नाही. यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो, अशी सुवचने ऐकत मोठी झालेली पिढी, या देशाने अनुभवली आहे. स्वप्नात वचन दिले म्हणून, राज्य दान करणारा राजा या भूमीने इतिहासात वाचला आहे. त्या वाटा चालण्यासाठी सत्याची वाट चालणारे महात्मा गांधी, भारतीय परंपरेतील सत्याचे महत्त्व जाणून त्यांनी स्वतःला घडवले आहे. छत्रपती शिवरायांनी चालवलेली स्वराज्याची वाट म्हणजे कष्टाची सर्वोच्च वाट आहे, हे इतिहास शिकताना जाणून घेण्याची गरज आहे. मुळात जगाच्या पाठीवर जी माणसं मोठी झाली, ज्यांनी यश प्राप्त केले ते छत्रपती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अब्राह्म लिंकन असे कोणीही असले, तरी ते कष्टाच्या वाटा चालल्यानेच यश त्यांच्या मागे चालत आले आहे. वर्तमानात यशासाठी अभ्यासाच्या वाटा तुडवण्याची गरज असताना, यशाला गवसणी घालण्यासाठी, शॉर्टकट शोधले जात आहेत. अभ्यासाऐवजी त्यापलीकडील वाममार्गाने गुण मिळवण्याची, विद्यार्थी आणि पालकांना इच्छा का होते? गुणांसाठी अभ्यास का करावा वाटत नाही? अभ्यासाने मिळणार्‍या गुणापेक्षा, फुकटचे यश का खुणावत आहे? सत्याच्या वाटेचा प्रवास करावा न वाटण्यामागे, नेमके काय कारण आहे? पालकांनादेखील या वाटा चालण्यात काहीच गैर वाटत नाही. आपल्या समाजात अवतीभोवती जे काही घडते आहे, त्याचा परिणाम शिक्षणाच्या क्षेत्रावरदेखील होताना दिसतो आहे का? खोट्या प्रतिष्ठा महत्त्वाच्या वाटत आहेत का? समाजातील प्रतिष्ठेच्या वाटा, ज्ञानाऐवजी आर्थिक श्रीमंतीच्या दिशेने जात आहेत. एकेकाळी समाजात ज्ञानसंपन्न माणसाला, राजदरबारापासून ते सामान्य माणसांपर्यत प्रतिष्ठा होती. राजे महाराजे ज्ञानाची साधना करणार्‍या माणसांना, जवळ करत होते. आज ज्ञानाची साधना करणारी माणसे, समाजाच्या प्रतिष्ठेच्या चौकटीत कुठेच दिसत नाहीत. ज्ञानात प्रतिष्ठा असती, तर लोक ज्ञानासाठी अभ्यासाच्या दिशेने प्रवास करू लागली असती. आज समाजात, खरच सरस्वतीची उपेक्षा होते आहे. वर्तमानात ज्ञानाच्या दिशेने चालावे असे खरच वाटते आहे का? याचे उत्तर नाही, असेच आहे.सामाजिक प्रतिष्ठेच्या व्याख्या बदलल्याने, विद्यार्थ्यांनाही त्या दिशेने प्रवास करावा असे वाटले, तर त्यात नवल नाही. वर्तमानात संपत्ती, श्रीमंती सर्वश्रेष्ठ ठरू लागली आहे. त्यामुळे ती ज्या ज्या मार्गाने मिळवता येईल, त्या त्या मार्गाने जाण्यासाठी अट्टहास केला जात आहे. आपल्याला जे काही हवे आहे, ते मिळवताना त्यासाठीची मूल्यांची वाट आपल्याला चालावी वाटत नाही. आपल्या अवतीभोवतीच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातही शॉर्टकटच्या मार्गाने यश मिळवण्याचे प्रयत्न होता आहेत. ते मिळवणार्‍या प्रतिष्ठा मिळत आहेत. मूल्यहीन श्रीमंताला सन्मान मिळत आहे. या वाटा चालताना, नैतिकतेचा विचार हरवलेला दिसतो आहे. मूल्यांचा विचारच होणार नसेल, तर लोक हव्या त्या मार्गाने प्रवास करणार यात शंका नाही. अवतीभोवती मूल्यांचा र्‍हास होतो, तेव्हा त्याचा परिणाम सर्व घटकांवर होत असतो. तो होऊ नये, सत्य, प्रामाणिकता, मूल्य, नैतिकतेची वाट चालता यावी, यासाठी शिक्षणातून पेरणी होण्याची गरज आहे. बिघडलेली परिस्थिती पुन्हा मूळच्या स्थितीत आणायची असेल, तर शिक्षण प्रक्रियेतून काम करण्याची अपेक्षा असते. मात्र, शिक्षणाची स्थिती जर बिघडली असेल, तर सुधारण्याची अपेक्षा उरत नाही. वर्तमानात शिक्षण क्षेत्रात जे काही घडते आहे, त्यात मोठ्या प्रमाणावर मूल्यांच्या वाटा हरवलेल्या दिसत आहेत. तेव्हा समाजातच सुधारणांच्या वाटा चालणे, दिवसेंदिवस कठीण होत जाणार आहे.
 
आज शिक्षणातून माणूस घडवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यासाठी केवळ मार्कांची स्पर्धा करून चालणार नाही. आज शिक्षण संस्थांच्या जाहिराती, पालकांच्या मुखातून येणारे विचार पाहिले की, त्यात केवळ गुणांच्या आलेखाची नोंद दिसते. आम्ही 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे, आजवर शेकडा इतके विद्यार्थी घडवले असे सांगत, भौतिक सुविधांच्या उपलब्धतेची मांडणी करताना दिसत आहेत. पालकही आपल्या पाल्याला 95 टक्के गुण मिळाले आहे, असे अभिमानाने सांगत आहेत. मात्र, आम्ही माणूस घडवतो, आम्ही मूल्य पेरतो, असे काही जाहिरात फलकांवर दिसत नाही. पालकांनाही गुण मिळून देणारी मुले हवी आहेत. मूल्यांच्या विचारांची वाट चालणार्‍या पाल्यांचा, विद्यार्थ्यांचा अभिमान वाटत नाही, हे वास्तवही समजावून घेण्याची गरज आहे. गुण मिळाले नाही म्हणून खंत वाटते. मात्र, त्याचवेळी मूल्य आत्मसाथ केले नाही, म्हणून खंत वाटत नाही. आपल्या अभिमानाची स्थळेदेखील बदलत चालली आहेत. अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांचा जितका अभिमान वाटतो, तितका मूल्यांच्या वाटा चालणार्‍याचा अभिमान वाटत नाही, हे वास्तव लक्षात घ्यायला हवे. गुणांचे आलेख उंचावले की सत्कार होतात मात्र, मूल्यांच्या वाटेचा प्रवास करणार्‍यांचा सत्कार, आदर, सन्मान होताना दिसत नाही. त्यामुळे आपण मूल्यांचा विचार करू शकलो नाही, तर भविष्यात या वाटा दिवसेंदिवस कठीण होत जाणार आहे. आज आपण मूल्यांचा हरवलेल्या विचारासंदर्भाने पुनर्विचार केला नाही, तर भविष्य आणखी कठीण होण्याचा धोका आहे.
 
संदीप वाकचौरे