कोराडीतील माविम प्रकल्पांना गती द्या ! - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा

- प्रकल्पांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

    21-May-2025
Total Views |
 
Mavim projects in Koradi Minister Chandrashekhar Bawankule warning to officials
 
मुंबई: कोराडी येथे महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी महसूलमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. या प्रकल्पांच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे सांगत त्यांनी अनियमितता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा आज बैठकीत दिला.
 
महिलांना रोजगारक्षम बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पांना निधीची कमतरता भासणार नाही, अशी हमीही त्यांनी दिली.मंत्रालयातील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या दालनात मंगळवारी कोराडीतील माविम प्रकल्पांच्या प्रगतीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मंत्री आदिती तटकरे यांच्यासह सचिव डॉ. अनुपकुमार यादव, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, विभागाचे सहसचिव वी. रा. ठाकूर, महाव्यवस्थापक रवींद्र सावंत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
कोराडी येथे माविमअंतर्गत वस्त्रप्रक्रिया प्रकल्प, निर्माल्यापासून अगरबत्ती निर्मिती, प्रदूषणविरहित कलमकारी आणि वस्त्रप्रक्रिया प्रकल्प तसेच सॅनिटरी नॅपकिन निर्मिती असे विविध प्रकल्प राबविले जात आहेत. हे प्रकल्प ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळे सुमारे २०० महिलांना रोजगार मिळणार आहे.महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, “नागपूरचा पालकमंत्री या नात्याने कोराडीतील महिलांसाठीचे प्रकल्प वेगाने पूर्ण करणे माझी प्राथमिकता आहे. या प्रकल्पांद्वारे महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम बनवले जाईल.” त्यांनी प्रकल्पांना निधीची कमतरता भासणार नाही, याची ग्वाही देत प्रशिक्षणासाठी महिलांना नियमित सहा महिन्यांचे प्रशिक्षण आणि त्यासाठीचे विद्यावेतन वेळेत मिळावे, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
 
महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी कोराडी येथील गारमेंट केंद्राच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले. या केंद्रात बचत गटातील महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे. “हे केंद्र तातडीने सुरू करण्यासाठी एकच निविदा प्रक्रिया राबवावी आणि ठरलेल्या कालमर्यादेत केंद्र कार्यान्वित करावे,” असे त्यांनी स्पष्ट केले. माविमअंतर्गत सुरू असलेले हे प्रकल्प ग्रामीण महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. या प्रकल्पांमुळे महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळेल आणि त्यांचे जीवनमान उंचावेल. या प्रकल्पांमुळे महिलांना केवळ आर्थिक स्वावलंबनच मिळणार नाही, तर त्यांच्या कौशल्यांचा विकास होऊन आत्मविश्वासही वाढेल.
 
अधिकाऱ्यांना जबाबदारी
 
महसूलमंत्री बावनकुळे यांनी प्रकल्पांच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक ताकीद दिली . ते म्हणाले की, “प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.” त्यांनी प्रकल्पांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्याचेही निर्देश दिले.