पाकिस्तानात भीषण अन्नटंचाई! १.१ कोटी जनतेवर उपासमारीची वेळ, संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याची घंटा

    21-May-2025   
Total Views |
 
11 million stare at starvation in Pakistan UN report reveals
 
इस्लामाबाद : (11 million stare at starvation in Pakistan) पाकिस्तानातील १.१ कोटी जनता तीव्र अन्नटंचाईच्या समस्येला तोंड देत आहेत, त्यापैकी अनेक जण उपासमारीच्या थेट उंबरठ्यावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (FAO) शुक्रवार, दि. १६ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या ‘जागतिक अन्न संकट २०२५’ या अहवालातून ही धोकादायक स्थिती समोर आली आहे. या अहवालातून पाकिस्तानमध्ये विशेषतः बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तूनख्वा सारख्या संघर्षग्रस्त आणि उपेक्षित भागांमध्ये अन्नटंचाईची भीषण परिस्थिती ओढवल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
अहवालानुसार, २०२४ च्या तुलनेत अन्न असुरक्षिततेची व्याप्ती ३८ टक्क्यांनी वाढली असून, पाकिस्तानमध्ये अन्न टंचाईची लाट अधिक वेगाने पसरत आहे. गेल्या अनेक दशकांपासून दारिद्र्य, हवामान बदल, पूर आणि राजकीय दुर्लक्षाने त्रस्त असलेल्या ६८ ग्रामीण जिल्ह्यांतील परिस्थिती सर्वाधिक वाईट आणि दयनीय आहे. या भागांतील सुमारे २२% लोकसंख्या उपासमारीच्या थेट उंबरठ्यावर असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 
बलुचिस्तान आणि सिंध या दक्षिणेकडील प्रांतांमध्ये, जिथे स्वायत्तता किंवा स्वातंत्र्याची मागणी वर्षानुवर्षे जोर धरतेय, कुपोषण ही एक 'मूक महामारी' बनली आहे. अहवालात असे नमूद केले आहे की २०१८ ते २०२४ च्या सुरुवातीच्या काळात, काही जिल्ह्यांमध्ये जागतिक तीव्र कुपोषण (GAM) दर ३०% पेक्षा जास्त झाला, जागतिक आरोग्य मानकांनुसार हा दर धोकादायक मानला जातो. 'सामान्य' परिस्थितीतही, १०% पेक्षा जास्त GAM दर सार्वजनिक आरोग्य आणीबाणीचे स्पष्ट संकेत मानले जाते.
 
अहवालात हवामान बदलामुळे उपजीविकेचे साधन, पीक उत्पादन आणि स्वच्छ पाण्याची उपलब्धता यांवर होत असलेल्या परिणामांबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. किरकोळ सुधारणा झाल्याचं जरी नमूद करण्यात आलं असलं तरी, आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होण्याचा इशाराही FAO ने दिला आहे. संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानला या अन्नसंकटाची दखल घेऊन तातडीने पावले उचलण्याचा गंभीर इशारा दिला आहे.
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\